Sunday, 18 December 2016

अयन खरे कोणते ?

लेखाचे शीर्षक बुचकळ्यात टाकणारे आहे. उत्तरायण, दक्षिणायन हे शब्द ज्यांनी ऐकले आहेत त्यांना प्रश्न पडेल की, अयन ही घटना आहे. जे घडते ती घटना. मग त्यात खरे ? खोटे ? हा प्रश्न कुठे आला. काहींना मूलभूत प्रश्न पडेल की अयन म्हणजे काय ? हेच आम्हाला माहीत नाही. खरे की खोटे हा प्रश्न त्यानंतरचा. चला तर मग अयनही संकल्पना समजावून घेऊ या.

आपले निरीक्षण काय सांगते ?
आपण क्षितीजावर उदय पावणारे किंवा मावळणारे सूर्यबिंब पहा. काही दिवसांच्या निरीक्षणाने असे लक्षात येईल की दररोजचा सूर्योदय किंवा सूर्यास्त क्षितीज संदर्भाने एकाच ठिकाणी होत नाही. उदय पावणाऱ्या किंवा अस्तास जाणाऱ्या सूर्यबिंबाची जागा उत्तरेकडे किंवा दक्षिणेकडे हळूहळू सरकते. दीर्घ निरीक्षणाने आपल्या हे सुद्धा लक्षात येईल की सूर्यबिंबाची जागा क्षितीज संदर्भाने सरकण्यासही एक मर्यादा आहे. आयाम (amplitude) आहे. उदाहरणार्थ झोपाळा. झोपाळा काही जत्रेतील पाळण्यासारखा संपूर्ण फिरत नाही. दोन्ही टोकाकडे तो विशिष्ट मर्यादेपर्यंतच जातो. या मर्यादेलाच आयाम म्हणतात.

सूर्याचा उत्तर-दक्षिण आयाम
क्षितीज संदर्भाने सूर्याची उदयाची किंवा अस्ताची जागा उत्तरेकडे आणि दक्षिणेकडे विशिष्ट मर्यादेत बदलणे यास आपण सूर्याचा आयाम म्हणू या. असे का घडते ते पाहू या. पृथ्वीचे विषुववृत्त (equator) हा शब्द आपणास परिचयाचा आहे. पृथ्वीच्या विषुववृत्ताला समांतर असे एक वर्तुळ आकाशात स्थित आहे असे समजा.
या वर्तुळाला आपण आकाशातील विषुववृत्त (celestial equator) किंवा वैषुविकवृत्त म्हणू या. सूर्याभोवती परिभ्रमण करणाऱ्या पृथ्वीचा आस २३.५ अंशाने कलता आहे असे आपण ऐकलेले असते पण या कलतेपणाच्या परिणामाचा आपण पुरेसा विचार केलेला नसतो. या कलतेपणामुळे पृथ्वीच्या परिभ्रमणाचा मार्ग (कक्षा) आणि वैषुविकवृत्त एकमेकांना छेदतात. उगवत्या किंवा मावळत्या सूर्याची क्षितीज संदर्भाने उत्तर दक्षिण दिशेत विशिष्ट मर्यादेत जागा बदलणे हा या कलतेपणाचा निरीक्षणाने अनुभवाला येणारा परिणाम आहे. क्षितीजावरील पूर्व बिंदूच्या उत्तरेस २३.५ अंशावर जाण्याची कमाल मर्यादा सूर्याने गाठली की तो दक्षिणेकडे येऊ लागतो यास दक्षिणायन म्हणतात. या उलट पूर्वबिंदूच्या दक्षिणेस २३.५ अंशावर जाण्याची कमाल मर्यादा सूर्याने गाठली की तो उत्तरेकडे येऊ लागतो यास उत्तरायण म्हणतात. अशा तऱ्हेने उत्तरायण किंवा दक्षिणायन ही सूर्याच्या संदर्भाने आपल्याला अनुभवायला येणारी नैसर्गिक घटना आहे.
सारांश रूपाने सूर्याच्या तीन भ्रमणांचा आपण उल्लेख करू.
१)     सूर्य क्षितीजाच्या पूर्व भागात उगवून पश्चिम भागात मावळतो. हे सूर्याचे दैनिक भ्रमण आहे. हा पृथ्वीच्या परिवलनाचा (rotation) परिणाम आहे.
२)     तारकांच्या संदर्भाने सूर्याची जागा पश्चिमेकडून पूर्वेकडे थोडी थोडी सरकत जाते (दररोज साधारण १ अंश) हा पृथ्वीच्या परिभ्रमणाचा परिणाम आहे.
३)     सूर्याची उगवण्याची किंवा मावळण्याची जागा उत्तरेकडे किंवा दक्षिणेकडे हळूहळू सरकत जाते हा पृथ्वीच्या कलतेपणाचा परिणाम आहे. या तीनही गोष्टी एकाचवेळी होत असतात. यातील अयन या घटनेचा विशेष विचार करू.

सूर्याचे स्थान आणि परिभाषा.
कालमापनासाठी सूर्याच्या गतीचा आपण उपयोग करून घेतला. पृथ्वीची सूर्याभोवतीची एक प्रदक्षिणा म्हणजे वर्ष असे परिमाण आपल्याला मिळाले. वर्षाच्या ३६५ दिवसांचे स्थूलमानाने चार भाग आपणास निसर्गतःच करता आले. त्याचा संदर्भ म्हणजे सूर्यमार्गावरील (आयनिकवृत्त) सूर्याचे वैषुविकवृत्ताच्या संदर्भाने असणारे स्थान.
आयनिक वृत्त (सूर्याचा वार्षिक भ्रमण मार्ग) आणि वैषुविकवृत्त यांचे अर्थातच १८० अंशाच्या फरकाने असलेले दोन छेदनबिंदू यांना संपात बिंदू म्हणतात. (equinoctial points) ज्या बिंदूपाशी आल्यानंतर सूर्याचा पुढचा प्रवास वैषुविकवृत्ताच्या उत्तर बाजूस होतो. तो संपात बिंदू वसंत संपात बिंदू (Vernal equinox)” म्हणून ओळखला जातो. या बिंदूपासून साधारण तीन महिन्यांनी सूर्य वैषुविकवृत्ताच्या उत्तरेस २३.५ अंश जाण्याची कमाल मर्यादा गाठतो. या बिंदूला उत्तरविष्टंभ बिंदू (Summer Solstice) म्हणतात. येथून माघारी म्हणजे दक्षिणेकडे वळतो. ही एक घटना आहे. ती घडण्याचा एक क्षण असतो. या घटनेलाच आपण दक्षिणायन असे म्हणतो. याची तुलना आपल्याला व्यावहारिक उदाहरणाने करता येईल. विवाह अमुक दिवशी आहे असं आपण म्हणतो पण लग्न लागणे हा क्षण असतो. तसंच दक्षिणायन अमुक दिवशी आहे असे आपण म्हणतो. परंतु सूर्य उत्तरविष्टंभ बिंदूपाशी असण्याचा एक क्षण (एक विशिष्ट वेळ) असते.



