Tuesday, 27 September 2016

नवरात्री विशेष - 2016


नवरात्री विशेष

  • नवरात्र बसविल्यानंतर ज्या देवतेचे नवरात्र असेल त्या देवतेची पूजा करताना फुलांनी पाणी शिंपडून स्नान, इ. उपचार करावेत आणि इतर देवतांना नेहमीप्रमाणे ताम्हनात घेऊन अभिषेक स्नान, इ. उपचार करुन स्वतंत्रपणे पूजा करावी. काही ठिकाणी नवरात्र बसविल्यावर इतर देवांची पूजा करीत नाहीत हे योग्य नाही.
  • प्रकृति अस्वास्थ्य किंवा वयोमान, इ. मुळे नवरात्राचे उपवास रोज करणे शक्य नसेल तर बसता-उठता दोन दिवस उपवास करावा किंवा फक्त अष्टमीचा उपवास करावा.
  • नवरात्र किंवा इतर उपवासाचे दिवसांत अशौच आले तर उपवास करता येतो. परंतु विशिष्ट संख्यात्मक उपवास असताना त्या संख्येमध्ये तो मोजू नये.
  • नवरात्र बसविल्यावर अशौच आले तर सप्तशती पाठ बंद करावेत अशौच संपल्यावर राहिलेले पाठ पूर्ण करावेत. मात्र नवरात्राचे उपवास करता येतील. नवरात्राची पूजा, माळ, दिवा, इ. उपचार शेजाऱ्याकडून किंवा इतर नातेवाईकांकडून करुन घ्यावेत. नवरात्रोत्थापन सुद्धा ब्राह्मणांकडून किंवा अशौच नसलेल्या नातेवाईकांकडून करावे. अशुचि घरातील साहित्य वापरु नये.
  • अशौचामुळे नवरात्रातील काही दिवस पूजेसाठी मिळत असतील तर अशा वेळेस 7 दिवस, 5 दिवस, 3 दिवस, 1 दिवसाचे नवरात्र करता येते, पंचांगात अशा दिवसांचा उल्लेख सप्तरात्रोत्सवारंभ अशा प्रकारे केलेला असतो.
  • नवरात्र म्हणजे आश्विन शु. प्रतिपदा ते नवमी पर्यंत केले जाणारे धार्मिक कृत्य. अशावेळेस तिथीच्या क्षयवृद्धीमुळे 8 किंवा 10 दिवसाचे नवरात्र असू शकते.
  • नवरात्रामध्ये अखंड नंदादीप लावला जातो काही वेळेस वाऱ्याने किंवा काजळी काढताना तो विझतो. अशा वेळेस काही अशुभ नसते, तो नंदादीप पुनः लावता येतो.
  • अष्टमीचे महालक्ष्मीपूजन (घागरी फुंकणे) करताना निशीथकाली म्हणजे रात्री साडेबारा ते दीड या वेळेत अष्टमी असलेला दिवस महालक्ष्मीपूजनासाठी घ्यावा असे आहे. त्यादिवशी सकाळी-दुपारी-सायंकाळी सप्तमी असू शकते. अशा सप्तमीवर पूजन करुन रात्रीची पूजा अष्टमीवर करावी.
  • दसरा साडेतीन मुहूर्तापैकी एक शुभ - दिवस असला तरी वास्तु, विवाह इ. कार्यासाठी आश्विन महिना वर्ज्य असल्याने या शुभ दिवशी वास्तुशांति, विवाह करु नये. लौकिक गृहप्रवेश करुन राहण्यास जाता येईल.

या वर्षी दिनांक 1 ऑक्टोबर रोजी घटस्थापना होत असून नवरात्रारंभ होत आहे या दिवशी ब्राह्ममुहूर्तापासून म्हणजे साधारणपणे पहाटे 5 वाजल्यापासून मध्याह्नसमाप्ति पर्यंत म्हणजे दुपारी 1:30 पर्यंत घटस्थापना करता येईल. या दिवशी सकाळी 9 ते 10/30 यावेळेत राहुकाल असला तरीही त्या वेळेतही पूजन करता येईल. घटस्थापनेकरिता राहुकाल वर्ज्य करण्याची आवश्यकता नाही. 10 ऑक्टोबर रोजी नवरात्रोत्थापन (नवरात्र समाप्ति) व पारणा आहे व दसरा हा 11 ऑक्टोबर रोजी आहे. सर्वसाधारणपणे नवरात्रोत्थापन व दसरा एका दिवशी किंवा वेगवेगळ्या दिवशी आले तरी घटस्थापनेपासून दसऱ्यापर्यंत 9 दिवस किंवा 10 दिवसांचे अंतर असते. आश्विन शुद्ध प्रतिपदेपासून नवमीपर्यंत शक्ती देवीची जी उपासना केली जाते त्याला नवरात्र असे म्हणले जाते. हे दिवस तिथीच्या क्षय-वृद्धीमुळे कमी अधिक होत असतात. या वर्षी घटस्थापनेपासून 11 व्या दिवशी दसरा आहे. यापूर्वी अनेक वेळेस असे झालेले आहे त्यामुळे अकराव्या दिवशी दसरा येणे शुभ किंवा अशुभ अशा अफवांवर विश्वास ठेवू नये. साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेला दसरा हा कितव्याही दिवशी आला तरी शुभच असतो. यापूर्वी 1998 मध्ये याच प्रमाणे अकराव्या दिवशी दसरा आलेला होता.
अशौचामुळे ज्यांना 1 ऑक्टोबर रोजी घटस्थापना करणे शक्य होणार नाही त्यांनी अशौच निवृत्ति नंतर (अशौच संपल्यावर) 4 ऑक्टोबर, 6 ऑक्टोबर, 8 ऑक्टोबर यापैकी कोणत्याही दिवशी घटस्थापना करावी व 10 रोजी नवरात्रोत्थापन करावे.
महालक्ष्मी पूजन (घागरी फुंकणे) ह्या दिवशी मध्यरात्री अष्टमी तिथीवर देवीचे पूजन करण्याची प्रथा आहे. अशी अष्टमी 8 ऑक्टोबर रोजी मध्यरात्री मिळते त्यामुळे त्या दिवशी महालक्ष्मीपूजन दिलेले आहे. दुर्गाष्टमी 9 ऑक्टोबर रोजी आहे.
काही घरांमध्ये नवरात्रीच्या माळा घेण्याची पद्धत आहे. सर्वसाधारणपणे 9 माळा घेतल्या जातात मात्र या वर्षी नवरात्रोत्थापनेचा दिवस 10 वा असल्याने रोजची एक याप्रमाणे 9 ऐवजी 10 माळा घ्याव्यात.
विजया दशमी, दसरा, सीमोल्लंघन हे 11 ऑक्टोबर रोजी असून साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेला दसरा हा दिवस अत्यंत शुभ मानला जातो. या दिवशी विजय मुहूर्तावर अनेक लोक आपल्या नवीन उपक्रमाचा आरंभ करतात. हा विजय मुहूर्त महाराष्ट्रामध्ये साधारणपणे दुपारी 2:23 ते 3:10 या दरम्यान आहे.

Monday, 19 September 2016

देशापुढील प्रश्नांची उत्तरे शोधणाऱ्या संशोधनाची दिशा कोणती ?

