पंचांगाचे सामाजिक जीवनातील स्थान
समाजात रोजच्या जीवनात कोणतेही काम करते वेळी; काळ, वेळ, दिवस पाहिला जातो. मग ते घरात नुकतेच जन्मलेले मूल असो, नूतन घराचा प्रारंभ असो, नवीन व्यवसायाची सुरूवात असो किंवा सण, व्रत, उत्सव असो. फार पूर्वीपासून ही परंपरा आहे. पूर्वी राजे महाराजे सुद्धा मोठमोठ्या मोहिमा आखतांना योग्य काळ, वेळ, दिवस पाहूनच मोहिमा आखत असत. या सर्वांमागे त्या मोहिमा यशस्वी व्हाव्यात हिच एक अपेक्षा असे. यालाच मुहूर्त म्हणले जाते.
मुहूर्त हे पंचांगातील तिथी, वार, नक्षत्रांमुळे मिळत असल्याने समाज जीवनांत
पंचांगाचे महत्त्व आजही खूप आहे. पंचांगातील ३।। मुहूर्त असलेले गुढी पाडवा, अक्षय्य तृतीया, दसरा, दिवाळीचा पाडवा
ह्या अत्यंत शुभ दिवशी विविध वस्तूंच्या खरेदी विक्रीत वाढ होते दुकानदार देखील अशा सणांच्या दिवशी मोठ्या जाहिराती करून आवाहन करतात. पंचांगातील ३।। मुहूर्ताच्या शुभ दिवशी विक्री होऊन व्यापारी
वर्गांत उत्साह निर्माण होतो. आर्थिक उलाढाल मोठ्या प्रमाणात झाल्याने बाजारांत
अनेक गोष्टींवर त्याचा परिणाम दिसून येतो.
अनेक गावांतील विविध देवतांच्या जत्रा, उत्सव हे सर्व तिथीशी संबंधित आहेत. या यात्रा, जत्रा, उत्सवांमुळे व्यापार वाढतो. या यात्रांमुळे ठीक ठिकाणच्या पर्यटनालाही चालना मिळते. याचा अनेक छोट्या
मोठ्या व्यावसायिकांना लाभ होतो. विविध वस्तूंची देवाण घेवाण होते. संस्कृती संवर्धन होते. याचे बोलके उदाहरण म्हणजे
पंढरपूरची आषाढी, कार्तिकी वारी,
जेजुरीच्या खंडोबाचा यात्रा इ. अनेक सांगता येतील. या यात्रा, सणांमुळे फुले- नारळ-पूजा साहित्य विकणा-या लोकांची उपजीविका होते. ही दिसण्यात
लहान गोष्ट असली तरी हजारो लोकांना सण-व्रतांमुळे खूप फायदा होतो. त्यांचे जीवन
घडविण्यांत पंचांगाचा या अर्थानें खूप मोठा हातभार आहे.
समाजातील सामाजिक व कौटुंबिक नात्यांमधील संबंध दृढ करण्यासाठी अनेक
सण-उत्सव यांचा फार मोठा सहभाग असतो. राखी पौर्णिमा-भाऊ-बहिण प्रेमाचा सण,
धनत्रयोदशी – सर्व डॉक्टर व वैद्यांच्या आदराचा सण, लक्ष्मी पूजन (अमावस्या)
मालक-नोकर प्रेम व आदर व्यक्त करण्याचा सण, दिवाळी पाडवा-पतिपत्नींचा परस्पर
आदराचा उत्सव, भाऊबीज-बहिण भावाच्या अतूट आदरचा सण. गणेशोत्सव-समाजातील सर्व
थरातील लोकांनी एकत्र येवून उत्साहाने साजरा करण्याचा उत्सव, दसरा-समाजातील
सर्वांनी एकमेकांना प्रेमालिंगन देऊन शुभेच्छा व शुभाशीर्वाद देण्याचा सण हे
सर्वही पंचांगामुळेच समाजात घडते आहे.
गुरु, शुक्र अस्त जेव्हा असतो तेव्हा सोने, कापड, केटरर्स, मंगल कार्यालये
इत्यादी लहान मोठ्या व्यवसायात मंदी दिसून येते. कारण या काळांत लग्न, मुंजी
इत्यादि कार्ये होत नाहीत. या उलट जेव्हा हे अस्त नसतात आणि अधिक कार्ये होतात
तेंव्हा वरील सर्व व्यवसायात तेजी दिसून येते; सगळीकडे समाजातील सर्व थरातील लोकांची एकच एक गर्दी झालेली पहायला मिळते.