आकृतीचे स्पष्टीकरण
ABCD             –          वैषुविकवृत्त.                   EDFB             –          आयनिकवृत्त.
B                     –          वसंत संपात बिंदू.            E                     –          उत्तरविष्टंभ बिंदू.
D                     –          शरद संपात बिंदू.            F                      –          दक्षिण बिष्टंभ बिंदू.
E ते F               –          दक्षिणायन.                    F ते E               –          उत्तरायण.
BED                –          सूर्याचा उत्तर                  DFB                –          सूर्याचा दक्षिण
गोलार्धातील काळ.                                              गोलार्धातील काळ

उत्तरेची परम मर्यादा (२३.५ अंश) गाठून दक्षिणेकडे येणारा सूर्य साधारण तीन महिन्यांनी पुन्हा एकदा वैषुविकवृत्त ज्या बिंदूपाशी ओलांडतो त्या बिंदूला शरद संपात बिंदू म्हणतात. (Autumnal equinox) तेथून पुढे सूर्य वैषुविक वृत्ताच्या दक्षिणेस जातो. पुन्हा स्थूलमानाने तीन महिन्यांची दक्षिणेकडे जाण्याची कमाल मर्यादा (२३.५ अंश) गाठतो. या बिंदूला दक्षिण विष्टंभ बिंदू (winter solstice) म्हणतात. या क्षणापासून उत्तरायण सुरु होते आणि हळू हळू उत्तरेकडे सरकणारा सूर्य पुन्हा एकदा वसंत संपात बिंदूशी येतो. अशा त-हेने सूर्याची एक फेरी संपात बिंदू संदर्भाने पूर्ण होते. पृथ्वीचा अक्ष कलता नसता आणि तिच्या परिभ्रमण मार्गाशी तो नेहमी काटकोनात असता तर सूर्याचा दैनिक मार्ग नेहमी समानच राहिला असता. त्यामुळे ऋतु अनुभवाला आले नसते. परंतु अक्षाच्या कलेतपणाचा परिणाम म्हणून सूर्याचा दैनिक मार्ग उत्तर आणि दक्षिण असा सरकत जातो. यामुळे दिवस रात्रीचा लहान मोठेपणा, तापमानातील वार्षिक चढ उतार आपण अनुभव शकतो. थोडक्यात उत्तरायण-दक्षिणायन यामुळेच ऋतु होतात. सूर्य एकदा वसंत संपात बिंदूशी आला की पुन्हा वसंत संपात बिंदूशी येईपर्यंतच्या कालावधीला आर्तव वर्ष (ऋतुंचे वर्ष tropical year) म्हणतात.

कॅलेंडर आणि ऋतूंचे वर्ष –
जानेवारी ते डिसेंबर हे ग्रेगोरियन वर्ष. तसेच स्वतंत्र भारताचे राष्ट्रीय वर्ष ही दोनही वर्षे ऋतूंच्या वर्षाशी समायोजित (adjust) केली असल्यामुळे उत्तरायण, दक्षिणायन इ. दिवस कॅलेंडरप्रमाणे निश्चित तारखांना येतात. कोष्टक रुपात ते मांडू या.

सूर्याचे स्थान
ग्रेगोरियन
दिनांक
राष्ट्रीय
दिनांक
घटना
वसंत संपात
(Vernal equinox)
२२ मार्च
१ चैत्र
दिवस रात्र समान
उत्तर विष्टंभ
(Summer Solstice)
२२ जून
१ आषाढ
दक्षिणायन आरंभ
शरद संपात
(Autumnal equinose)
२३ सप्टेंबर
१ अश्विन
दिवस रात्र समान
दक्षिण विष्टंभ
(winter solistice)
२२ डिसेंबर
१ पौष
उत्तरायण आरंभ


राष्ट्रीय कॅलेंडरबद्दल थोडेसे
आपल्या भारताने २२ मार्च १९५७ पासून स्वतःचे राष्ट्रीय कॅलेंडर अस्तित्वात आणले आहे. अनेक भारतीयांना याची नीटशी कल्पना नाही. ज्यांना हे कॅलेंडर माहित आहे त्यांच्या दृष्टीने ब्रिटीश काळापासून चालत आलेले कॅलेंडर राष्ट्रीय भावनेपेक्षा सोयीचे वाटत असल्यामुळे बहुसंख्य लोक राष्ट्रीय कॅलेंडर वापरीत नाहीत. राष्ट्रीय कॅलेंडर अस्तित्वात येऊन ६ दशके व्हायला आली तरी ते कागदोपत्रीच राहिले आहे. परंतु राष्ट्रीय कॅलेंडर शास्त्रीय असून अत्यंत विचारपूर्वक केलेले आहे. राष्ट्रीय कॅलेंडर ऋतूंच्या वर्षाशी समायोजित केलेले असून त्यातील महिन्यांची नावे चांद्र महिन्यांच्या नावाप्रमाणे चैत्र, वैशाख...... ते फाल्गुन अशीच आहेत. (अपवाद-मार्गशीर्ष) (मार्गशीर्ष ऐवजी अग्रहायण) राष्ट्रीय वर्ष ऋतूंशी जोडलेले असल्यामुळे ते २२ मार्चला सुरु होते. तो दिवस १ चैत्र असतो. इतर महिने सुद्धा सूर्याच्या विशिष्ट स्थानाशी जोडले आहेत हे दिलेल्या कोष्टकावरून कळेलच.

सूर्य स्थानांचा वेगळा संदर्भ – नक्षत्रे
उत्तरायण, दक्षिणायन या घटनांचा संदर्भ आपण कॅलेंडर च्या तारखांच्या संदर्भात बघितला पण पूर्वी म्हणजे वेदकाळात या घटनांच्या संदर्भासाठी नक्षत्रांचा वापर करीत असत. साधारण १७०० वर्षांपूर्वी सूर्य रेवती नक्षत्र विभागात असतांना वसंत संपात बिंदूशी असे. किंबहुना वसंत संपात बिंदू रेवती नक्षत्रांत होता असे म्हणणे अधिक योग्य ठरेल. नक्षत्र किंवा राशीचक्राची सुरुवात वसंत संपात बिंदूपासून करण्याची पद्धत असल्यामुळे रेवती नंतर येणारे अश्विनी नक्षत्र हे पहिले नक्षत्र आणि अश्विनी नक्षत्रापासून सुरु होणारी मेष रास ही पहिली रास ठरली परंतु पृथ्वीच्या एका विशिष्ट गतीमुळे (परांचन गती) संपात बिंदू तसेच विष्टंभ बिंदू नक्षत्रात स्थिर रहात नाहीत. हे बिंदू उलट क्रमाने म्हणजे मागच्या नक्षत्रात सरकतात. यातील प्रत्येक बिंदू साधारण ७२ वर्षात एक अंश मागे सरकतो, परंतु आपली पंचांगे नाक्षत्र वर्ष मानतात. नाक्षत्र वर्ष म्हणजे समजा सूर्याने आज अश्विनी नक्षत्रात आणि मेष राशीत प्रवेश केला की पुन्हा नक्षत्रात येईपर्यंत जो कालावधी त्याला नाक्षत्र वर्ष (sidereal year) म्हणतात. (परंतु संपात बिंदू पश्चिमेकडे सरकत असल्यामुळे संपात बिंदू ते पुन्हा तोच संपात बिंदू या सूर्य आवर्तनाने होणारे ऋतूंचे वर्ष, [सांपातिक वर्ष (tropical year)] नाक्षत्र वर्षांपेक्षा लहान होते. सुमारे १७०० वर्षापूर्वी दक्षिण विष्टंभ बिंदू आणि मकर राशीचा आरंभ यांची सांगड होती. त्यामुळे मकर राशीत सूर्याने प्रवेश केला की उत्तरायणही सुरू होत असे. पण ऋतूंचे वर्ष म्हणजे उत्तरायण हा काळ नाक्षत्र वर्षापेक्षा थोडा कमी असल्यामुळे उत्तरायण अगोदर होते आणि सूर्याचा मकर राशीतील प्रवेश पुढे पुढे सरकत जातो. आज मितीस दक्षिण विष्टंभ बिंदू आणि मकर राशीची सुरुवात यांच्यामध्ये २४ अंशाचे अंतर पडले आहे. त्यामुळे उत्तरायण २२ डिसेंबरला (राष्ट्रीय सौर १ पौष) होते तर मकर संक्रमण १४ जानेवारीच्या सुमारास होते.
मकर संक्रांतीच्या दिवशीचे तीळ गूळाचे महत्व पाहिले तर हा सण सूर्याशी म्हणजे हिवाळ्याशी निगडीत आहे असे वाटते. सूर्य जास्तीत जास्त दक्षिणेला असतो तेव्हा म्हणजेच उत्तरायण सुरु होते तेव्हा आपल्याकडे थंडी असते. म्हणजे मकरसंक्रातीचा संबंध उत्तरायणाशी आहे. सूर्याच्या मकर राशीतील प्रवेशाशी नाही. उत्तरायण सुरु झाल्यानंतर सुमारे २३ ते २४ दिवसांनी सूर्य मकर राशीत प्रवेश करीत असल्यामुळे मकर राशीतील सूर्य प्रवेश म्हणजे उत्तरायण दिवस हे खरे की खोटे हे वाचकांनीच ठरवयाचे आहे.