इंडिअन इंस्टीटयूट ऑफ सायन्स (I.I.Sc.) च्या पदवीदान समारंभामध्ये बोलताना श्री. नारायणमूर्तींनी भारतीय वैज्ञानिक समूहाच्या वर्मावरच आघात केला, (म.टा. 17 जुलै 2015) हे चांगले झाले. स्वातंत्र्योत्तर काळामध्ये जागतिक स्तरावर तुमचे योगदान काय ? हा प्रश्न वैज्ञानिकांना कोणीतरी विचारायलाच हवा होता. आपण वैज्ञानिक प्रगतीचा कितीही डांगोरा पिटला तरी, ही प्रगती पाश्चात्य संशोधनाचे केवळ अनुकरण करून झाली आहे, हे सत्यच आहे. केवळ शेकडो विद्यापीठे उभारून वैज्ञानिक प्रगती होत नाही, तर या योगे आपण पाश्चात्य देशांना त्यांना संशोधनासाठी आवश्यक मनुष्यबळ तेवढे पुरवीत आहोत, ही वस्तुस्थिती आहे. मूलभूत संशोधनासाठी केवळ महागड्या उपकरणांची गरज असते, असे नसून संशोधनाची उद्दिष्टे आणि दिशा ठरविण्याची गरज असते.
पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू हे वैज्ञानिक दृष्टी असणारे होते, हे खरे आहे. त्यांच्या काळात अनेक मोठ्या वैज्ञानिक संस्था उभ्या राहिल्या. आय. आय. टी. सारख्या शैक्षणिक संस्था सुरु झाल्या. पण आज साठ वर्षांनंतर त्यांचा ताळेबंद मांडला तर काय निष्पन्न होते? जागतिक स्तराचे सोडून द्या, पण भारताच्या विकासाला तरी त्यांचा काय हातभार लागला आहे? तांत्रिक सहकार्य (collaboration) हा गेल्या साठ वर्षातला परवलीचा शब्द झाला आहे. याचा शुध्द अर्थ, तयार तंत्रज्ञान आयात करून वापरणे, हा आहे. सुरुवातीच्या काळात असे करणे आवश्यक होते, हे मान्य केले तरी आता आपल्याला त्याचीच सवय झाली आहे, हे मूलभूत संशोधनासाठी दुर्भाग्यच आहे. या दुर्भाग्याचेही मूळ नेहरूंच्या विचारसरणीतच सापडेल. नेहरूंचा सगळा भर आधुनिक विज्ञानावर आणि त्या अंतर्गत येणाऱ्या औद्योगिकरणावर होता. देशाचे शैक्षणिक आणि औद्योगिक धोरण ठरविताना त्यांच्यापुढे पाश्चात्य देशांचा आदर्श होता. पाश्चात्य देशांपुढे लोकसंख्येचा प्रश्न गंभीर कधीच नव्हता. त्यामुळे आणि बहुतांश मांसाहारी असल्यामुळे अन्नधान्याचाही प्रश्न गंभीर नव्हता, तसेच, प्रत्येक हाताला काम देण्याचाही प्रश्न गंभीर नव्हता. पण याच्या नेमकी उलटी परिस्थिती भारतामध्ये होती त्यामुळे आणि नंतरच्या काळात सगळ्या सरकारांनी राबविलेल्या औद्योगिकरणाच्या धोरणांमुळे भारतापुढचे कुठले प्रश्न समाधानकारकरीत्या सुटले आहेत? ना अन्न-वस्त्र-निवारा या माणसाच्या मूलभूत गरजांचा, ना बेरोजगारीचा !
नेहरूंनी देशाचे औद्योगिक आणि शैक्षणिक धोरण ठरविताना जर भारताच्या समृध्द ज्ञान परंपरेचा योग्य उपयोग करून घेतला असता तर आजचे निराशाजनक चित्र दिसले नसते. या संदर्भात खालील मुद्दे विचारात घेतले जावेत:-
१). भारताला गरीबीत लोटण्याचे श्रेय इंग्रजांकडे जाते. त्यांनी भारतात पाय ठेवण्यापूर्वी भारताची आर्थिक स्थिती उत्तम होती, अगदी मुस्लीम आक्रमणानंतरही. हि गोष्ट सेमुअल हेटीन्गटन यांनी लिहिलेल्या ‘The Clash Of Civilization” या पुस्तकात दिलेल्या तूलनात्मक तक्त्यावरून स्पष्ट होते. त्यातील माहितीप्रमाणे, इ. स. १७५० मध्ये भारताचे उत्पादन संपूर्ण युरोप आणि सोविएत रशिया यांच्या एकत्रित उत्पादनापेक्षाही जास्त होते. भारताचे उत्पादन २४.५% इतके होते तर, युरोपचे १८.२% आणि सोविएत रशियाचे अवघे ५% होते.
२). भारत हे एक अत्यंत समृध्द आणि प्रगत राष्ट्र असल्यामुळेच युरोपिअन लोक भारतात येण्यासाठी धडपडत होते.
३). भारताची उत्पादने अत्यंत उच्च दर्जाची होती. यामुळेच इंग्रजांनी कूटनीतीचा अवलंब करून ती उत्पादने बंद पाडली. भारतीय बनावटीची जहाजे इतकी उत्कृष्ट दर्जाची होती कि त्यामुळे इंग्रजांच्या जहाजबांधणी उद्योगावर गाशा गुंडाळण्याची वेळ आली होती. शेवटी पार्लमेंटमध्ये कायदा करून त्यांनी भारतातील जहाज उद्योग बंद पाडला. हीच गोष्ट वस्त्रोद्योगाची झाली. भारतीय लोह हे स्वीडिश लोहापेक्षाही उच्च दर्जाचे असल्याचा निर्वाळा खुद्द इस्ट इंडिया कंपनीचा अधिकारी कॅप्टन जे. कॅम्प्बेल याने लिहिलेल्या अहवालात दिला आहे. वूद्झ स्टील हे त्याचे उत्कृष्ट उदाहरण आहे.
४). युरोपिअन लोकांना इ.स. १७३५ पर्यंत जस्त धातूच्या शुद्धीकरणाची पद्धत माहित नव्हती. त्या वर्षी विल्यम चॅम्पिअन या शास्त्रज्ञाने ज्या पद्धतीचे “ब्रिस्टल पद्धत” म्हणून पेटंट घेतले ती पद्धत तेराव्या शतकातील रसरत्नसमुच्चय या ग्रंथामध्ये तशीच दिली आहे. याच पद्धतीनुसार शेकडो वर्षे भारतात जास्त धातूचे उत्पादन होत असे. तेंव्हा, हे तंत्रज्ञान इंग्रजांनी चोरून स्वतःचे म्हणून मिरविले, या विधानात काहीही वावगे नाही.
५). देवीच्या लसीचा शोधही इंग्रजांनी बंगाल मधून पळविला, याचे ही साधार पुरावे उपलब्ध आहेत.
अशी अनेक उदाहरणे देता येतील. याचा अर्थ, भारतीयांना विज्ञानाची प्रदीर्घ परंपरा आहे. वैज्ञानिक दृष्टी ही पाश्चात्यांनी दिलेली देणगी नसून ती भारतीयांनी हजोरो वर्षांपासून जोपासलेली वृत्ती आहे. विज्ञानाला वैयक्तिक हस्तकौश्यल्याची जोड देऊन त्यांनी अन्न, वस्त्र, निवारा आणि बेरोजगारी सारख्या प्रश्नांची समाधानकारक उत्तरे शोधली होती. या सत्याचा स्वीकार करून प्राचीन विज्ञानान्तर्गत असलेल्या तंत्रज्ञानांचे पुनर्संशोधन करून काळानुसार त्यात योग्य ते बदल करणे हे खरे संशोधनाचे उद्दीष्ट असायला हवे. त्यासाठी प्राचीन ग्रंथांमधील अनेक वैज्ञानिक संकल्पनांना मूर्त स्वरूप देण्यासाठी मूलभूत संशोधनाच्या असंख्य संधी या देशातच उपलब्ध आहेत. त्यासाठी परदेशांवर अवलंबून राहण्याचीही गरज नाही. कृषी, वस्त्रोद्योग, स्थापत्य, प्राणिशास्त्र, वनस्पतीशास्त्र, आरोग्य, धातुशास्त्र, रसायनशास्त्र, नौकानयन आणि नौकाबांधणीशास्त्र, नाणेशास्त्र. कायदा आणि अनुशासन, नगर रचना, पर्यावरण आदि अनेक शास्त्रांचा जन्मच मुळी भारतात झाला आहे. भारतीयांनी लोकांना कपडे घातले. विज्ञानातील मूलभूत संशोधनाचा पाया प्राचीन भारतीयांनी आधीच रचून ठेवला आहे. त्यावर मोठी इमारत रचण्याचे काम आता भारतीय शास्त्रज्ञांनी केले तर आधुनिक विज्ञानातही ते आघाडी घेऊ शकतील आणि आधुनिक विज्ञानाच्या अनियंत्रित प्रगतीमुळे मानवसमाजापुढे निर्माण झालेल्या कांही भयानक प्रश्नांवर उत्तरे शोधू शकतील. या शतकामध्ये भारतीय शास्त्रज्ञांनी प्राचीन भारतीय विज्ञानावर संशोधन केंद्रित करणे आवश्यक आहे.