सर्व लहानमोठे व्यावसायिक उत्साही व आनंद होतांना दिसतात. तसाच काहीसा प्रकार
गुरुपुष्यामृत इ. योगांच्या वेळेस पाहायला मिळतो. एक प्रकारे देशाची अर्थव्यवस्था
सण, उत्सव, व्रतांच्या भोवतीच फिरताना दिसते. हे सण आपल्याला कधी आणि कसे साजरे
करावयाचे हे फक्त पंचांगाच्याच सहाय्याने कळू शकते.
शेतकरीही त्यांच्या शेतातील नांगरणी, पेरणी, कोळपणी, काढणी, मळणी, इत्यादी
सर्व मशागतीची कामे वेळ, दिवस, नक्षत्र हे पंचांगावरून पावसाची नक्षत्रे पाहूनच
ठरवितात. तसेच अनेक मोठे उद्योजक व्यावसायिक हे आपल्या व्यवसाय/उद्योगाचा प्रारंभ
शुभमुहूर्त पंचांगात पाहूनच ठरवितात.
विविध प्राणी, पशू इत्यादींशी जवळीक, साधण्यासाठी काही सणांची योजना आहे.
दिव्यांची अवस - या दिवशी अंधाराचा नाश करून प्रकाश देणा-या दिव्यांची पूजा करणे.
नागपंचमी – या दिवशी शेतक-यांचा मित्र समजला जातो अशा नागोबाची पूजा करून कृतज्ञता
व्यक्त करतात. बैल पौळा – या दिवशी आपल्या बरोबर आपल्यासाठी कष्ट करणा-या बैलांची
पूजा करावयाची. वसुबारस – (गोपूजन) या दिवशी आपल्याला पूर्णान्न असे अतिशय उपयुक्त
दूध देणा-या गोमातेचे पूजन करणे. इत्यादी. अशा प्रकारे अनेक पशू, पक्षी, प्राणी
यांचे पूजनाचे सण उत्सव हे पंचांगामुळेच समजतात.
सकाळी उठल्यापासून धार्मिक कर्म करतेवेळी तिथी, वार, नक्षत्र यांचा उच्चार,
उल्लेख करण्यासाठी पंचांग हवेच. दररोज चांगला, वाईट, शुभ, अशुभ, दिवस पाहण्यासाठी
पंचांग हवेच. आज पंचांगाबरोबरज कॅलेंडर (दिनदर्शिका) बाजारात आहे. पण ते कॅलेंडर
जर फक्त तारीख, वार व इंग्रजी महिना असे असेल तर सर्वसामान्यांच्या रोजच्या कामात
फारसा उपयोग होत नाही. तर त्यामध्ये तिथी, वार, विविध सण, व्रत, नक्षत्र, शुभाशुभ
दिवस हे सर्वही असल्यामुळेच कॅलेंडरही सगळ्यांच्या घरात असते. मात्र या कॅलेंडरचा
जो गाभा असतो तो पंचांगाचाच असतो.
केवळ हिंदू धर्मीयांच्या सण, उत्सवांपूरतीच आता पंचांगाची व्याप्ती राहिलेली नाही. खगोलीय गणिताच्या सहाय्याने साजरे होणारे विविध धर्मीयांचे सण उत्सव पंचांगावरूनच समजतात. गुडफ्रायडे, ईद, पारशी वर्षारंभ अशा अनेक सणांसाठी समाजातील सर्वच जाति पंथ पंचांगावर अवलंबून आहेत.
पंचांग हे फक्त धर्म, श्रद्धा, भक्ती यांवर आधारित नसून याच बरोबर ते आकाशातील ग्रहगोलांच्या खगोलीय गणितावरही आधारित आहे. त्यामुळे खगोलप्रेमी, आकाश निरीक्षण करणारे, विद्यार्थी यांना देखील पंचांग मार्गदर्शक ठरते. अशा प्रकारे पंचांगाचा समाजाच्या जडणघडणीत फार मोठा सहभाग आहे.
No comments:
Post a Comment