उत्तरायणाचा दिवस आणि वेळ
उत्तरायण ही एक घटना आहे हे आपण सुरुवातीसच पाहिले. सूर्य दक्षिण विष्टंभा पाशी पोहोचला म्हणजे उत्तरायण सुरु होते. अर्थात उत्तरायण या घटनेची सुरुवात हा क्षण आहे. वेळ आहे.
काही वर्षातील सूर्य जास्तीत जास्त दक्षिणेकडे म्हणजे दक्षिण विष्टंभ बिंदूपाशी पोहोचण्याच्या तारखा व वेळा भारतीय प्रमाण वेळेनुसार पुढे दिल्या आहेत.

वर्ष व दिनांक
दक्षिण विष्टंभ बिंदूपाशी
पोहचण्याची वेळ
२१ डिसेंबर २०१६
२२ डिसेंबर २०१५
२२ डिसेंबर २०१४
२१ डिसेंबर २०१३
२१ डिसेंबर २०१२
दुपारी ४-१४
सकाळी १०-१८
पहाटे ४-३३
रात्री १०-४१
दुपारी ४-४२

उत्तरायणाची तारीख २१ किंवा २२ डिसेंबर आपण वर्षाचे दिवस ३६५ घेतो व लीप वर्ष ३६६ दिवसांचे असते. उत्तरायण ते उत्तरायण हा कालावधी सरासरी ३६५ दिवस ४८ मिनिटे आणि काही सेकंदांचा आहे त्यामुळे वेळाही भिन्न येतात.
स्थूल व्यवहारासाठी उत्तरायणाची तारीख पुरेशी असते म्हणूनच राष्ट्रीय सौर कॅलेंडरमध्ये २२ डिसेंबर (उत्तरायणाचा आरंभ) ही तारीख सौर १ पौष अशी असते. ग्रेगोरिन कॅलेंडर व राष्ट्रीय कॅलेंडर ही दोनही कॅलेंडर्स नाक्षत्र वर्षाशी समायोजित न करता ऋतूंच्या वर्षाशी समायोजित केल्यामुळे उत्तरायण विशिष्ट तारखेलाच होत राहील आणि ती तारीख २२ डिसेंबर किंवा सौर १ पौषच असेल.

-       हेमंत मोने
( खगोल अभ्यासक )

Monday, 24 October 2016

दिवाळी

वर्षभरातील सर्व सणांमध्ये दीपावलि हा सण सर्वात मोठा आनंददायी असा आहे. इतर सर्व सण - उत्सवांपेक्षा दिवाळीच्या चार दिवसात होणारी उलाढाल सर्वांनाच आनंद देणारी असते. याचे कारण नरक चतुर्दशी ते कार्तिक शु. प्रतिपदा या तीन दिवसांत जनतेने मौज मजा करावी, गोडधोड खावे, आनंदी वातावरणात रहावे अशी बळीराजाची इच्छा आणि त्याला मिळालेला वर यामुळे दिवाळीला विशेष महत्त्व प्राप्त झालेले आहे.

वसुबारस – 26 ऑक्टोबर 2016, बुधवार


पूर्वीच्याकाळी धन हे गोधन स्वरूपात देखील असावायचे त्या धनाची म्हणजे गाईची पूजा आश्विन वद्य द्वादशीला करतात. संध्याकाळी गायी चरून आल्यानंतर गायवासरांची गंधादी उपचारांनी पूजा करून –
‘क्षीरोदार्णवसंभूते सुरासुरनमस्कृते । सर्वदेवमये मातर्गुहाणार्घ्यं नमोऽस्तु ते ।’ हा मंत्र म्हणून पुढील पायावर अर्घ्य द्यावे आणि ‘सर्वदेवमये देवि सर्वदेवैऽरलंकृते । मातर्ममाभिलषितं सफलं कुरु नंदिनि ।’ अशी प्रार्थना करावी.
महत्त्वाची एक गोष्ट आहे की, त्या दिवशीच्या जेवणात गायीचे दूध, दही, तूप, ताक, खीर, तसेच भजी इत्यादी वर्ज्य. या दिवशी सौभाग्यवती स्त्रिया एकभुक्त राहून हे व्रत करतात. सकाळी अथवा सायंकाळी सवत्स गायीची पूजा करतात. समुद्रमंथनातून पाच कामधेनू उत्पन्न झाल्या. त्यातल्या नंदा नावाच्या धेनूला उद्देशून हे व्रत आहे.

धनत्रयोदशी 28 ऑक्टोबर 2016, शुक्रवार



आश्विन वद्य त्रयोदशीला धनत्रयोदशी म्हणतात. या दिवशी वस्त्रालंकाराची खरेदी करणे शुभ मानतात. उपवास करून घरातले द्रव्य व अलंकार पेटीतून काढून साफसूफ करतात व पूजन करून पुनश्च योग्य ठिकाणी ठेवतात. कुबेर, विष्णू, लक्ष्मी, योगिनी, गणेश, नाग आणि द्रव्यनिधी यांची पूजा करून नैवेद्य दाखवितात, यथाशक्ती दान करतात. या दिवशी सायंकाळी दिवा तेलाने भरून प्रज्वलित करावा व नंतर त्याची पूजा करून घराच्या दाराजवळ, धान्याच्या राशीजवळ ठेवावा.
धनत्रयोदशीला संध्याकाळी मातीच्या किंवा कणकेच्या दिव्यात तेल, वात घालून प्रज्वलित करावा हा दिवा दक्षिणेकडे ज्योत करून ठेवावा. 
मृत्यूना पाशदंडाभ्यां कालेन श्यामया सह । त्रयोदश्यां दीपदानात् सूर्यजः प्रीयतां मम । असा मंत्र म्हणून ह्या दिव्यास नमस्कार करावा यास यमदीपदान म्हणतात.


