Saturday, 14 October 2017

सामाजिक स्वास्थ्यासाठी दिवाळी उत्सव


आपल्याकडे साधारण पावसाळा सुरु झाला की सणांची रेलचेलच असते एका पाठोपाठ एक एक सण क्रमानी समोर येत जातात, नवरात्र संपे पर्यंत म्हणजे दसऱ्या पर्यंत वातावरण धार्मिक आणि उत्साहाने भारलेले असते, मात्र दसऱ्याचे सीमोल्लंघन झाले की चाहूल लागते ती पुढच्या मोठ्या सणाची ज्या सणाची लहानथोर सगळेच आतूरतेनी वाट पाहात असतात अशा दिवाळीची.
वर्षभरातील सर्व सणांमध्ये दीपावलि हा सण सर्वात मोठा, आनंददायी असा सण आहे. इतर सर्व सण - उत्सवांपेक्षा दिवाळीच्या चार दिवसात होणारी उलाढाल, दिवाळीमध्ये असलेले वातावरण पावसाळा नुकताच संपून हवेमध्ये आलेल्या गारव्याने वाटणारा प्रसन्नपणा सर्वांनाच आनंद देणारा असतो. याचे कारण नरक चतुर्दशी ते कार्तिक शु. प्रतिपदा या तीन दिवसांत जनतेने मौज मजा करावी, गोडधोड खावे, आनंदी वातावरणात रहावे अशी खुद्द बळीराजाचीच इच्छा आणि त्याला मिळालेला तसा वर यामुळे दिवाळीला विशेष महत्त्व प्राप्त झालेले आहे.
गोवत्स द्वादशी – 

गोवत्स द्वादशीलाच वसुबारस म्हणूनही ओळखले जाते. हिंदू धर्मामध्ये गाईला देवता मानले जाते, गाई विषयी व तिच्या वासराविषयी अत्यंतिक प्रेम, जिव्हाळा दिसून येतो दिवाळीच्या पूर्व संध्येस या गाईचे व तिच्या वासराचे पूजन करून उत्सवाची सुरुवात केली जाते. या दिवशी सायंकाळी वासरासह असलेल्या गाईचे पूजन करून तिला नैवेद्य दाखविला जातो. गाईचे पाठीमागून काही पावले चालण्याची देखील परंपरा अनेक प्रांतांमध्ये दिसून येते. या वर्षी 16 ऑक्टोबर रोजी सोमवारी गोवत्स द्वादशी म्हणजेच वसुबारस आहे.

धनत्रयोदशी - 

धनत्रयोदशीच्या दिवशी देवतांचे जे वैद्य म्हणून पूजले जातात त्या धन्वंतरीचे पूजन केले जाते, कुटुंबातील, मित्र परिवारातील सर्वांच्या आरोग्याकरिता प्रार्थना केली जाते. तसेच या दिवशी घरोघरी कणकेचा दिवा करून त्याची ज्योत दक्षिण दिशेस होईल अशा पद्धतीने तो दिवा ठेवून हात जोडून
मृत्यूना पाशदंडाभ्यां कालेन श्यामयासह ।
त्रयोदश्यां दीपदानात् सूर्यजः प्रीयतां मम ।।
असा श्लोक म्हणून दिव्याला नमस्कार करावा. यावर्षी 17 ऑक्टोबर रोजी मंगळवारी धनत्रयोदशी आहे.
दीपावलि उत्सवामधील पहिला दिवस नरक चतुर्दशी - 