सतीश कुलकर्णी

, मेरीगोल्ड अपार्टमेंटस, ५वी गल्ली, आनंद पार्क, औंध, पुणे-४११००७.

मो -  9822064709

Saturday, 3 September 2016

विश्ववंद्य गणपति

5 सप्टेंबर 2016, सोमवार - श्रीगणेश चतुर्थी

गणेश पूजनासाठी ब्राह्ममुहूर्तापासून मध्याह्नापर्यंतचा काल महत्वाचा आहे. गणेश पूजनासाठी शुभ, अमृत काल किंवा राहूकाल, भद्रा यांचा विचार करू नये.

गणपति ही देवता भारतापासून मेक्सिकोपर्यंत तसेच चीन व रशिया यासारख्या देव-धर्म न मानणाऱ्या राष्ट्रात ही उपास्य देवता म्हणून होती, हे उत्खननात सापडणाऱ्या मंदीराच्या अवशेषातून व मूर्तीतून स्पष्ट दिसते. यावरून गणपति हा विश्ववंद्य आहे हे सिद्धच आहे.
भारतात तर लोककलेपासून विवाहादि मंगलकार्यापर्यंत सर्वत्र गणपति व्यापून आहे. तमाशातहि पहिला वग गणपतीचा म्हटला जातो. जुन्या घराच्या मुख्यदारावर गणेश चित्र असे. आता गणपतीची "टाईल" असते. पण गणपति आहे. शिक्षणाला  प्रारंभ होतो तो श्रीगणेशायनमः करुनच. सर्व शुभ कार्यात प्रथम  निर्विघ्नता सिद्ध्यर्थम् म्हणून गणपतीचेच स्मरण केले जाते. असे, इतके स्थान आपल्या जीवनात गणपतीने मिळविले आहे किंवा आपण स्थान दिले आहे.
ग्रंथ लेखनाच्या प्रारंभी नमन करावे असा संकेत आहे व तो सर्व ग्रंथकारांनी पाळला आहे. नमन गणपतीचेच असते. मात्र श्री ज्ञानदेवांनी गणपतीला नमन केले नसून त्यांनी ओंकाराला नमन केले आहे, असे काहींचे म्हणणे आहे. पण हे म्हणणे बरोबर नाही. कारण पहिल्या ओवीत "ॐ नमोजी आद्या" म्हणून लगेच दुसऱ्या ओवीत "देवा तूचि गणेशु" असे म्हटले आहे. म्हणजे गणेशा ओंकार तूच आहेस. ओंकार व गणपति हे भिन्न नसून एकच आहेत असे ज्ञानदेवांचे म्हणणे आहे. ओंकाराला नमन म्हणजेच गणपतीला नमन. सृष्टीच्या उत्पत्तीचा विचार सांगताना सृष्टीच्या उत्पत्तीच्या प्रारंभी "ओमितिध्वनिरभूत" म्हणजे ॐ असा ध्वनि झाला. या ध्वनीचे दृश्यस्वरुप "स वै गजमुखाकारः" म्हणजे तो ध्वनि म्हणजेच ओंकार हा हत्तीच्या मुखासारखा आहे, असे सांगितले आहे. म्हणजे प्रथमतः ध्वनि झाला तो "ॐ" असा झाला. हा "ओंकार" उभा करुन पहा म्हणजे गणपतीच्या मुखासारखा आहे हे लक्षात येईल. तात्पर्य ॐ व गणपति हे एकच आहेत, भिन्न नाहीत. म्हणून ओंकाराला नमन म्हणजेच गणपतीला नमन असल्याने ज्ञानदेवांनी गणपतीलाच नमन केले आहे. हे दुसऱ्या ओवीत चकार घालून (देवा तूचि गणशु) सांगितले आहे. सृष्टीच्या प्रारंभी ॐ व अथ हे दोन शब्द ब्रह्मदेवाचा कंठ भेदून बाहेर आले, म्हणून हे दोन शब्द मंगलवाचक आहेत असे म्हटले आहे. ओंकार हे गणपतीचे स्वरुप आहे व ओंकार हा मंगल आहे म्हणून गणपतीला "मंगलमूर्ति" असे म्हटले जाते ते सार्थ आहे. गणपति ओंकारच आहे म्हणून गणपतींची उपासना म्हणजे साक्षात् ब्रह्माची उपासना आहे. "त्वं प्रत्यक्षं ब्रह्मासि" असे अथर्वशीर्षात म्हटले आहे. म्हणून गणेशोपासना ही सर्वश्रेष्ठ आहे. प्रत्येक देवतेत विशिष्ट गुण आहेत. जो गुण आपल्याला पाहिजे असेल तो गुण ज्या देवतेमध्ये आहे त्या देवतेशी, उपासनेने संपर्क साधून तो गुण आपल्यात आणणे. कोणत्या देवतेकडे काय मागावे हे सांगितलेले आहे.
सूर्याकडे आरोग्य मागावे, अग्नीकडे संपत्ति मागावी, ज्ञान महादेवाकडे मागावे. कारण सर्व विद्यांचा तो ईश्वर म्हणजे अधिपति आहे. मोक्ष जनार्दनाकडे म्हणजे विष्णुकडे मागावा कारण तो वैकुंठाधिपति आहे.
गणपति बुद्धीची (बुद्धिदायी) देवता आहे. "देवा तूचि गणेशु सकळ मतिप्रकाशु।" देवा सर्व जगाच्या बुद्धीला ज्ञानाचा प्रकाश देणारा हे गणेशा तूच आहेस. म्हणून बुद्धिवर्धनाकरिता गणपतीची उपासना करणे उचित आहे. बुद्धी तरल असेल तर कोणत्याही विषयाचे परिपूर्ण ज्ञान होऊ शकते. बुद्धीवरच सर्व गोष्टी अवलंबून आहेत. बुद्धीच नसेल तर कसलेही ज्ञान होऊ शकणार नाही. आपल्याकडे अतिप्राचीन काळापासून, पैशाला महत्त्व दिले नाही तर बुद्धीला महत्त्व दिले आहे, बाकी सर्व गेले तरी चालेल पण बुद्धी जाऊ देऊ नकोस. अशी सकल संतांनी परमेश्वराची प्रार्थना केली आहे.
पत्र लिहिताना किंवा काहीहि लिहिताना प्रथम ।। श्रीगणेशायनमः ।। ।। श्री सरस्वत्यैनमः ।। ।। श्री गुरुभ्योनमः ।। असे लिहिण्याची प्राचीन पद्धति होती. हा क्रम असा का घेतला? कोणत्याहि विषयाचे ज्ञान प्रथम बुद्धीनेच होत असते व गणपति हा बुद्धीदाता आहे. म्हणून प्रथम गणेशायनमः बुद्धीने जे ज्ञान ग्रहण केले ते शब्दबद्ध करण्याचे काम सरस्वतीचे, सरस्वतीला अभिनव वाग्विलासिनी असे ज्ञानदेवांनी म्हंटले आहे. "शब्द मूळ वाग्देवता" असे समर्थांनी म्हटले आहे. म्हणून दुसरा क्रमांक श्री सरस्वतीला दिला. ज्ञान व ते शब्दबद्ध करण्याचे माध्यम गुरु होत म्हणून गुरुंना तिसरा क्रमांक दिला. अशी ही लेखनाची प्राचीन परंपरा जाणीवपूर्वक केली आहे असे स्पष्ट दिसते.
कलौचंडी विनायकौ असे समर्थांनी म्हटले आहे. समर्थवाणी असल्याने ती खोटी ठरणार नाही. गणपतीची मंदिरे एकेकाळी ओस पडली होती. पण आता काळ पालटला आहे. सर्व गणपति मंदिरे भक्तांनी सदैव गजबजलेली आहेत. जसे पुणे येथील सारस बागेतील गणपति मंदिर, पूर्वी तेथे पुजाऱ्याशिवाय कोणीही जात नसे. पण आता रोज हजारो माणसे दर्शनास जात असतात. संकष्टीला तर खूपच गर्दी असते. निश्चितच हे सुचिन्ह आहे. मुंबईत प्रभादेवी येथील सिद्धिविनायक मंदिरात दर्शनासाठी मोठी रांग लागते. दर्शन होण्यास दोन दोन तास लागतात पण लोक शांतपणे रांगेत उभे राहतात असे दृश्य आहे. तीच स्थिती तुळजापूर, कोल्हापूर येथे देवीचे दर्शन करताना असते.
"उपासनेला दृढ चालवावे" असे समर्थांनी म्हटले आहे. उपासनेनी काय साधते? देवता म्हणजे शक्तीकेंद्रे आहेत. जसे वीज निर्माण करणारे केंद्र असते. तेथून ती आपल्या घरात आणली जाते व बटण दाबताच घरात दिवे लागतात. त्याचप्रमाणे उपासनेने होते. देवतांमध्ये असलेली शक्ति उपासनेने आपल्यामध्ये अंशतः येते व ती शरीरात अव्यक्तरुपाने साठविली जाते आणि प्रसंगोपात ती व्यक्त स्वरुपात आणता येते. तपश्चर्येने हेच साध्य होते. फक्त त्याचे प्रमाण मोठे असते. अनेक तपस्व्यांनी दिलेले वर व शाप खरे ठरलेले पुराणात तर आहेच, पण वर्तमान काळातही अनेकांना तसे अनुभव येत असतात. नेहमी खरे बोलणारा माणूस एखादे वेळी काही चुकीचे बोलला तरी उपासनेच्या सामर्थ्याने ते खरे होते. अशी उदाहरणे पाहण्यात आहेत.