याच दिवशी आयुर्वेदाचा प्रवर्तक धन्वन्तरी याची पूजा वैद्यकाची प्रगती होण्याकरिता वैद्य लोक करतात. हा देवांचा वैद्य मानला जातो. देव-दैत्यांनी क्षीरसागराचे मंथन केले. त्यातून चौदा रत्ने निघाली. त्यांत सुधर्मात्मा व आयुर्वेदमय दंड कमंडलुसहित असा धन्वन्तरी हातात अमृतकलश घेऊन बाहेर पडला. हा विष्णूचा अवतार असून सर्व वेदांत निष्णात व मंत्रतंत्रातही विशारद होता. याला आदिदेव, अमरवर, अमृतयोनी, सुधापाणी, अब्ज इत्यादी अन्य नावेही आहेत. याच्या अलौकिक प्रतिभेने नाना औषधींचे सार अमृतरूपाने देवांना प्राप्त झाले. ते जरामृत्युरहित बनले. त्यामुळे त्याला देवांचे वैद्यराजपद लाभले. भागवत पुराणात विष्णूच्या चोवीस अवतारांत धन्वन्तरीचा समावेश केला आहे. आरोग्य प्राप्तीसाठी ईशान्य दिशेकडे मुख करून सायंप्रार्थना करावी. धन्वन्तरीने चिकित्सेचे ज्ञान भास्करापासून प्राप्त केले आणि भास्कराच्या आयुर्वेदसंहितेच्या आधारे ‘चिकित्सा तत्त्वविज्ञान’ नामक ग्रंथ रचला. तेव्हापासून आयुर्वेदाचा प्रसार सुरू झाला. धन्वंतरी देवतेचे पूजन केवळ आयुर्वेदाचे डॉक्टर करतात असे नाही तर सर्वच शाखांचे डॉक्टर धन्वंतरी पूजन करतात.

नरक चतुर्दशी – 29 ऑक्टोबर 2016, शनिवार


नरकासुराने 16 हजार 108 स्त्रियांना आपल्या बंदीखान्यात डांबून ठेवले होते. हा नरकासुर प्रजेचाही खूप छळ करीत असे. भगवान श्रीकृष्णांनी या नरकासुराचा वध आश्विन कृष्ण चतुर्दशीला करून स्त्रियांची मुक्तता केली. नरकासुराने श्रीकृष्णाकडे वर मागितला की, आजच्या तिथीला जो मंगलस्नान करेल त्याला नरकाची पीडा होऊ नये. म्हणून नरक चतुर्दशीला पहाटे अभ्यंगस्नान करणे महत्त्वाचे मानले आहे.
शरद् ऋतूचा शेवट आणि हेमंत ऋतूचे आगमन अशा संधीकालावर दिवाळीचा सण साजरा करताना पुढे येणा-या थंडीच्या काळासाठी तेल लावून स्नान करण्याची सुरुवात नरक चतुर्दशीच्या अभ्यंगस्नानापासून होते. तिळाच्या तेलापासून केलेले उटणे अंगास लावावे व स्वच्छ स्नान करावे. या चतुर्दशीस ‘रूपचतुर्दशी’ असेही म्हणतात.
नरक चतुर्दशीचे दिवशी यमतर्पण करावयास सांगितले आहे. अपमृत्यु येऊ नये म्हणून यमाला 14 नावांनी तर्पण करून “यमोनिहंता पितृधर्मराजो वैवस्वतो दंडधरश्च कालः। भूताधिपो दत्त कृतानुसारी कृतांत एतद्दशभिर्जपंति।।” हा श्लोक 10 वेळा म्हणून प्रार्थना करण्यास सांगितले आहे. पूर्वीपेक्षा सध्याच्या काळात वेगाने चालविल्या जाणा-या वाहनांमुळे अपघाताचे भय वाढले आहे. अपघात, धावपळीचे जीवन, इ. अनेक कारणांमुळे अपमृत्यूचा संभव वाढत असल्याने नरकचतुर्दशीला यमतर्पण करून अपमृत्यु निवारणासाठी यमाची प्रार्थना सर्वांनी करणे आवश्यक आहे.

लक्ष्मीकुबेर पूजन – 30 ऑक्टोबर 2016, रविवार


शेतकऱ्यांसाठी ज्याप्रमाणे मार्गशीर्षातील वेळा अमावास्या शुभ आहे, त्याप्रमाणे व्यापारीवर्गासाठी आश्विनातील अमावास्या शुभ आहे. पुराणातील कथेप्रमाणे आश्विन अमावास्येस रात्री लक्ष्मी सर्वत्र संचार करीत असते. जेथे स्वच्छता, शोभा, आनंद आहे अशा ठिकाणी ती आकर्षित होते. म्हणून लक्ष्मीपूजनाचे दिवशी घर, दुकान झाडून, स्वच्छ करून, सुशोभित करून सूर्यास्तानंतर लक्ष्मी व कुबेर यांचे पूजन करून ऐश्वर्य, संपत्ति, समृद्धिसाठी प्रार्थना करावयाची असते.
नमस्ते सर्वदेवानां वरदासि हरिप्रिये या गतिस्त्वत्प्रपन्नानां सा मे भूया तव दर्शनात्
अशी लक्ष्मीची प्रार्थना करावी आणि
धनदाय नमस्तुभ्यं निधिपद्माधिपायच भवन्तु त्वत्प्रसादेन धनधान्यादिसम्पदः
अशी कुबेराची प्रार्थना करावी. यापूजेत श्रीसूक्त म्हणून अभिषेक केला जातो. समृद्धीचे प्रतीक म्हणून साळीच्या लाह्या आवश्यक असतात.
लक्ष्मीपूजन मुहूर्त - सायं. ०६।०५ ते रात्री ०९।१०, रात्री ०९।३० ते ११

बलिप्रतिपदा (दिवाळी पाडवा) – 31 ऑक्टोबर 2016, सोमवार


कार्तिक शुक्ल प्रतिपदेला बलिप्रतिपदा असे म्हणतात साडेतीन मुहूर्तांपैकी हा एक शुभ मुहूर्त आहे. या दिवशी दानशूर अशा बळीराजाची पूजा करण्यास सांगितली आहे. ज्याप्रमाणे चैत्र शुक्ल प्रतिपदेस शालिवाहन शक नवे संवत्सर सुरु होते, त्याप्रमाणे कार्तिक शुक्ल प्रतिपदेस विक्रम संवत्सर सुरु होते. व्यापारी वर्षास सुरुवात होत असल्याने वहीपूजन, दुकानाची पूजा करून नवीन वर्षाचे स्वागत केले जाते. या दिवशी पत्नीने पतीस ओवाळावे म्हणजे दोघांचे ही आयुष्य वाढते.
वहीपूजन मुहूर्त - पहाटे ०१।३५ ते ४, पहाटे ५ ते सकाळी ०८।१५, सकाळी ०९।५० ते ११।२०

यमद्वितीया (भाऊबीज) - 1 नोवेंबर 2016, मंगळवार

नरक चतुर्दशी, अमावास्या व बलिप्रतिपदा हे दिवाळीचे मुख्य तीन दिवस आहेत. मात्र या तीन दिवसांना जोडून येणारी भाऊबीज सुद्धा दिवाळीच्या दिवसात गणली जाते. कार्तिक शुक्ल द्वितीयेच्या दिवशी यमराज आपल्या बहिणीच्या हातचे भोजन करून बहिणीचा सत्कार करीत असे, अशी पुराणात गोष्ट आहे. म्हणून या दिवशी बहिणीने भावाला जेवावयास बोलावून त्याला ओवाळावे असे सांगितले आहे.
दिवाळीच्या या चार दिवसात सर्वत्र आनंदोत्सव साजरा करावयाचा असल्याने दीपमाळ, आकाशदिवे, दिव्यांची रोषणाई करून दीपोत्सव केला जातो. म्हणून या चार दिवसांना दीपावली किंवा दिवाळी असे म्हटले जाते.
वर्षभरातील इतर सण - उत्सव यांचे प्रमाणे दिवाळीचे स्वरूप नसते. सर्व समाजाने दुःख, भेदभाव विसरून चार दिवस आनंदात रहावयाचे असते. काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत संपूर्ण भारतात दिवाळी साजरी करण्याची पद्धति जवळजवळ सारखीच आहे. मुख्यत: घर, दुकान स्वच्छ करून, दिव्यांची रोषणाई, फराळाचे पदार्थ, गोडधोड पक्वान्न करणे, अभ्यंगस्नान, दिवाळीच्या निमित्ताने आप्तेष्टांनी एकत्र येणे इ. गोष्टी केल्या जातात पतीने पत्नीसाठी, भावाने बहिणीसाठी, मालकांनी कर्मचाऱ्यांसाठी भेटवस्तू देणे आणि स्नेहभाव दृढ करणे यामुळे संपूर्ण समाजात - कुटुंबात एकोपा राखला जातो.