नरकासुर नावाचा एक राजा होऊन गेला, महाभारताच्या कालखंडातील या राजाने नरकासुराने १६ हजार १०८ स्त्रीयांना आपल्या बंदीखान्यात डांबून ठेवले होते. हा नरकासुर प्रजेचाही खूप छळ करीत असे. भगवान श्रीकृष्णांनी या नरकासुराचा वध केला तो दिवस होता आश्विन कृष्ण चतुर्दशीचा, नरकासुराचा वध करून स्त्रीयांची मुक्तता केली. नरकासुराने श्रीकृष्णाकडे शेवटी एक वर मागितला की, आजच्या तिथीला पहाटे चंद्रोदयाचे वेळेस जो मंगलस्नान करेल त्याला नरकाची पीडा होऊ नये. म्हणून नरक चतुर्दशीला पहाटे चंद्रोदयाच्या सुमारास अभ्यंगस्नान करणे महत्त्वाचे मानले आहे.
शरद् ऋतुचा शेवट आणि हेमंत ऋतुचे आगमन अशा संधीकालावर दिवाळीचा सण साजरा करताना पुढे येणा-या थंडीच्या काळासाठी तेल लावून स्नान करण्याची सुरुवात नरक चतुर्दशीच्या अभ्यंगस्नानापासून होते. अकालीमृत्यु येऊ नये म्हणून नरक चतुर्दशीचे दिवशी यमतर्पण करावयास धर्मशास्त्राने सांगितले आहे. अपमृत्यु (अकाली, अपघाती) येऊ नये म्हणून यमाला १४ नावांनी तर्पण करून त्याची प्रार्थना करण्यास सांगितले आहे. पूर्वी पेक्षा सध्याच्या काळात वेगाने चालविल्या जाणा-या वाहनांमुळे अपघाताचे भय वाढले आहे. अपघात, धावपळीचे जीवन, इ. अनेक कारणांमुळे अपमृत्यूचा म्हणजेच अकालीमृत्युचा संभव वाढत असल्याने नरकचतुर्दशीला यमतर्पण करून अपमृत्यु निवारणासाठी यमाची प्रार्थना सर्वांनी करावयाची असते. यंदाचे वर्षी 18 ऑक्टोबर रोजी बुधवारी नरक चतुर्दशी आहे.
लक्ष्मीकुबेर पूजन - 

शेतक-यांसाठी ज्याप्रमाणे मार्गशीर्षातील वेळा अमावास्या शुभ आहे, त्याचप्रमाणे व्यापारी वर्गासाठी आश्विनातील अमावास्येचे महत्त्व आहे. पुराणातील कथेप्रमाणे आश्विन अमावास्येस रात्रीच्या वेळेस लक्ष्मी सर्वत्र संचार करीत असते. जेथे स्वच्छता, शोभा, आनंद, उत्साह आहे अशा ठिकाणी ती आकर्षित होते. म्हणून लक्ष्मीपूजनाचे दिवशी घर, दुकान झाडून, स्वच्छ करून, सुशोभित करून सूर्यास्तानंतर लक्ष्मी व कुबेर यांचे आनंदाने पूजन करून ऐश्वर्य, संपत्ति, समृद्धीसाठी प्रार्थना करावयाची असते.
नमस्ते सर्वदेवानां वरदासि हरिप्रिये।
या गतिस्त्वत्प्रपन्नानां सा मे भूया तव दर्शनात्।। (अशी लक्ष्मीची प्रार्थना करावी)

आणि

धनदाय नमस्तुभ्यं निधिपद्माधिपायच।
भवन्तु त्वत्प्रसादेन धनधान्यादिसम्पदः।। (अशी कुबेराची प्रार्थना करावी.)

यापूजेत समृद्धीचे प्रतीक म्हणून साळीच्या लाह्या आवश्यक असतात. तसेच झेंडूची फले, बत्तासे या समृद्धी दर्शक गोष्टींचा देखील समावेश केलेला असतो. या वर्षी 19 ऑक्टोबर, गुरुवारी सर्वांनी घरोघरी मनोभावे लक्ष्मी व कुबेराचे पूजन करावयाचे आहे. सायंकाळी 04.45 पासून रात्री 08.40 पर्यंत किंवा रात्री 9.35 नंतर 11.55 पर्यंत या वेळेमध्ये कधीही आपल्या परंपरेप्रमाणे लक्ष्मीपूजन करता येईल.
बलिप्रतिपदा (दिवाळी पाडवा) - 

साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेला शुभफलदायी असा दिवस म्हणजे दिवाळी पाडवा किंवा बलिप्रतिपदा, कार्तिक शुक्ल प्रतिपदेला बलिप्रतिपदा असे म्हणतात. या दिवशी दानशूर अशा बळीराजाची पूजा करावयाची असते. पाटावर तांदूळांनी बलीची प्रतिमा काढून त्याचे पूजन केले जाते. ज्याप्रमाणे चैत्र शुक्ल प्रतिपदेस शालिवाहन शक, नवे संवत्सर सुरु होते, त्याप्रमाणे कार्तिक शुक्ल प्रतिपदेस विक्रम संवत्सर सुरु होते. या बलिप्रतिपदेच्या दिवशी शोभन नावाचे 2068 वे संवत् सुरु होत आहे. या दिवशी व्यापारी वर्षास सुरुवात होत असल्याने वहीपूजन, दुकानाची पूजा करून नवीन वर्षाचे स्वागत केले जाते. या दिवशी पत्नीने पतीस ओवाळावे म्हणजे दोघांचे ही आयुष्य वाढते असे पुराणात सांगितले आहे. दिवाळीतील इतर दिवसांप्रमाणेच या दिवशी देखील सकाळी लवकर उठून अभ्यंगस्नान करून देव दर्शनास जावयाचे असते. या दिवशी भारतामध्ये अनेक ठिकाणी गोवर्धन पूजनाचा मोठा उत्सव साजरा केला जातो. साडेतीन मुहूर्तापैकी एक दिवस असल्याने अनेक नवीन संकल्प केले जातात, नव्या उद्योगांची सुरुवात करण्यास हा दिवस शुभ आहे. या वर्षी 20 ऑक्टोबर रोजी शुक्रवारी भारतामध्ये सर्वत्र बलिप्रतिपदा साजरी केली जाईल. व्यापाऱ्यांकरिता हा दिवस महत्त्वाचा असल्याने त्यांनी पहाटे 3.35 ते 6.35 किंवा सकाळी 8.05 ते 11.05 या पैकी कोणत्याही एका मुहूर्तावर परंपरेप्रमाणे वहीपूजन करून नवीन वर्षाची सुरुवात करावी.
यमद्वितीया (भाऊबीज) - 

नरक चतुर्दशी, अमावास्या व बलिप्रतिपदा हे दिवाळीचे मुख्य तीन दिवस आहेत. मात्र या तीन दिवसांना जोडून येणारी भाऊबीज सुद्धा दिवाळीच्या दिवसात गणली जाते. कार्तिक शुक्ल द्वितीयेच्या दिवशी यमराज आपल्या बहिणीच्या हातचे भोजन करून बहिणीचा सत्कार करीत असे, अशी पुराणात गोष्ट आहे. म्हणून या दिवशी बहिणीने भावाला जेवावयास बोलावून त्याला ओवाळावे असे सांगितले आहे. यावर्षी 21 ऑक्टोबर रोजी शनिवारी भाऊबीज म्हणजेच यमद्वितीया आहे.
दिवाळीच्या या चार दिवसात सर्वत्र आनंदोत्सव साजरा करावयाचा असल्याने दीपमाळ, आकाशदिवे, दिव्यांची रोषणाई करून दीपोत्सव केला जातो. म्हणून या चार दिवसांना दीपावली किंवा दिवाळी असे म्हटले जाते.
वर्षभरातील इतर सण - उत्सव यामध्ये धार्मिक स्वरूप मोठ्या प्रमाणात असते. त्याप्रमाणे दिवाळीचे स्वरूप नसते. सर्व समाजाने दुःख, भेदभाव विसरून चार दिवस आनंदात रहावयाचे असते. काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत संपूर्ण भारतात दिवाळी साजरी करण्याची पद्धति जवळजवळ सारखीच आहे. मुख्यतः घर, दुकान स्वच्छ करून, दिव्यांची रोषणाई, फराळाचे पदार्थ, गोडधोड पक्वान्न करणे, अभ्यंगस्नान, दिवाळीच्या निमित्ताने आप्तेष्टांनी एकत्र येणे इ. गोष्टी केल्या जातात पतीने पत्नीसाठी, भावाने बहिणीसाठी, मालकांनी कर्मचा-यांसाठी भेटवस्तू देणे आणि स्नेहभाव दृढ करणे यामुळे संपूर्ण समाजात - कुटुंबात एकोपा राखला जातो.