थर्व म्हणजे गरम, अ थर्व म्हणजे थंड, शीर्ष म्हणजे डोके, थंड ठेवणारे मंत्र म्हणजे अथर्वशीर्ष. जे गरम डोक्याचे म्हणजे थोडे मनाविरुद्ध झाले तर लगेच संतापणारे त्यांना तर अथर्वशीर्ष रोज म्हणणे आवश्यक आहे. अथर्वशीर्षात गणपतीचा बीजमंत्र हा विस्तृतमंत्रात सांकेतिक स्वरुपात सांगितला आहे. तो मंत्र जाणून घ्यावा लागतो. याला मंत्रोद्धार असे म्हणतात. या मंत्राचा उच्चार कसा करावा हे "नादः संधानम्" या वाक्याने सांगितले आहे. वर्णाचा उच्चार म्हणजे व्यक्तीकरण हे शरीरातील सर्वयंत्रांच्या नादाने होत असते. याचा विचार भगवान पाणिनीने फारच उत्तम केला आहे. तो मुळातून पाहणे फार महत्त्वाचे आहे. नाद हे सृष्टीचे मूळ घटकद्रव्य आहे आणि संगीत व मंत्रशास्त्र यावर आधारित आहे. मंत्राचा योग्य पद्धतीने उच्चार करणे याला फारच महत्त्व आहे.
हा मंत्र ओंकाराने समृद्ध करावा असे "तारेणऋद्धम्" या वाक्याने सांगितले आहे. तार म्हणजे ओंकार. ॐ असे म्हटले तर त्याचा उच्चार करताना प्राणवायू ऊर्ध्व होतो. आपणास गतीहि ऊर्ध्व अपेक्षित आहे. म्हणून ओंकार महत्त्वाचा आहे. यालाच प्रणव, तार, एक अशी बरीच नावे आहेत. त्यापैकी येथे तार शब्द का उपयोजला आहे? कारण भक्ताचे संरक्षण झाले पाहिजे. गणपति कसा आहे तर "भक्तानुकंपिनंदेव" म्हणजे भक्तांवर अनुकंपा करणारा आहे. तार या शब्दात रक्षण अपेक्षित आहे. त्याच्या उच्चाराने जन्म, वार्धक्य, व्याधि, मरण, महाभय यापासून तारण म्हणजे रक्षण होते. म्हणून तार असे म्हटले आहे.

गणेशाची नावे

याला वक्रतुंड, विघ्नहर्ता, ब्रह्मणस्पति इत्यादि बरीच नावे आहेत. वक्रतुंड म्हणजे वाकड्या तोंडाचा असा अर्थ समजला जातो. पण तो चूक आहे. "वक्रान् तुण्डयति इति वक्रतुंडः" वेडेवाकडे चालणारे व बोलणारे अशांना शिक्षा करुन जो सरळ मार्गावर आणतो तो वक्रतुंड असा अर्थ आहे. वेदाला ब्रह्म असे म्हणतात. वेद म्हणजे मंत्र, या मंत्रांचा गणेश अधिपति आहे. म्हणून याला ब्रह्मणस्पति असे म्हणतात.
असा हा सृष्टीच्‌या पूर्वीपासून आलेला गणपति देव आहे. "आविर्भूतंच सृष्ट्यादौ" असे अथर्वशीर्षातच म्हटले आहे. असा हा सर्वांना प्रिय असणारा विश्ववंद्य गणपति आहे.
लेखक - मोहन दाते

Friday, 1 July 2016

निरंतर बदलत राहणारे, ज्योतिषशास्त्र !


