सामाजिक स्वास्थ्यासाठी दिवाळी उत्सव
आपल्याकडे साधारण पावसाळा सुरु झाला की सणांची रेलचेलच असते
एका पाठोपाठ एक एक सण क्रमानी समोर येत जातात, नवरात्र संपे पर्यंत म्हणजे दसऱ्या
पर्यंत वातावरण धार्मिक आणि उत्साहाने भारलेले असते, मात्र दसऱ्याचे सीमोल्लंघन
झाले की चाहूल लागते ती पुढच्या मोठ्या सणाची ज्या सणाची लहानथोर सगळेच आतूरतेनी
वाट पाहात असतात अशा दिवाळीची.
वर्षभरातील सर्व सणांमध्ये दीपावलि हा सण सर्वात मोठा,
आनंददायी असा सण आहे. इतर सर्व सण - उत्सवांपेक्षा दिवाळीच्या चार दिवसात होणारी
उलाढाल, दिवाळीमध्ये असलेले वातावरण पावसाळा नुकताच संपून हवेमध्ये आलेल्या
गारव्याने वाटणारा प्रसन्नपणा सर्वांनाच आनंद देणारा असतो. याचे कारण नरक चतुर्दशी
ते कार्तिक शु. प्रतिपदा या तीन दिवसांत जनतेने मौज मजा करावी, गोडधोड खावे, आनंदी
वातावरणात रहावे अशी खुद्द बळीराजाचीच इच्छा आणि त्याला मिळालेला तसा वर यामुळे
दिवाळीला विशेष महत्त्व प्राप्त झालेले आहे.
गोवत्स द्वादशी –
गोवत्स
द्वादशीलाच वसुबारस म्हणूनही ओळखले जाते. हिंदू धर्मामध्ये गाईला देवता मानले
जाते, गाई विषयी व तिच्या वासराविषयी अत्यंतिक प्रेम, जिव्हाळा दिसून येतो दिवाळीच्या
पूर्व संध्येस या गाईचे व तिच्या वासराचे पूजन करून उत्सवाची सुरुवात केली जाते.
या दिवशी सायंकाळी वासरासह असलेल्या गाईचे पूजन करून तिला नैवेद्य दाखविला जातो.
गाईचे पाठीमागून काही पावले चालण्याची देखील परंपरा अनेक प्रांतांमध्ये दिसून
येते. या वर्षी 16 ऑक्टोबर रोजी सोमवारी गोवत्स द्वादशी म्हणजेच वसुबारस आहे.
धनत्रयोदशी -
धनत्रयोदशीच्या दिवशी देवतांचे जे वैद्य म्हणून
पूजले जातात त्या धन्वंतरीचे पूजन केले जाते, कुटुंबातील, मित्र परिवारातील
सर्वांच्या आरोग्याकरिता प्रार्थना केली जाते. तसेच या दिवशी घरोघरी कणकेचा दिवा
करून त्याची ज्योत दक्षिण दिशेस होईल अशा पद्धतीने तो दिवा ठेवून हात जोडून
मृत्यूना पाशदंडाभ्यां कालेन श्यामयासह ।
त्रयोदश्यां
दीपदानात् सूर्यजः प्रीयतां मम ।।
असा श्लोक म्हणून
दिव्याला नमस्कार करावा. यावर्षी 17
ऑक्टोबर रोजी मंगळवारी धनत्रयोदशी आहे.
दीपावलि उत्सवामधील पहिला दिवस नरक चतुर्दशी -
नरकासुर नावाचा एक
राजा होऊन गेला, महाभारताच्या कालखंडातील या राजाने नरकासुराने १६ हजार १०८ स्त्रीयांना
आपल्या बंदीखान्यात डांबून ठेवले होते. हा नरकासुर प्रजेचाही खूप छळ करीत असे.
भगवान श्रीकृष्णांनी या नरकासुराचा वध केला तो दिवस होता आश्विन कृष्ण चतुर्दशीचा,
नरकासुराचा वध करून स्त्रीयांची मुक्तता केली. नरकासुराने श्रीकृष्णाकडे शेवटी एक वर
मागितला की, आजच्या तिथीला पहाटे चंद्रोदयाचे वेळेस जो मंगलस्नान करेल त्याला
नरकाची पीडा होऊ नये. म्हणून नरक चतुर्दशीला पहाटे चंद्रोदयाच्या सुमारास अभ्यंगस्नान
करणे महत्त्वाचे मानले आहे.