Sunday, 18 December 2016

अयन खरे कोणते ?

लेखाचे शीर्षक बुचकळ्यात टाकणारे आहे. उत्तरायण, दक्षिणायन हे शब्द ज्यांनी ऐकले आहेत त्यांना प्रश्न पडेल की, अयन ही घटना आहे. जे घडते ती घटना. मग त्यात खरे ? खोटे ? हा प्रश्न कुठे आला. काहींना मूलभूत प्रश्न पडेल की अयन म्हणजे काय ? हेच आम्हाला माहीत नाही. खरे की खोटे हा प्रश्न त्यानंतरचा. चला तर मग अयनही संकल्पना समजावून घेऊ या.

आपले निरीक्षण काय सांगते ?
आपण क्षितीजावर उदय पावणारे किंवा मावळणारे सूर्यबिंब पहा. काही दिवसांच्या निरीक्षणाने असे लक्षात येईल की दररोजचा सूर्योदय किंवा सूर्यास्त क्षितीज संदर्भाने एकाच ठिकाणी होत नाही. उदय पावणाऱ्या किंवा अस्तास जाणाऱ्या सूर्यबिंबाची जागा उत्तरेकडे किंवा दक्षिणेकडे हळूहळू सरकते. दीर्घ निरीक्षणाने आपल्या हे सुद्धा लक्षात येईल की सूर्यबिंबाची जागा क्षितीज संदर्भाने सरकण्यासही एक मर्यादा आहे. आयाम (amplitude) आहे. उदाहरणार्थ झोपाळा. झोपाळा काही जत्रेतील पाळण्यासारखा संपूर्ण फिरत नाही. दोन्ही टोकाकडे तो विशिष्ट मर्यादेपर्यंतच जातो. या मर्यादेलाच आयाम म्हणतात.

सूर्याचा उत्तर-दक्षिण आयाम
क्षितीज संदर्भाने सूर्याची उदयाची किंवा अस्ताची जागा उत्तरेकडे आणि दक्षिणेकडे विशिष्ट मर्यादेत बदलणे यास आपण सूर्याचा आयाम म्हणू या. असे का घडते ते पाहू या. पृथ्वीचे विषुववृत्त (equator) हा शब्द आपणास परिचयाचा आहे. पृथ्वीच्या विषुववृत्ताला समांतर असे एक वर्तुळ आकाशात स्थित आहे असे समजा.
या वर्तुळाला आपण आकाशातील विषुववृत्त (celestial equator) किंवा वैषुविकवृत्त म्हणू या. सूर्याभोवती परिभ्रमण करणाऱ्या पृथ्वीचा आस २३.५ अंशाने कलता आहे असे आपण ऐकलेले असते पण या कलतेपणाच्या परिणामाचा आपण पुरेसा विचार केलेला नसतो. या कलतेपणामुळे पृथ्वीच्या परिभ्रमणाचा मार्ग (कक्षा) आणि वैषुविकवृत्त एकमेकांना छेदतात. उगवत्या किंवा मावळत्या सूर्याची क्षितीज संदर्भाने उत्तर दक्षिण दिशेत विशिष्ट मर्यादेत जागा बदलणे हा या कलतेपणाचा निरीक्षणाने अनुभवाला येणारा परिणाम आहे. क्षितीजावरील पूर्व बिंदूच्या उत्तरेस २३.५ अंशावर जाण्याची कमाल मर्यादा सूर्याने गाठली की तो दक्षिणेकडे येऊ लागतो यास दक्षिणायन म्हणतात. या उलट पूर्वबिंदूच्या दक्षिणेस २३.५ अंशावर जाण्याची कमाल मर्यादा सूर्याने गाठली की तो उत्तरेकडे येऊ लागतो यास उत्तरायण म्हणतात. अशा तऱ्हेने उत्तरायण किंवा दक्षिणायन ही सूर्याच्या संदर्भाने आपल्याला अनुभवायला येणारी नैसर्गिक घटना आहे.
सारांश रूपाने सूर्याच्या तीन भ्रमणांचा आपण उल्लेख करू.
१)     सूर्य क्षितीजाच्या पूर्व भागात उगवून पश्चिम भागात मावळतो. हे सूर्याचे दैनिक भ्रमण आहे. हा पृथ्वीच्या परिवलनाचा (rotation) परिणाम आहे.
२)     तारकांच्या संदर्भाने सूर्याची जागा पश्चिमेकडून पूर्वेकडे थोडी थोडी सरकत जाते (दररोज साधारण १ अंश) हा पृथ्वीच्या परिभ्रमणाचा परिणाम आहे.
३)     सूर्याची उगवण्याची किंवा मावळण्याची जागा उत्तरेकडे किंवा दक्षिणेकडे हळूहळू सरकत जाते हा पृथ्वीच्या कलतेपणाचा परिणाम आहे. या तीनही गोष्टी एकाचवेळी होत असतात. यातील अयन या घटनेचा विशेष विचार करू.