आधुनिक इतिहासकारांच्या मते भारतीय संस्कृती ५ ते ७ हजार वर्षांपासून अस्तित्वात आहे. या काळात वेगवेगळ्या टप्प्यांवर ज्येतिषशास्त्राशी संबंधित ग्रंथांची निर्मिती झाली आहे. सूर्य सिद्धांतापासून थेट ग्रहलाघवापर्यंत हे ग्रंथलेखन होत आले आहे. आधुनिक पाश्चात्त्य गणिताचा प्रभाव पडण्यापूर्वी हे ग्रंथ लिहिले गेले. हे ग्रंथ म्हणजे भारतात ज्योतिषशास्त्राचा विचार कसा झाला याचे अधिकृत प्रलेखन (documentation) आहेत. या प्रत्येक ग्रंथकाराचा विचार, त्या विषयातील त्याच्या गुरुपरंपरेतून आणि त्या ग्रंथकाराला नव्या सुचलेल्या सैद्धांतिक कल्पनांतून तयार झाला. अनेक ग्रंथकारांनी पूर्वसुरीच्या ग्रंथकारांची काही मते अमान्य केली, काही मते पुरस्कारली आहेत. हे ग्रंथकार (मय, भास्कराचार्य, वराहमिहीर आदि) ऋषितुल्य व्यक्तिमत्त्वे असल्यामुळे बऱ्याच वेळा, सध्याच्या काळात त्यांच्या मतांचा विचार करताना, काहीसे दडपणाखाली, त्यांनी जो विचार केला तो बरोबरच असणार, असे मनात येते. परंतु त्या त्या ग्रंथकारांनी त्यांच्या आधी होऊन गेलेल्या ग्रंथकारांचा असा दडपाणाखाली येऊन विचार केलेला नाही, हे त्यांनी केलेल्या विविध मतांच्या खंडनांवरून लक्षात येते. हीच परंपरा आपल्या इतर शास्त्रांमध्येपण दिसून येते (उदा. दर्शनशास्त्रे).
भारतीय ऋषींनी अनेक विषयांचा सखोल अभ्यास केला हे ग्रंथांच्या विषय वैविध्यावरून लगेच लक्षात येते. हे ज्ञान त्यांना कसे झाले हे मध्ये बराच काळ गेल्याने आणि पारतंत्र्यात खंडित झालेल्या परंपरांमुळे सांगता येणे शक्य नाही. ज्योतिष, योग, आयुर्वेद इ. अाश्चर्य वाटावे इतक्या प्रगत विज्ञानशाखा भारतात विकसित झाल्या. पण या प्रगतीचा हळूहळू वाढत जाणारा आलेख आज मिळत नाही, कारण, त्या त्या काळातील सुसंगत प्रलेखनं (consistent documentation) आज उपलब्ध होऊ शकत नाही. अशा परिस्थितीत, गणितासारख्या तर्काला बांधील असलेल्या विषयात, त्या काळी किती प्रगती झाली होती, हे तर्काला पटणाऱ्या पुराव्यांच्या अभावी, ठामपणे प्रत्येक संदर्भात सांगता येणार नाही. म्हणूनच हे ग्रंथकर्ते ऋषी आदरणीय असले तरी, त्यांचा प्रत्येक विचार देश-काल-परिस्थितीच्या कसोटीस उतरेलच असे मानणे योग्य नाही.
यातील अनेक ऋषींची वचने अभ्यासली तर, असे वाटते की, यांना विश्वरहस्य कळले होते. विश्वरहस्य, तत्त्वज्ञान, हे विषय असे आहेत, की ज्याचा पुरावा देता येत नाही. पण, या तत्त्ववेत्त्यांनी जे अमोल ज्ञान वेदादि ग्रंथांमधून मांडले आहे, त्यांतील काही वचनांचा अभ्यास केल्यास अथवा अनुभव घेतल्यास आपली खात्री होते की या महात्म्यांना अंतिम सत्याचा साक्षात्कार झाला होता. अशा अंतिम ज्ञानाचा साक्षात्कार झालेल्या ऋषींकडून त्यांच्या देशकाल परिस्थितीनुसार योग्य (नैसर्गिक) असेल एवढेच तंत्र आणि विज्ञान विकसित झाले. ज्योतिषशास्त्र, आयुर्वेद ही तंत्र आणि विज्ञानाच्या कक्षेतील (अपरा विद्या) शास्त्रे आहेत. त्यामुळे त्याचा विकासही, त्या काळांतील भासलेली आवश्यकता, किंवा काही वेळा कुतूहल यांमुळे झाला. त्या प्रगतीला देश-काल संदर्भ होते आणि देश-काल मर्यादा पण होत्या. अर्थात परा विद्या देश-कालातीत आहे, पण असे देश-कालातीत ज्ञान असणाऱ्या ऋषींनी विदित केलेली अपरा विद्या मात्र देश-काल मर्यादेने बद्ध असते. म्हणून ज्योतिषशास्त्र हे निरंतर बदलत राहणारे शास्त्र असेल. प्रत्येक कालात त्यात परिस्थितीजन्य बदल होतील.
अपरा विद्येतील शास्त्रे ही वस्तुनिष्ठ असतात. आर्यभटाने लावलेला शोध, वराहमिहीर वापरणार नाही असे होत नाही. हा शोध तुझा, तो तू वापर, मी फक्त माझे शोधच उपयोगात आणणार. असा दृष्टिकोन ठेवणारा समाज कालांतरात नष्ट होतो. भारतीयांनी शून्याचा शोध लावला, म्हणून पाश्चात्त्य जगत् त्यापासून दूर राहिले नाही. त्यांनी त्या शून्याच्या शोधाचा उपयोग करून पुढे आधुनिक गणित उभे केले. तसेच केवळ पाश्चात्त्यांनी विकसित केले म्हणून आधुनिक खगोलशास्त्र अमान्य केले, आणि ज्या गणितात त्रुटी दिसतात ते गणित, केवळ आपल्या ऋषींनी सांगितले आहे म्हणून वापरत राहिलो तर आपल्या समाजाची स्थिती वर सांगितल्याप्रमाणेच होईल.




Thursday, 16 June 2016

अखंड सौभाग्यप्राप्तीकरिता वटसावित्री पूजन

वटपौर्णिमा 19 जून रोजी

या वर्षी ज्येष्ठ शु. १५ सोमवारी सायं. 16:32 पर्यंत आहे. तथापि वटपौर्णिमा मात्र ज्येष्ठ शु. १४ ला शुक्रवारी दिलेली आहे. सूर्यास्तापूर्वी ६ घटीपेक्षा अधिक व्यापिनी अशा चतुर्दशीने युक्त असलेल्या पौर्णिमेच्या दिवशी सावित्रीव्रत करावे असे वचन आहे. दिनांक 19 जून रोजी रविवारी ज्येष्ठ शु. १४ दुपारी 15:31 पर्यंत असल्याने ६ घटींपेक्षा अधिक सायाह्नव्यापिनी पौर्णिमा रविवारी आहे, म्हणून दि. 19 जून 2016 रोजी रविवारी वटपौर्णिमा दिलेली आहे.
वटपौर्णिमेचे पूजन सूर्योदयानंतर मध्याह्नापर्यंत म्हणजेच दुपारी साधारण 1:30 पर्यंत आपणास शक्य असेल त्यावेळेस करता येते पूजेच्या वेळेस पौर्णिमा तिथी असण्याची आवश्यकता नाही. तेव्हा शास्त्रवचनानुसार दिनांक 19 जून रोजी रविवारी नेहमीप्रमाणे उपवासासह वटपूजन करावे. (दि. 20 रोजी करू नये.)


सुवासिनी स्त्रियांनी सौभाग्यवृद्धीसाठी करावयाचे एक व्रत. ज्येष्ठ पौर्णिमेला करतात. ज्येष्ठ शुक्ल त्रयोदशीपासून पौर्णिमेपर्यंत हे त्रिरात्रव्रत करावे असे सांगितलेले आहे. तीन दिवस उपवास करणे अशक्य असेल, त्यांनी फक्त पौर्णिमेच्या दिवशी उपवास करावा. सावित्रीसह ब्रह्मदेव ही या व्रताची मुख्य देवता असून, सत्यवान सावित्री, नारद व यमधर्म या उपांग देवता आहेत. या व्रताचा विधी असा..
नदीकाठची वाळू आणून पात्रात भरावी. तिच्यावर सत्यवान आणि सावित्री यांच्या मूर्ती ठेवाव्या. मग त्यांची षोडशोपचार पूजा करावी. त्यानंतर अर्घ्य द्यावे. मग पुढील मंत्राने सावित्रीची प्रार्थना करावी –
सावित्रि ब्रह्मसावित्रि सर्वदा प्रियभाषिणि ।
तेन सत्येन मां पाहि दुःखसंसारसागरात् ।।
अवियोगो यथा देव सावित्र्या सहितस्य ते ।
अवियोगस्तथास्माकं भूयाज्जन्मनि जन्मनि ।।
पूजा झाल्यावर संध्याकाळी सुवासिनींसह सावित्रीची कथा श्रवण करावी. या व्रतात सावित्रीच्या मूर्तीची पूजा सांगितलेली असली तरी रूढी मात्र वेगळी आहे. सावित्रीचा पती सत्यवान वडाच्या झाडाखाली गतप्राण झाला आणि पुन्हा तिथेच सजीव झाला, या संकेताला अनुसरून स्त्रिया या दिवशी वडाचीच पूजा करतात. त्यासाठी त्या वटवृक्ष असेल त्या ठिकाणी जाऊन वडाच्या मुळाशी पाणी घालतात आणि त्याला प्रदक्षिणा घालून सुताचे वेष्टण करतात; नंतर त्याची पूजा करतात; नंतर त्याच्या मुळाशी असलेल्या सावित्री-ब्रह्मदेव, सत्यवान-सावित्री, धर्मराज व नारद यांच्या प्रतिमांचे पूजन करतात व प्रार्थना करतात.