शरद् ऋतुचा शेवट
आणि हेमंत ऋतुचे आगमन अशा संधीकालावर दिवाळीचा सण साजरा करताना पुढे येणा-या
थंडीच्या काळासाठी तेल लावून स्नान करण्याची सुरुवात नरक चतुर्दशीच्या
अभ्यंगस्नानापासून होते. अकालीमृत्यु येऊ नये म्हणून नरक चतुर्दशीचे दिवशी यमतर्पण
करावयास धर्मशास्त्राने सांगितले आहे. अपमृत्यु (अकाली, अपघाती) येऊ नये म्हणून
यमाला १४ नावांनी तर्पण करून त्याची प्रार्थना करण्यास सांगितले आहे. पूर्वी पेक्षा
सध्याच्या काळात वेगाने चालविल्या जाणा-या वाहनांमुळे अपघाताचे भय वाढले आहे.
अपघात, धावपळीचे जीवन, इ. अनेक कारणांमुळे अपमृत्यूचा म्हणजेच अकालीमृत्युचा संभव
वाढत असल्याने नरकचतुर्दशीला यमतर्पण करून अपमृत्यु निवारणासाठी यमाची प्रार्थना
सर्वांनी करावयाची असते. यंदाचे वर्षी 18
ऑक्टोबर रोजी बुधवारी नरक चतुर्दशी आहे.
लक्ष्मीकुबेर पूजन -
शेतक-यांसाठी
ज्याप्रमाणे मार्गशीर्षातील वेळा अमावास्या शुभ आहे, त्याचप्रमाणे व्यापारी वर्गासाठी
आश्विनातील अमावास्येचे महत्त्व आहे. पुराणातील कथेप्रमाणे आश्विन अमावास्येस
रात्रीच्या वेळेस लक्ष्मी सर्वत्र संचार करीत असते. जेथे स्वच्छता, शोभा, आनंद,
उत्साह आहे अशा ठिकाणी ती आकर्षित होते. म्हणून लक्ष्मीपूजनाचे दिवशी घर, दुकान
झाडून, स्वच्छ करून, सुशोभित करून सूर्यास्तानंतर लक्ष्मी व कुबेर यांचे आनंदाने
पूजन करून ऐश्वर्य, संपत्ति, समृद्धीसाठी प्रार्थना करावयाची असते.
“नमस्ते
सर्वदेवानां वरदासि हरिप्रिये।
या
गतिस्त्वत्प्रपन्नानां सा मे भूया तव दर्शनात्।।” (अशी लक्ष्मीची प्रार्थना करावी)
आणि
“धनदाय नमस्तुभ्यं निधिपद्माधिपायच।
भवन्तु त्वत्प्रसादेन
धनधान्यादिसम्पदः।।” (अशी कुबेराची प्रार्थना करावी.)
यापूजेत समृद्धीचे प्रतीक म्हणून साळीच्या लाह्या आवश्यक
असतात. तसेच झेंडूची फले, बत्तासे या समृद्धी दर्शक गोष्टींचा देखील समावेश केलेला
असतो. या वर्षी 19 ऑक्टोबर, गुरुवारी सर्वांनी घरोघरी मनोभावे लक्ष्मी व कुबेराचे
पूजन करावयाचे आहे. सायंकाळी 04.45 पासून रात्री 08.40 पर्यंत किंवा रात्री 9.35
नंतर 11.55 पर्यंत या वेळेमध्ये कधीही आपल्या परंपरेप्रमाणे लक्ष्मीपूजन करता
येईल.