प्रत्येक धर्मीयांच्या सण - उत्सवामुळे संपूर्ण भारतात खरेदी - विक्री होऊन आर्थिक उलाढाल वाढते अर्थातच त्यामुळे आर्थिक स्वास्थ्य प्राप्त होऊन भारताची प्रगति होण्यात या सण - उत्सवांचे मोठे सहकार्य लाभते ही गोष्ट निश्चितच लक्षात ठेवली पाहिजे.

दीपावलीच्या दाते पंचांग परिवारातर्फे हार्दिक शुभेच्छा !





Tuesday, 27 September 2016

नवरात्री विशेष - 2016


नवरात्री विशेष

  • नवरात्र बसविल्यानंतर ज्या देवतेचे नवरात्र असेल त्या देवतेची पूजा करताना फुलांनी पाणी शिंपडून स्नान, इ. उपचार करावेत आणि इतर देवतांना नेहमीप्रमाणे ताम्हनात घेऊन अभिषेक स्नान, इ. उपचार करुन स्वतंत्रपणे पूजा करावी. काही ठिकाणी नवरात्र बसविल्यावर इतर देवांची पूजा करीत नाहीत हे योग्य नाही.
  • प्रकृति अस्वास्थ्य किंवा वयोमान, इ. मुळे नवरात्राचे उपवास रोज करणे शक्य नसेल तर बसता-उठता दोन दिवस उपवास करावा किंवा फक्त अष्टमीचा उपवास करावा.
  • नवरात्र किंवा इतर उपवासाचे दिवसांत अशौच आले तर उपवास करता येतो. परंतु विशिष्ट संख्यात्मक उपवास असताना त्या संख्येमध्ये तो मोजू नये.
  • नवरात्र बसविल्यावर अशौच आले तर सप्तशती पाठ बंद करावेत अशौच संपल्यावर राहिलेले पाठ पूर्ण करावेत. मात्र नवरात्राचे उपवास करता येतील. नवरात्राची पूजा, माळ, दिवा, इ. उपचार शेजाऱ्याकडून किंवा इतर नातेवाईकांकडून करुन घ्यावेत. नवरात्रोत्थापन सुद्धा ब्राह्मणांकडून किंवा अशौच नसलेल्या नातेवाईकांकडून करावे. अशुचि घरातील साहित्य वापरु नये.
  • अशौचामुळे नवरात्रातील काही दिवस पूजेसाठी मिळत असतील तर अशा वेळेस 7 दिवस, 5 दिवस, 3 दिवस, 1 दिवसाचे नवरात्र करता येते, पंचांगात अशा दिवसांचा उल्लेख सप्तरात्रोत्सवारंभ अशा प्रकारे केलेला असतो.
  • नवरात्र म्हणजे आश्विन शु. प्रतिपदा ते नवमी पर्यंत केले जाणारे धार्मिक कृत्य. अशावेळेस तिथीच्या क्षयवृद्धीमुळे 8 किंवा 10 दिवसाचे नवरात्र असू शकते.
  • नवरात्रामध्ये अखंड नंदादीप लावला जातो काही वेळेस वाऱ्याने किंवा काजळी काढताना तो विझतो. अशा वेळेस काही अशुभ नसते, तो नंदादीप पुनः लावता येतो.
  • अष्टमीचे महालक्ष्मीपूजन (घागरी फुंकणे) करताना निशीथकाली म्हणजे रात्री साडेबारा ते दीड या वेळेत अष्टमी असलेला दिवस महालक्ष्मीपूजनासाठी घ्यावा असे आहे. त्यादिवशी सकाळी-दुपारी-सायंकाळी सप्तमी असू शकते. अशा सप्तमीवर पूजन करुन रात्रीची पूजा अष्टमीवर करावी.
  • दसरा साडेतीन मुहूर्तापैकी एक शुभ - दिवस असला तरी वास्तु, विवाह इ. कार्यासाठी आश्विन महिना वर्ज्य असल्याने या शुभ दिवशी वास्तुशांति, विवाह करु नये. लौकिक गृहप्रवेश करुन राहण्यास जाता येईल.

या वर्षी दिनांक 1 ऑक्टोबर रोजी घटस्थापना होत असून नवरात्रारंभ होत आहे या दिवशी ब्राह्ममुहूर्तापासून म्हणजे साधारणपणे पहाटे 5 वाजल्यापासून मध्याह्नसमाप्ति पर्यंत म्हणजे दुपारी 1:30 पर्यंत घटस्थापना करता येईल. या दिवशी सकाळी 9 ते 10/30 यावेळेत राहुकाल असला तरीही त्या वेळेतही पूजन करता येईल. घटस्थापनेकरिता राहुकाल वर्ज्य करण्याची आवश्यकता नाही. 10 ऑक्टोबर रोजी नवरात्रोत्थापन (नवरात्र समाप्ति) व पारणा आहे व दसरा हा 11 ऑक्टोबर रोजी आहे. सर्वसाधारणपणे नवरात्रोत्थापन व दसरा एका दिवशी किंवा वेगवेगळ्या दिवशी आले तरी घटस्थापनेपासून दसऱ्यापर्यंत 9 दिवस किंवा 10 दिवसांचे अंतर असते. आश्विन शुद्ध प्रतिपदेपासून नवमीपर्यंत शक्ती देवीची जी उपासना केली जाते त्याला नवरात्र असे म्हणले जाते. हे दिवस तिथीच्या क्षय-वृद्धीमुळे कमी अधिक होत असतात. या वर्षी घटस्थापनेपासून 11 व्या दिवशी दसरा आहे. यापूर्वी अनेक वेळेस असे झालेले आहे त्यामुळे अकराव्या दिवशी दसरा येणे शुभ किंवा अशुभ अशा अफवांवर विश्वास ठेवू नये. साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेला दसरा हा कितव्याही दिवशी आला तरी शुभच असतो. यापूर्वी 1998 मध्ये याच प्रमाणे अकराव्या दिवशी दसरा आलेला होता.
अशौचामुळे ज्यांना 1 ऑक्टोबर रोजी घटस्थापना करणे शक्य होणार नाही त्यांनी अशौच निवृत्ति नंतर (अशौच संपल्यावर) 4 ऑक्टोबर, 6 ऑक्टोबर, 8 ऑक्टोबर यापैकी कोणत्याही दिवशी घटस्थापना करावी व 10 रोजी नवरात्रोत्थापन करावे.
महालक्ष्मी पूजन (घागरी फुंकणे) ह्या दिवशी मध्यरात्री अष्टमी तिथीवर देवीचे पूजन करण्याची प्रथा आहे. अशी अष्टमी 8 ऑक्टोबर रोजी मध्यरात्री मिळते त्यामुळे त्या दिवशी महालक्ष्मीपूजन दिलेले आहे. दुर्गाष्टमी 9 ऑक्टोबर रोजी आहे.
काही घरांमध्ये नवरात्रीच्या माळा घेण्याची पद्धत आहे. सर्वसाधारणपणे 9 माळा घेतल्या जातात मात्र या वर्षी नवरात्रोत्थापनेचा दिवस 10 वा असल्याने रोजची एक याप्रमाणे 9 ऐवजी 10 माळा घ्याव्यात.
विजया दशमी, दसरा, सीमोल्लंघन हे 11 ऑक्टोबर रोजी असून साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेला दसरा हा दिवस अत्यंत शुभ मानला जातो. या दिवशी विजय मुहूर्तावर अनेक लोक आपल्या नवीन उपक्रमाचा आरंभ करतात. हा विजय मुहूर्त महाराष्ट्रामध्ये साधारणपणे दुपारी 2:23 ते 3:10 या दरम्यान आहे.