वड जवळपास नसेल, तर वडाची फांदी कुंडीत रोवून किंवा वटसावित्रीचे चित्र भिंतीवर चिकटवून त्याची पूजा करण्याचीही प्रथा आहे. पूजेनंतर सुवासिनींना सौभाग्यवायने देतात.
व्रताचे उद्यापन करताना ज्येष्ठ शुक्ल द्वादशीला अल्पाहार करतात. त्रयोदशीच्या दिवशी व्रताचा संकल्प करतात. वटवृक्षाच्या मुळाशी किंवा घरी चंदनाने काढलेल्या वटवृक्षाच्या मुळाशी सर्वतोभद्र मंडलावर कलश मांडतात आणि त्याच्यावर सात धान्यांनी भरलेले वेळूचे शिप्तर ठेवतात. त्याच्याजवळच चांदीचा वटवृक्ष, लाकडांचा भारा, कु-हाड व चांदीचा रथ मांडतात. रथात चांदीचा पलंग मांडून त्याच्यावर ब्रह्मा, सावित्री, सत्यवान, त्याची पत्नी सावित्री, यमधर्म आणि नारद यांच्या सुवर्णाच्या प्रतिमा ठेवतात. सुवर्णाच्या प्रतिमा शक्य नसल्यास मातीच्या प्रतिमा ठेवतात व त्यांची पूजा करतात. रात्री सावित्रीचे चरित्रकथन, नृत्य, गीत इत्यादी कार्यक्रम करतात. चवथ्या दिवशी आचार्यद्वारा हवन व यथाशक्ती चोवीस, सोळा, बारा किंवा आठ दांपत्यांची पूजा करतात. गोदान, शय्यादान व प्रतिमादान देऊन आणि ब्राह्मणभोजन घालून व्रताची समाप्ती करतात.
या व्रताची कथा - पूर्वी भद्रदेशात अश्वपती नावाचा एक परम धार्मिक व प्रजापालनतत्पर असा राजा होऊन गेला. त्याला सर्व सुखे होती; पण पोटी संतान नसल्यामुळे तो फार दुःखी होता. त्याने उग्र तपश्चर्या करून ब्रह्मपत्नी सावित्रीला प्रसन्न करून घेतले. तिने राजाला ‘तुला सर्वगुणसंपन्न, तेजस्वी व लावण्यवती कन्या होईल’ असा वर दिला. त्याप्रमाणे राजाला कन्या झाली. सावित्रीच्या कृपाप्रसादाने झाली, म्हणून राजाने तिचे नाव सावित्री ठेवले. होता होता सावित्री मोठी झाली ; पण तिच्या गुणसंपदेने व तेजस्वीपणामुळे दिपून जाऊन कोणी राजपुत्र तिला वरायला तयार होईना. तेव्हा राजाज्ञेने ती स्वतःच राजपुरोहिताबरोबर वरसंशोधनार्थ बाहेर पडली. शाल्व देशाचा राजा द्युमत्सेन याचा पुत्र सत्यवान याला तिने पसंत केले. द्युमत्सेन अंध होता व शत्रूंनी राज्यभ्रष्ट केल्यामुळे तो आपली पत्नी व एकुलता एक मुलगा सत्यवान यांच्यासह अरण्यात राहात होता.
सत्यवानाला मनाने वरून सावित्री घरी परतली, त्यावेळी नारदमुनी तेथे आलेले होते. सावित्रीने सत्यवानाची निवड केली, हे ऐकून नारदांना दुःख झाले. ते अश्वपतीला म्हणाले, ‘सत्यवान अल्पायुषी असून, आजपासून एका वर्षाने त्याचा मृत्यू होणार आहे. तेव्हा सावित्रीने दुसरा वर निवडावा.’ पण सावित्री आपल्या निवडीबाबत अढळ राहिली. तेव्हा तिला आशीर्वाद देऊन नारद निघून गेले.
त्यानंतर अश्वपतीने सावित्रीचा सत्यवानाशी विवाह करून दिला. सावित्रीने मग उंची वस्त्राभरणांचा त्याग केला व ती साधी वस्त्रे नेसून राहू लागली. सासूसासरे व पती यांची सेवा करण्यात ती आपला काल घालवू लागली. सत्यवानाचा मृत्यू चार दिवसांवर येऊन ठेपला, तेव्हा सावित्रीने त्रिरात्र सावित्रीव्रत करण्याचा संकल्प केला. व्रताचे तीन दिवस संपले व चौथा दिवस उजाडला. हाच सत्यवानाचा मृत्युदिन होता. त्या दिवशी सत्यवान दर्भ व काष्ठे आणण्यासाठी वनात गेला, तेव्हा सावित्रीही त्याच्याबरोबर गेली. सरपणासाठी लाकडे तोडीत असताना एकाएकी सत्यवानाचे डोके दुखू लागले, म्हणून तो सावित्रीच्या मांडीवर डोके टेकून थोडा वेळ निजला. तेवढ्यात यमदूत त्याचे प्राण हरण करण्यासाठी तिथे आले. पण सावित्रीच्या तेजामुळे ते सत्यवानाचे प्राण हरण करू शकले नाहीत. तेव्हा यमधर्म स्वतः तेथे आला आणि सत्यवानाचे प्राण खेचून घेऊन जाऊ लागला. सत्यवानाच्या शवाला कोणी स्पर्श करू नये, म्हणून जरूर ती तजवीज करून सावित्रीही यमधर्माच्या मागून निघाली. यमधर्माने तिला परत जायला सांगितले, तरी ती परत फिरली नाही. हळूहळू यमाशी युक्तिवाद करून तिने सास-याची दृष्टी आणि गेलेले राज्य परत मिळविले; तसेच सत्यवानाचे प्राणही परत मिळविले. सर्वांना फार आनंद झाला. सावित्रीने यथाविधी पारणे व व्रताचे उद्यापन केले. त्यानंतर अनेक वर्षे राज्योपभोग, ऐश्वर्य, पुत्रप्राप्ती, इत्यादी सुखे भोगून शेवटी ती दोघे स्वर्गाला गेली.
भरतखंडात अनेक पतिव्रता प्रसिद्ध आहेत; पण त्याच सावित्री हीच आदर्श मानलेली आहे. एखाद्या सुवासिनीने दुस-या स्त्रीला नमस्कार केला असता, ती ‘जन्मसावित्री हो’ असाच आशीर्वाद तिला देते. सावित्री हे भारतीय संस्कृतीत अखंड सौभाग्याचे प्रतीक ठरले आहे.
बंगालमध्ये वटसावित्रीव्रत करण्याची रीत थोडी वेगळी आहे. बंगाली सुवासिनी या दिवशी आपल्या पतीची पूजा करतात. त्या प्रसंगी पतीच्या अंगाला सुगंधी तेल व चंदनाची उटी लावतात, त्याच्या गळ्यात फुलांचा हार घालतात आणि त्याला नवीन वस्त्रे देतात. याव्यतिरिक्त, त्या यमाचीही पूजा करतात आणि त्याला फुले, फळे व वडाची डहाळी अर्पण करतात.
  • गरोदर स्त्री प्रसूत होईपर्यंत वटपूजन पूजन करु शकते.
  • सौभाग्य अखंड राहण्यासाठी हे व्रत आहे.
  • जन्मोजन्मी हाच पति मिळावा म्हणून हे व्रत आहे, हा समज चुकीचा आहे.भारत व भारताच्या पश्चिमेकडील देशांमध्ये वटपूजन 19 रोजी
  • भारताच्या पूर्वेकडील देशांमध्ये वटपूजन 20 रोजी

Tuesday, 7 June 2016

हवामान व पर्जन्य विचार 2016


३ जून ची रवि शनि प्रतियुति पर्जन्यस्तंभक असल्याने मान्सूनचे आगमन वेळेवर होणार नाही असे दिसते. यावर्षी पावसाच्या नक्षत्रांपैकी ३ ते ४ नक्षत्रांचा पाऊस होईल मात्र कशीबशी सरासरी गाठेल असे वाटते. 
हवामान खाते जरी सरासरी पेक्षा अधिक पाऊस होईल असे आत्ता सांगत असले तरी, साधारण २ वर्षांपूर्वी गणित करून ज्योतिषशास्त्राच्या सहाय्याने वर्तविलेले हे अंदाज आहेत.

मृग नक्षत्र

दि. ७ जून २०१६ रोजी मंगळवारी रात्री ११ वा. ५६ मि. नी सूर्य मृग नक्षत्रात प्रवेश करतो. प्रवेश समयी कुंभ लग्न उदित असून वरूण मंडल योग आहे. या नक्षत्राचे वाहन बेडूक असून गुरू ग्रह जलनाडीत आहे. २५ मे ची पर्जन्यस्तंभक शुक्र मंगळ प्रतियुति, ४ जून ची शुक्र शनि यांची प्रतियुति, ६ जूनची पर्जन्यकारक रवि शुक्र युति, ९ जून ची बुध मंगळ प्रतियुति यांचा विचार करता या नक्षत्राच्या पावसाचा अंदाज हुलकावण्या देणारा दिसतो. उष्णतामानातील फरक, वारा सुटणे यामुळे पाऊस सर्वत्र होणार नाही आणि पर्जन्यमान मध्यम राहील. दि. ८ ते १३ पाऊस अपेक्षित.