बलिप्रतिपदा (दिवाळी पाडवा) -
साडेतीन
मुहूर्तांपैकी एक असलेला शुभफलदायी असा दिवस म्हणजे दिवाळी पाडवा किंवा
बलिप्रतिपदा, कार्तिक शुक्ल प्रतिपदेला बलिप्रतिपदा असे म्हणतात. या दिवशी दानशूर
अशा बळीराजाची पूजा करावयाची असते. पाटावर तांदूळांनी बलीची प्रतिमा काढून त्याचे
पूजन केले जाते. ज्याप्रमाणे चैत्र शुक्ल प्रतिपदेस शालिवाहन शक, नवे संवत्सर सुरु
होते, त्याप्रमाणे कार्तिक शुक्ल प्रतिपदेस विक्रम संवत्सर सुरु होते. या
बलिप्रतिपदेच्या दिवशी शोभन नावाचे 2068 वे संवत् सुरु होत आहे. या दिवशी व्यापारी
वर्षास सुरुवात होत असल्याने वहीपूजन, दुकानाची पूजा करून नवीन वर्षाचे स्वागत
केले जाते. या दिवशी पत्नीने पतीस ओवाळावे म्हणजे दोघांचे ही आयुष्य वाढते असे
पुराणात सांगितले आहे. दिवाळीतील इतर दिवसांप्रमाणेच या दिवशी देखील सकाळी लवकर
उठून अभ्यंगस्नान करून देव दर्शनास जावयाचे असते. या दिवशी भारतामध्ये अनेक ठिकाणी
गोवर्धन पूजनाचा मोठा उत्सव साजरा केला जातो. साडेतीन मुहूर्तापैकी एक दिवस
असल्याने अनेक नवीन संकल्प केले जातात, नव्या उद्योगांची सुरुवात करण्यास हा दिवस
शुभ आहे. या वर्षी 20 ऑक्टोबर रोजी शुक्रवारी भारतामध्ये सर्वत्र बलिप्रतिपदा
साजरी केली जाईल. व्यापाऱ्यांकरिता हा दिवस महत्त्वाचा असल्याने त्यांनी पहाटे 3.35
ते 6.35 किंवा सकाळी 8.05 ते 11.05 या पैकी कोणत्याही एका मुहूर्तावर
परंपरेप्रमाणे वहीपूजन करून नवीन वर्षाची सुरुवात करावी.
यमद्वितीया (भाऊबीज) -
नरक चतुर्दशी,
अमावास्या व बलिप्रतिपदा हे दिवाळीचे मुख्य तीन दिवस आहेत. मात्र या तीन दिवसांना
जोडून येणारी भाऊबीज सुद्धा दिवाळीच्या दिवसात गणली जाते. कार्तिक शुक्ल
द्वितीयेच्या दिवशी यमराज आपल्या बहिणीच्या हातचे भोजन करून बहिणीचा सत्कार करीत
असे, अशी पुराणात गोष्ट आहे. म्हणून या दिवशी बहिणीने भावाला जेवावयास बोलावून
त्याला ओवाळावे असे सांगितले आहे. यावर्षी 21 ऑक्टोबर रोजी शनिवारी भाऊबीज म्हणजेच
यमद्वितीया आहे.
दिवाळीच्या या चार दिवसात सर्वत्र आनंदोत्सव साजरा करावयाचा
असल्याने दीपमाळ, आकाशदिवे, दिव्यांची रोषणाई करून दीपोत्सव केला जातो. म्हणून या
चार दिवसांना दीपावली किंवा दिवाळी असे म्हटले जाते.
वर्षभरातील
इतर सण - उत्सव यामध्ये धार्मिक स्वरूप मोठ्या प्रमाणात असते. त्याप्रमाणे
दिवाळीचे स्वरूप नसते. सर्व समाजाने दुःख, भेदभाव विसरून चार दिवस आनंदात रहावयाचे
असते. काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत संपूर्ण भारतात दिवाळी साजरी करण्याची
पद्धति जवळजवळ सारखीच आहे. मुख्यतः घर, दुकान स्वच्छ करून, दिव्यांची रोषणाई,
फराळाचे पदार्थ, गोडधोड पक्वान्न करणे, अभ्यंगस्नान, दिवाळीच्या निमित्ताने
आप्तेष्टांनी एकत्र येणे इ. गोष्टी केल्या जातात पतीने पत्नीसाठी, भावाने
बहिणीसाठी, मालकांनी कर्मचा-यांसाठी भेटवस्तू देणे आणि स्नेहभाव दृढ करणे यामुळे
संपूर्ण समाजात - कुटुंबात एकोपा राखला जातो.
No comments:
Post a Comment