Monday, 19 September 2016

देशापुढील प्रश्नांची उत्तरे शोधणाऱ्या संशोधनाची दिशा कोणती ?

इंडिअन इंस्टीटयूट ऑफ सायन्स (I.I.Sc.) च्या पदवीदान समारंभामध्ये बोलताना श्री. नारायणमूर्तींनी भारतीय वैज्ञानिक समूहाच्या वर्मावरच आघात केला, (म.टा. 17 जुलै 2015) हे चांगले झाले. स्वातंत्र्योत्तर काळामध्ये जागतिक स्तरावर तुमचे योगदान काय ? हा प्रश्न वैज्ञानिकांना कोणीतरी विचारायलाच हवा होता. आपण वैज्ञानिक प्रगतीचा कितीही डांगोरा पिटला तरी, ही प्रगती पाश्चात्य संशोधनाचे केवळ अनुकरण करून झाली आहे, हे सत्यच आहे. केवळ शेकडो विद्यापीठे उभारून वैज्ञानिक प्रगती होत नाही, तर या योगे आपण पाश्चात्य देशांना त्यांना संशोधनासाठी आवश्यक मनुष्यबळ तेवढे पुरवीत आहोत, ही वस्तुस्थिती आहे. मूलभूत संशोधनासाठी केवळ महागड्या उपकरणांची गरज असते, असे नसून संशोधनाची उद्दिष्टे आणि दिशा ठरविण्याची गरज असते.
पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू हे वैज्ञानिक दृष्टी असणारे होते, हे खरे आहे. त्यांच्या काळात अनेक मोठ्या वैज्ञानिक संस्था उभ्या राहिल्या. आय. आय. टी. सारख्या शैक्षणिक संस्था सुरु झाल्या. पण आज साठ वर्षांनंतर त्यांचा ताळेबंद मांडला तर काय निष्पन्न होते? जागतिक स्तराचे सोडून द्या, पण भारताच्या विकासाला तरी त्यांचा काय हातभार लागला आहे? तांत्रिक सहकार्य (collaboration) हा गेल्या साठ वर्षातला परवलीचा शब्द झाला आहे. याचा शुध्द अर्थ, तयार तंत्रज्ञान आयात करून वापरणे, हा आहे. सुरुवातीच्या काळात असे करणे आवश्यक होते, हे मान्य केले तरी आता आपल्याला त्याचीच सवय झाली आहे, हे मूलभूत संशोधनासाठी दुर्भाग्यच आहे. या दुर्भाग्याचेही मूळ नेहरूंच्या विचारसरणीतच सापडेल. नेहरूंचा सगळा भर आधुनिक विज्ञानावर आणि त्या अंतर्गत येणाऱ्या औद्योगिकरणावर होता. देशाचे शैक्षणिक आणि औद्योगिक धोरण ठरविताना त्यांच्यापुढे पाश्चात्य देशांचा आदर्श होता. पाश्चात्य देशांपुढे लोकसंख्येचा प्रश्न गंभीर कधीच नव्हता. त्यामुळे आणि बहुतांश मांसाहारी असल्यामुळे अन्नधान्याचाही प्रश्न गंभीर नव्हता, तसेच, प्रत्येक हाताला काम देण्याचाही प्रश्न गंभीर नव्हता. पण याच्या नेमकी उलटी परिस्थिती भारतामध्ये होती त्यामुळे आणि नंतरच्या काळात सगळ्या सरकारांनी राबविलेल्या औद्योगिकरणाच्या धोरणांमुळे भारतापुढचे कुठले प्रश्न समाधानकारकरीत्या सुटले आहेत? ना अन्न-वस्त्र-निवारा या माणसाच्या मूलभूत गरजांचा, ना बेरोजगारीचा !
नेहरूंनी देशाचे औद्योगिक आणि शैक्षणिक धोरण ठरविताना जर भारताच्या समृध्द ज्ञान परंपरेचा योग्य उपयोग करून घेतला असता तर आजचे निराशाजनक चित्र दिसले नसते. या संदर्भात खालील मुद्दे विचारात घेतले जावेत:-
१). भारताला गरीबीत लोटण्याचे श्रेय इंग्रजांकडे जाते. त्यांनी भारतात पाय ठेवण्यापूर्वी भारताची आर्थिक स्थिती उत्तम होती, अगदी मुस्लीम आक्रमणानंतरही. हि गोष्ट सेमुअल हेटीन्गटन यांनी लिहिलेल्या ‘The Clash Of Civilization” या पुस्तकात दिलेल्या तूलनात्मक तक्त्यावरून स्पष्ट होते. त्यातील माहितीप्रमाणे, इ. स. १७५० मध्ये भारताचे उत्पादन संपूर्ण युरोप आणि सोविएत रशिया यांच्या एकत्रित उत्पादनापेक्षाही जास्त होते. भारताचे उत्पादन २४.५% इतके होते तर, युरोपचे १८.२% आणि सोविएत रशियाचे अवघे ५% होते.
२). भारत हे एक अत्यंत समृध्द आणि प्रगत राष्ट्र असल्यामुळेच युरोपिअन लोक भारतात येण्यासाठी धडपडत होते.
३). भारताची उत्पादने अत्यंत उच्च दर्जाची होती. यामुळेच इंग्रजांनी कूटनीतीचा अवलंब करून ती उत्पादने बंद पाडली. भारतीय बनावटीची जहाजे इतकी उत्कृष्ट दर्जाची होती कि त्यामुळे इंग्रजांच्या जहाजबांधणी उद्योगावर गाशा गुंडाळण्याची वेळ आली होती. शेवटी पार्लमेंटमध्ये कायदा करून त्यांनी भारतातील जहाज उद्योग बंद पाडला. हीच गोष्ट वस्त्रोद्योगाची झाली. भारतीय लोह हे स्वीडिश लोहापेक्षाही उच्च दर्जाचे असल्याचा निर्वाळा खुद्द इस्ट इंडिया कंपनीचा अधिकारी कॅप्टन जे. कॅम्प्बेल याने लिहिलेल्या अहवालात दिला आहे. वूद्झ स्टील हे त्याचे उत्कृष्ट उदाहरण आहे.
४). युरोपिअन लोकांना इ.स. १७३५ पर्यंत जस्त धातूच्या शुद्धीकरणाची पद्धत माहित नव्हती. त्या वर्षी विल्यम चॅम्पिअन या शास्त्रज्ञाने ज्या पद्धतीचे “ब्रिस्टल पद्धत” म्हणून पेटंट घेतले ती पद्धत तेराव्या शतकातील रसरत्नसमुच्चय या ग्रंथामध्ये तशीच दिली आहे. याच पद्धतीनुसार शेकडो वर्षे भारतात जास्त धातूचे उत्पादन होत असे. तेंव्हा, हे तंत्रज्ञान इंग्रजांनी चोरून स्वतःचे म्हणून मिरविले, या विधानात काहीही वावगे नाही.
५). देवीच्या लसीचा शोधही इंग्रजांनी बंगाल मधून पळविला, याचे ही साधार पुरावे उपलब्ध आहेत.
अशी अनेक उदाहरणे देता येतील. याचा अर्थ, भारतीयांना विज्ञानाची प्रदीर्घ परंपरा आहे. वैज्ञानिक दृष्टी ही पाश्चात्यांनी दिलेली देणगी नसून ती भारतीयांनी हजोरो वर्षांपासून जोपासलेली वृत्ती आहे. विज्ञानाला वैयक्तिक हस्तकौश्यल्याची जोड देऊन त्यांनी अन्न, वस्त्र, निवारा आणि बेरोजगारी सारख्या प्रश्नांची समाधानकारक उत्तरे शोधली होती. या सत्याचा स्वीकार करून प्राचीन विज्ञानान्तर्गत असलेल्या तंत्रज्ञानांचे पुनर्संशोधन करून काळानुसार त्यात योग्य ते बदल करणे हे खरे संशोधनाचे उद्दीष्ट असायला हवे. त्यासाठी प्राचीन ग्रंथांमधील अनेक वैज्ञानिक संकल्पनांना मूर्त स्वरूप देण्यासाठी मूलभूत संशोधनाच्या असंख्य संधी या देशातच उपलब्ध आहेत. त्यासाठी परदेशांवर अवलंबून राहण्याचीही गरज नाही. कृषी, वस्त्रोद्योग, स्थापत्य, प्राणिशास्त्र, वनस्पतीशास्त्र, आरोग्य, धातुशास्त्र, रसायनशास्त्र, नौकानयन आणि नौकाबांधणीशास्त्र, नाणेशास्त्र. कायदा आणि अनुशासन, नगर रचना, पर्यावरण आदि अनेक शास्त्रांचा जन्मच मुळी भारतात झाला आहे. भारतीयांनी लोकांना कपडे घातले. विज्ञानातील मूलभूत संशोधनाचा पाया प्राचीन भारतीयांनी आधीच रचून ठेवला आहे. त्यावर मोठी इमारत रचण्याचे काम आता भारतीय शास्त्रज्ञांनी केले तर आधुनिक विज्ञानातही ते आघाडी घेऊ शकतील आणि आधुनिक विज्ञानाच्या अनियंत्रित प्रगतीमुळे मानवसमाजापुढे निर्माण झालेल्या कांही भयानक प्रश्नांवर उत्तरे शोधू शकतील. या शतकामध्ये भारतीय शास्त्रज्ञांनी प्राचीन भारतीय विज्ञानावर संशोधन केंद्रित करणे आवश्यक आहे.