आर्द्रा नक्षत्र

दि. २१ जून २०१६ रोजी मंगळवारी रात्री ११ वाजता सूर्य आर्द्रा नक्षत्रात प्रवेश करतो. त्यावेळेस कुंभ लग्न असून वरूण मंडल योग आहे. या नक्षत्राचे वाहन उंदीर असून गुरू जलनाडीत आहे. ६ जूनच्या रवि शुक्र युतीचा परिणाम म्हणून या नक्षत्रात पाऊस मध्यम मानाने होईल. मात्र २० जून च्या बुध शनि प्रतियुतीमुळे पाऊस विखुरला जाईल. दि. २२ ते २७ आणि जुलै ३ व ४ या दिवसात पाऊस होईल.

पुनर्वसु नक्षत्र

दि. ५ जुलै २०१६ रोजी मंगळवारी रात्री १०।३४ वाजता सूर्याचे पुनर्वसु नक्षत्र सुरू होत आहे. त्यावेळेस कुंभ लग्न उदित होत असून वरूण मंडल योग आहे. या नक्षत्राचे वाहन कोल्हा असून रवि, चंद्र, गुरू, शुक्र हे ग्रह जलनाडीत आहेत त्यामुळे व १६ जुलैच्या बुध शुक्र युतीमुळे ढग येणे, वारा सुटणे आणि पाऊस पडणे या घटना घडतील. मात्र पावसाचे मान मध्यम राहील. दि. ६ ते १० व १६, १७ जुलै रोजी पाऊस अपेक्षित.

पुष्य नक्षत्र

दि. १९ जुलै २०१६ रोजी मंगळवारी रात्री १० वा. ०७ मि. नी सूर्य पुष्य नक्षत्रामधे प्रवेश करतो. प्रवेश समयी कुंभलग्न उदित असून अग्निमंडल योग आहे. रवि, चंद्र, बुध, गुरू व शुक्र जलनाडीत असून या नक्षत्राचे वाहन मोर आहे. १६ जुलै रोजी झालेल्या बुध शुक्र युतीचा आणि ग्रहस्थिति व वाहन मोर यांचा विचार करता उष्णता मानातील फेरफारांमुळे खंडीत पर्जन्यवृष्टि होईल. काही ठिकाणी जोरदार वृष्टि होईल. दि. १९ ते २४ व ३०, ३१ या दिवसात पाऊस होईल.

आश्लेषा नक्षत्र

दि. २ ऑग. २०१६ रोजी मंगळवारी रात्री ९ वा. ०१ मि. नी सूर्याचे आश्लेषा नक्षत्र सुरू होत आहे. त्यावेळी कुंभ लग्न असून अग्निमंडल योग आहे. या नक्षत्राचे वाहन हत्ती आहे आणि रवि, चंद्र बुध, गुरू, शुक्र हे ग्रह जलनाडीत आहेत.  ७ ऑग. ची बुध नेपचून प्रतियुति, आणि १४ ऑग. ची शुक्र नेपचून प्रतियुति पर्जन्यास मध्यम अनुकूल आहे. तसेच वाहन हत्ती पर्जन्यकारक असल्याने या नक्षत्राचा दमदार पाऊस अपेक्षित आहे. दि. २ ते ६, व ११, १२ या दिवशी पाऊस होईल.

मघा नक्षत्र

दि. १६ ऑग. २०१६ रोजी मंगळवारी सायं. ६।४० वाजता सूर्याचे मघा नक्षत्र सुरू होते. त्यावेळी मकर लग्न उदित असून इंदूमंडल योग आहे. या नक्षत्राचे वाहन बेडूक असून रवि, चंद्र, बुध, गुरू शुक्र जलनाडीत आहेत. २२ ऑग. ची बुध गुरू युति, २४ ऑग. ची मंगळ शनि युति, आपत्ति दर्शक आहे आणि २७ ऑग. ची गुरू शुक्र युति अतिवृष्टि करणारी आहे. या नक्षत्राचा पाऊस दमदार होईल असे दिसते. दि. १७, १८, १९, २५ ते २९ या दिवशी पाऊस अपेक्षित आहे.

पूर्वा नक्षत्र

दि. ३० ऑगस्ट २०१६ रोजी मंगळवारी दुपारी २ वाजून ४० मिनिटांनी सूर्याचा पूर्वा नक्षत्रात प्रवेश होत आहे. प्रवेश समयी धनु लग्न असून वरूण मंडल योग आहे. रवि, चंद्र, बुध, गुरू व शुक्र जलनाडीत आहेत. या नक्षत्राचे वाहन गाढव आहे दि. २९ ऑग. रोजी झालेली बुध शुक्र युति, २ सप्टें. ची बुध गुरू युति आणि १२ सप्टें. ची रवि-बुध युति यांचा एकत्रित परिणाम म्हणून या नक्षत्राच्या उत्तरार्धात ब-यापैकी पाऊस अपेक्षित आहे. दि. ऑग ३१, सप्टें. १, २, ३ व ९ ते १२ पाऊस अपेक्षित.

उत्तरा नक्षत्र

दि. १३ सप्टेंबर २०१६ रोजी मंगळवारी सकाळी ८।२७ वाजता सूर्य उत्तरा नक्षत्रात प्रवेश करतो. प्रवेश समयी कन्या लग्न असून वायुमंडल योग आहे. या नक्षत्राचे वाहन घोडा आणि रवि, चंद्र, बुध, गुरू हे ग्रह जलनाडीत आहेत. १२ सप्टें. ला झालेली रवि बुध युति, १८ सप्टें. ची शुक्र हर्शल युति, पर्जन्यास अनुकूल असली तरी पावसाचे मान मध्यम राहिल. खंडीत वृष्टि होईल. दि. १३, १४, १८ ते २२ या कालावधीत पाऊस होईल.

हस्त नक्षत्र

दि. २६ सप्टेंबर २०१६ रोजी सोमवारी रात्री १२।०० वाजता सूर्य हस्त नक्षत्रात प्रवेश करतो त्यावेळी वरूण मंडल योग आहे. या नक्षत्राचे वाहन उंदीर असून चंद्र, बुध, गुरू जलनाडीत आहेत. या नक्षत्राच्या सुरूवातीलाच पर्जन्यकारक रवि गुरू युति आहे, याचा परिणाम म्हणून चांगला पाऊस अपेक्षित आहे. सप्टें. २७ ते ३०, अक्टो ३, ४, ८, ९ या तारखाना पाऊस अपेक्षित.

चित्रा नक्षत्र

दि. १० अक्टोबर २०१६ रोजी सोमवारी दुपारी १२।५५ वाजता सूर्य चित्रा नक्षत्रात प्रवेश करतो. प्रवेश समयी धनु लग्न असून वरूण मंडल योग आहे. या नक्षत्राचे वाहन गाढव आहे. ११ अक्टो. ची बुध गुरू युति, १५ अक्टो. ची रवि
 हर्शल प्रतियुति, २० अक्टो. ची बुध हर्शल प्रतियुति यांचा एकत्रित परिणाम म्हणून पर्जन्यमान मध्यम राहील. दि. १० ते १४, २१ व २२ या कालावधीत पाऊस होईल.

स्वाती नक्षत्र

दि. २३ अक्टोबर २०१६ रोजी रविवारी रात्री ११ वाजून २९ मिनिटांनी स्वाती नक्षत्र सुरू होते. त्यावेळी मिथुन लग्न असून वायुमंडल योग आहे. या नक्षत्राचे वाहन मेंढा आहे. २७ अक्टोची रवि बुध युति, २९ अक्टोची शुक्र शनि युति पर्जन्यास अनुकूल आहे. या नक्षत्राचा पाऊस मध्यम मानाने होईल. रब्बी पिकांना उपयुक्त होईल. दि. २४ ते २७ व नोवें. ४, ५ या दिवशी पाऊस अपेक्षित.