सतीश कुलकर्णी

, मेरीगोल्ड अपार्टमेंटस, ५वी गल्ली, आनंद पार्क, औंध, पुणे-४११००७.

मो -  9822064709

Saturday, 3 September 2016

विश्ववंद्य गणपति

5 सप्टेंबर 2016, सोमवार - श्रीगणेश चतुर्थी

गणेश पूजनासाठी ब्राह्ममुहूर्तापासून मध्याह्नापर्यंतचा काल महत्वाचा आहे. गणेश पूजनासाठी शुभ, अमृत काल किंवा राहूकाल, भद्रा यांचा विचार करू नये.

गणपति ही देवता भारतापासून मेक्सिकोपर्यंत तसेच चीन व रशिया यासारख्या देव-धर्म न मानणाऱ्या राष्ट्रात ही उपास्य देवता म्हणून होती, हे उत्खननात सापडणाऱ्या मंदीराच्या अवशेषातून व मूर्तीतून स्पष्ट दिसते. यावरून गणपति हा विश्ववंद्य आहे हे सिद्धच आहे.
भारतात तर लोककलेपासून विवाहादि मंगलकार्यापर्यंत सर्वत्र गणपति व्यापून आहे. तमाशातहि पहिला वग गणपतीचा म्हटला जातो. जुन्या घराच्या मुख्यदारावर गणेश चित्र असे. आता गणपतीची "टाईल" असते. पण गणपति आहे. शिक्षणाला  प्रारंभ होतो तो श्रीगणेशायनमः करुनच. सर्व शुभ कार्यात प्रथम  निर्विघ्नता सिद्ध्यर्थम् म्हणून गणपतीचेच स्मरण केले जाते. असे, इतके स्थान आपल्या जीवनात गणपतीने मिळविले आहे किंवा आपण स्थान दिले आहे.
ग्रंथ लेखनाच्या प्रारंभी नमन करावे असा संकेत आहे व तो सर्व ग्रंथकारांनी पाळला आहे. नमन गणपतीचेच असते. मात्र श्री ज्ञानदेवांनी गणपतीला नमन केले नसून त्यांनी ओंकाराला नमन केले आहे, असे काहींचे म्हणणे आहे. पण हे म्हणणे बरोबर नाही. कारण पहिल्या ओवीत "ॐ नमोजी आद्या" म्हणून लगेच दुसऱ्या ओवीत "देवा तूचि गणेशु" असे म्हटले आहे. म्हणजे गणेशा ओंकार तूच आहेस. ओंकार व गणपति हे भिन्न नसून एकच आहेत असे ज्ञानदेवांचे म्हणणे आहे. ओंकाराला नमन म्हणजेच गणपतीला नमन. सृष्टीच्या उत्पत्तीचा विचार सांगताना सृष्टीच्या उत्पत्तीच्या प्रारंभी "ओमितिध्वनिरभूत" म्हणजे ॐ असा ध्वनि झाला. या ध्वनीचे दृश्यस्वरुप "स वै गजमुखाकारः" म्हणजे तो ध्वनि म्हणजेच ओंकार हा हत्तीच्या मुखासारखा आहे, असे सांगितले आहे. म्हणजे प्रथमतः ध्वनि झाला तो "ॐ" असा झाला. हा "ओंकार" उभा करुन पहा म्हणजे गणपतीच्या मुखासारखा आहे हे लक्षात येईल. तात्पर्य ॐ व गणपति हे एकच आहेत, भिन्न नाहीत. म्हणून ओंकाराला नमन म्हणजेच गणपतीला नमन असल्याने ज्ञानदेवांनी गणपतीलाच नमन केले आहे. हे दुसऱ्या ओवीत चकार घालून (देवा तूचि गणशु) सांगितले आहे. सृष्टीच्या प्रारंभी ॐ व अथ हे दोन शब्द ब्रह्मदेवाचा कंठ भेदून बाहेर आले, म्हणून हे दोन शब्द मंगलवाचक आहेत असे म्हटले आहे. ओंकार हे गणपतीचे स्वरुप आहे व ओंकार हा मंगल आहे म्हणून गणपतीला "मंगलमूर्ति" असे म्हटले जाते ते सार्थ आहे. गणपति ओंकारच आहे म्हणून गणपतींची उपासना म्हणजे साक्षात् ब्रह्माची उपासना आहे. "त्वं प्रत्यक्षं ब्रह्मासि" असे अथर्वशीर्षात म्हटले आहे. म्हणून गणेशोपासना ही सर्वश्रेष्ठ आहे. प्रत्येक देवतेत विशिष्ट गुण आहेत. जो गुण आपल्याला पाहिजे असेल तो गुण ज्या देवतेमध्ये आहे त्या देवतेशी, उपासनेने संपर्क साधून तो गुण आपल्यात आणणे. कोणत्या देवतेकडे काय मागावे हे सांगितलेले आहे.
सूर्याकडे आरोग्य मागावे, अग्नीकडे संपत्ति मागावी, ज्ञान महादेवाकडे मागावे. कारण सर्व विद्यांचा तो ईश्वर म्हणजे अधिपति आहे. मोक्ष जनार्दनाकडे म्हणजे विष्णुकडे मागावा कारण तो वैकुंठाधिपति आहे.
गणपति बुद्धीची (बुद्धिदायी) देवता आहे. "देवा तूचि गणेशु सकळ मतिप्रकाशु।" देवा सर्व जगाच्या बुद्धीला ज्ञानाचा प्रकाश देणारा हे गणेशा तूच आहेस. म्हणून बुद्धिवर्धनाकरिता गणपतीची उपासना करणे उचित आहे. बुद्धी तरल असेल तर कोणत्याही विषयाचे परिपूर्ण ज्ञान होऊ शकते. बुद्धीवरच सर्व गोष्टी अवलंबून आहेत. बुद्धीच नसेल तर कसलेही ज्ञान होऊ शकणार नाही. आपल्याकडे अतिप्राचीन काळापासून, पैशाला महत्त्व दिले नाही तर बुद्धीला महत्त्व दिले आहे, बाकी सर्व गेले तरी चालेल पण बुद्धी जाऊ देऊ नकोस. अशी सकल संतांनी परमेश्वराची प्रार्थना केली आहे.
पत्र लिहिताना किंवा काहीहि लिहिताना प्रथम ।। श्रीगणेशायनमः ।। ।। श्री सरस्वत्यैनमः ।। ।। श्री गुरुभ्योनमः ।। असे लिहिण्याची प्राचीन पद्धति होती. हा क्रम असा का घेतला? कोणत्याहि विषयाचे ज्ञान प्रथम बुद्धीनेच होत असते व गणपति हा बुद्धीदाता आहे. म्हणून प्रथम गणेशायनमः बुद्धीने जे ज्ञान ग्रहण केले ते शब्दबद्ध करण्याचे काम सरस्वतीचे, सरस्वतीला अभिनव वाग्विलासिनी असे ज्ञानदेवांनी म्हंटले आहे. "शब्द मूळ वाग्देवता" असे समर्थांनी म्हटले आहे. म्हणून दुसरा क्रमांक श्री सरस्वतीला दिला. ज्ञान व ते शब्दबद्ध करण्याचे माध्यम गुरु होत म्हणून गुरुंना तिसरा क्रमांक दिला. अशी ही लेखनाची प्राचीन परंपरा जाणीवपूर्वक केली आहे असे स्पष्ट दिसते.
कलौचंडी विनायकौ असे समर्थांनी म्हटले आहे. समर्थवाणी असल्याने ती खोटी ठरणार नाही. गणपतीची मंदिरे एकेकाळी ओस पडली होती. पण आता काळ पालटला आहे. सर्व गणपति मंदिरे भक्तांनी सदैव गजबजलेली आहेत. जसे पुणे येथील सारस बागेतील गणपति मंदिर, पूर्वी तेथे पुजाऱ्याशिवाय कोणीही जात नसे. पण आता रोज हजारो माणसे दर्शनास जात असतात. संकष्टीला तर खूपच गर्दी असते. निश्चितच हे सुचिन्ह आहे. मुंबईत प्रभादेवी येथील सिद्धिविनायक मंदिरात दर्शनासाठी मोठी रांग लागते. दर्शन होण्यास दोन दोन तास लागतात पण लोक शांतपणे रांगेत उभे राहतात असे दृश्य आहे. तीच स्थिती तुळजापूर, कोल्हापूर येथे देवीचे दर्शन करताना असते.
"उपासनेला दृढ चालवावे" असे समर्थांनी म्हटले आहे. उपासनेनी काय साधते? देवता म्हणजे शक्तीकेंद्रे आहेत. जसे वीज निर्माण करणारे केंद्र असते. तेथून ती आपल्या घरात आणली जाते व बटण दाबताच घरात दिवे लागतात. त्याचप्रमाणे उपासनेने होते. देवतांमध्ये असलेली शक्ति उपासनेने आपल्यामध्ये अंशतः येते व ती शरीरात अव्यक्तरुपाने साठविली जाते आणि प्रसंगोपात ती व्यक्त स्वरुपात आणता येते. तपश्चर्येने हेच साध्य होते. फक्त त्याचे प्रमाण मोठे असते. अनेक तपस्व्यांनी दिलेले वर व शाप खरे ठरलेले पुराणात तर आहेच, पण वर्तमान काळातही अनेकांना तसे अनुभव येत असतात. नेहमी खरे बोलणारा माणूस एखादे वेळी काही चुकीचे बोलला तरी उपासनेच्या सामर्थ्याने ते खरे होते. अशी उदाहरणे पाहण्यात आहेत.


थर्व म्हणजे गरम, अ थर्व म्हणजे थंड, शीर्ष म्हणजे डोके, थंड ठेवणारे मंत्र म्हणजे अथर्वशीर्ष. जे गरम डोक्याचे म्हणजे थोडे मनाविरुद्ध झाले तर लगेच संतापणारे त्यांना तर अथर्वशीर्ष रोज म्हणणे आवश्यक आहे. अथर्वशीर्षात गणपतीचा बीजमंत्र हा विस्तृतमंत्रात सांकेतिक स्वरुपात सांगितला आहे. तो मंत्र जाणून घ्यावा लागतो. याला मंत्रोद्धार असे म्हणतात. या मंत्राचा उच्चार कसा करावा हे "नादः संधानम्" या वाक्याने सांगितले आहे. वर्णाचा उच्चार म्हणजे व्यक्तीकरण हे शरीरातील सर्वयंत्रांच्या नादाने होत असते. याचा विचार भगवान पाणिनीने फारच उत्तम केला आहे. तो मुळातून पाहणे फार महत्त्वाचे आहे. नाद हे सृष्टीचे मूळ घटकद्रव्य आहे आणि संगीत व मंत्रशास्त्र यावर आधारित आहे. मंत्राचा योग्य पद्धतीने उच्चार करणे याला फारच महत्त्व आहे.
हा मंत्र ओंकाराने समृद्ध करावा असे "तारेणऋद्धम्" या वाक्याने सांगितले आहे. तार म्हणजे ओंकार. ॐ असे म्हटले तर त्याचा उच्चार करताना प्राणवायू ऊर्ध्व होतो. आपणास गतीहि ऊर्ध्व अपेक्षित आहे. म्हणून ओंकार महत्त्वाचा आहे. यालाच प्रणव, तार, एक अशी बरीच नावे आहेत. त्यापैकी येथे तार शब्द का उपयोजला आहे? कारण भक्ताचे संरक्षण झाले पाहिजे. गणपति कसा आहे तर "भक्तानुकंपिनंदेव" म्हणजे भक्तांवर अनुकंपा करणारा आहे. तार या शब्दात रक्षण अपेक्षित आहे. त्याच्या उच्चाराने जन्म, वार्धक्य, व्याधि, मरण, महाभय यापासून तारण म्हणजे रक्षण होते. म्हणून तार असे म्हटले आहे.

गणेशाची नावे

याला वक्रतुंड, विघ्नहर्ता, ब्रह्मणस्पति इत्यादि बरीच नावे आहेत. वक्रतुंड म्हणजे वाकड्या तोंडाचा असा अर्थ समजला जातो. पण तो चूक आहे. "वक्रान् तुण्डयति इति वक्रतुंडः" वेडेवाकडे चालणारे व बोलणारे अशांना शिक्षा करुन जो सरळ मार्गावर आणतो तो वक्रतुंड असा अर्थ आहे. वेदाला ब्रह्म असे म्हणतात. वेद म्हणजे मंत्र, या मंत्रांचा गणेश अधिपति आहे. म्हणून याला ब्रह्मणस्पति असे म्हणतात.
असा हा सृष्टीच्‌या पूर्वीपासून आलेला गणपति देव आहे. "आविर्भूतंच सृष्ट्यादौ" असे अथर्वशीर्षातच म्हटले आहे. असा हा सर्वांना प्रिय असणारा विश्ववंद्य गणपति आहे.
लेखक - मोहन दाते