Monday, 6 June 2016

पंचांगाचे सामाजिक जीवनातील स्थान

समाजात रोजच्या जीवनात कोणतेही काम करते वेळी; काळ, वेळ, दिवस पाहिला जातो. मग ते घरात नुकतेच जन्मलेले मूल असो, नूतन घराचा प्रारंभ असो, नवीन व्यवसायाची सुरूवात असो किंवा सण, व्रत, उत्सव असो. फार पूर्वीपासून ही परंपरा आहे. पूर्वी राजे महाराजे सुद्धा मोठमोठ्या मोहिमा आखतांना योग्य काळ, वेळ, दिवस पाहूनच मोहिमा आखत असत. या सर्वांमागे त्या मोहिमा यशस्वी व्हाव्यात हिच एक अपेक्षा असे. यालाच मुहूर्त म्हणले जाते.
मुहूर्त हे पंचांगातील तिथी, वार, नक्षत्रांमुळे मिळत असल्याने समाज जीवनांत पंचांगाचे महत्त्व आजही खूप आहे. पंचांगातील ३।। मुहूर्त असलेले गुढी पाडवा, अक्षय्य तृतीया, दसरा, दिवाळीचा पाडवा ह्या अत्यंत शुभ दिवशी विविध वस्तूंच्या खरेदी विक्रीत वाढ होते दुकानदार देखील अशा सणांच्या दिवशी मोठ्या जाहिराती करून आवाहन करतात. पंचांगातील ३।। मुहूर्ताच्या शुभ दिवशी विक्री होऊन व्यापारी वर्गांत उत्साह निर्माण होतो. आर्थिक उलाढाल मोठ्या प्रमाणात झाल्याने बाजारांत अनेक गोष्टींवर त्याचा परिणाम दिसून येतो.
अनेक गावांतील विविध देवतांच्या जत्रा, उत्सव हे सर्व तिथीशी संबंधित आहेत. या यात्रा, जत्रा, उत्सवांमुळे व्यापार वाढतो. या यात्रांमुळे ठीक ठिकाणच्या पर्यटनालाही चालना मिळते. याचा अनेक छोट्या मोठ्या व्यावसायिकांना लाभ होतो. विविध वस्तूंची देवाण घेवाण होते. संस्कृती संवर्धन होते. याचे बोलके उदाहरण म्हणजे पंढरपूरची आषाढी, कार्तिकी वारी, जेजुरीच्या खंडोबाचा यात्रा इ. अनेक सांगता येतील. या यात्रा, सणांमुळे फुले- नारळ-पूजा साहित्य विकणा-या लोकांची उपजीविका होते. ही दिसण्यात लहान गोष्ट असली तरी हजारो लोकांना सण-व्रतांमुळे खूप फायदा होतो. त्यांचे जीवन घडविण्यांत पंचांगाचा या अर्थानें खूप मोठा हातभार आहे.
समाजातील सामाजिक व कौटुंबिक नात्यांमधील संबंध दृढ करण्यासाठी अनेक सण-उत्सव यांचा फार मोठा सहभाग असतो. राखी पौर्णिमा-भाऊ-बहिण प्रेमाचा सण, धनत्रयोदशी – सर्व डॉक्टर व वैद्यांच्या आदराचा सण, लक्ष्मी पूजन (अमावस्या) मालक-नोकर प्रेम व आदर व्यक्त करण्याचा सण, दिवाळी पाडवा-पतिपत्नींचा परस्पर आदराचा उत्सव, भाऊबीज-बहिण भावाच्या अतूट आदरचा सण. गणेशोत्सव-समाजातील सर्व थरातील लोकांनी एकत्र येवून उत्साहाने साजरा करण्याचा उत्सव, दसरा-समाजातील सर्वांनी एकमेकांना प्रेमालिंगन देऊन शुभेच्छा व शुभाशीर्वाद देण्याचा सण हे सर्वही पंचांगामुळेच समाजात घडते आहे.
गुरु, शुक्र अस्त जेव्हा असतो तेव्हा सोने, कापड, केटरर्स, मंगल कार्यालये इत्यादी लहान मोठ्या व्यवसायात मंदी दिसून येते. कारण या काळांत लग्न, मुंजी इत्यादि कार्ये होत नाहीत. या उलट जेव्हा हे अस्त नसतात आणि अधिक कार्ये होतात तेंव्हा वरील सर्व व्यवसायात तेजी दिसून येते; सगळीकडे समाजातील सर्व थरातील लोकांची एकच एक गर्दी झालेली पहायला मिळते. सर्व लहानमोठे व्यावसायिक उत्साही व आनंद होतांना दिसतात. तसाच काहीसा प्रकार गुरुपुष्यामृत इ. योगांच्या वेळेस पाहायला मिळतो. एक प्रकारे देशाची अर्थव्यवस्था सण, उत्सव, व्रतांच्या भोवतीच फिरताना दिसते. हे सण आपल्याला कधी आणि कसे साजरे करावयाचे हे फक्त पंचांगाच्याच सहाय्याने कळू शकते.
शेतकरीही त्यांच्या शेतातील नांगरणी, पेरणी, कोळपणी, काढणी, मळणी, इत्यादी सर्व मशागतीची कामे वेळ, दिवस, नक्षत्र हे पंचांगावरून पावसाची नक्षत्रे पाहूनच ठरवितात. तसेच अनेक मोठे उद्योजक व्यावसायिक हे आपल्या व्यवसाय/उद्योगाचा प्रारंभ शुभमुहूर्त पंचांगात पाहूनच ठरवितात.
विविध प्राणी, पशू इत्यादींशी जवळीक, साधण्यासाठी काही सणांची योजना आहे. दिव्यांची अवस - या दिवशी अंधाराचा नाश करून प्रकाश देणा-या दिव्यांची पूजा करणे. नागपंचमी – या दिवशी शेतक-यांचा मित्र समजला जातो अशा नागोबाची पूजा करून कृतज्ञता व्यक्त करतात. बैल पौळा – या दिवशी आपल्या बरोबर आपल्यासाठी कष्ट करणा-या बैलांची पूजा करावयाची. वसुबारस – (गोपूजन) या दिवशी आपल्याला पूर्णान्न असे अतिशय उपयुक्त दूध देणा-या गोमातेचे पूजन करणे. इत्यादी. अशा प्रकारे अनेक पशू, पक्षी, प्राणी यांचे पूजनाचे सण उत्सव हे पंचांगामुळेच समजतात.
सकाळी उठल्यापासून धार्मिक कर्म करतेवेळी तिथी, वार, नक्षत्र यांचा उच्चार, उल्लेख करण्यासाठी पंचांग हवेच. दररोज चांगला, वाईट, शुभ, अशुभ, दिवस पाहण्यासाठी पंचांग हवेच. आज पंचांगाबरोबरज कॅलेंडर (दिनदर्शिका) बाजारात आहे. पण ते कॅलेंडर जर फक्त तारीख, वार व इंग्रजी महिना असे असेल तर सर्वसामान्यांच्या रोजच्या कामात फारसा उपयोग होत नाही. तर त्यामध्ये तिथी, वार, विविध सण, व्रत, नक्षत्र, शुभाशुभ दिवस हे सर्वही असल्यामुळेच कॅलेंडरही सगळ्यांच्या घरात असते. मात्र या कॅलेंडरचा जो गाभा असतो तो पंचांगाचाच असतो.

केवळ हिंदू धर्मीयांच्या सण, उत्सवांपूरतीच आता पंचांगाची व्याप्ती राहिलेली नाही. खगोलीय गणिताच्या सहाय्याने साजरे होणारे विविध धर्मीयांचे सण उत्सव पंचांगावरूनच समजतात. गुडफ्रायडे, ईद, पारशी वर्षारंभ अशा अनेक सणांसाठी समाजातील सर्वच जाति पंथ पंचांगावर अवलंबून आहेत.

पंचांग हे फक्त धर्म, श्रद्धा, भक्ती यांवर आधारित नसून याच बरोबर ते आकाशातील ग्रहगोलांच्या खगोलीय गणितावरही आधारित आहे. त्यामुळे खगोलप्रेमी, आकाश निरीक्षण करणारे, विद्यार्थी यांना देखील पंचांग मार्गदर्शक ठरते. अशा प्रकारे पंचांगाचा समाजाच्या जडणघडणीत फार मोठा सहभाग आहे.