सूर्याचे स्थान आणि परिभाषा.
कालमापनासाठी सूर्याच्या गतीचा आपण उपयोग करून घेतला. पृथ्वीची सूर्याभोवतीची एक प्रदक्षिणा म्हणजे वर्ष असे परिमाण आपल्याला मिळाले. वर्षाच्या ३६५ दिवसांचे स्थूलमानाने चार भाग आपणास निसर्गतःच करता आले. त्याचा संदर्भ म्हणजे सूर्यमार्गावरील (आयनिकवृत्त) सूर्याचे वैषुविकवृत्ताच्या संदर्भाने असणारे स्थान.
आयनिक वृत्त (सूर्याचा वार्षिक भ्रमण मार्ग) आणि वैषुविकवृत्त यांचे अर्थातच १८० अंशाच्या फरकाने असलेले दोन छेदनबिंदू यांना संपात बिंदू म्हणतात. (equinoctial points) ज्या बिंदूपाशी आल्यानंतर सूर्याचा पुढचा प्रवास वैषुविकवृत्ताच्या उत्तर बाजूस होतो. तो संपात बिंदू वसंत संपात बिंदू (Vernal equinox)” म्हणून ओळखला जातो. या बिंदूपासून साधारण तीन महिन्यांनी सूर्य वैषुविकवृत्ताच्या उत्तरेस २३.५ अंश जाण्याची कमाल मर्यादा गाठतो. या बिंदूला उत्तरविष्टंभ बिंदू (Summer Solstice) म्हणतात. येथून माघारी म्हणजे दक्षिणेकडे वळतो. ही एक घटना आहे. ती घडण्याचा एक क्षण असतो. या घटनेलाच आपण दक्षिणायन असे म्हणतो. याची तुलना आपल्याला व्यावहारिक उदाहरणाने करता येईल. विवाह अमुक दिवशी आहे असं आपण म्हणतो पण लग्न लागणे हा क्षण असतो. तसंच दक्षिणायन अमुक दिवशी आहे असे आपण म्हणतो. परंतु सूर्य उत्तरविष्टंभ बिंदूपाशी असण्याचा एक क्षण (एक विशिष्ट वेळ) असते.



आकृतीचे स्पष्टीकरण
ABCD             –          वैषुविकवृत्त.                   EDFB             –          आयनिकवृत्त.
B                     –          वसंत संपात बिंदू.            E                     –          उत्तरविष्टंभ बिंदू.
D                     –          शरद संपात बिंदू.            F                      –          दक्षिण बिष्टंभ बिंदू.
E ते F               –          दक्षिणायन.                    F ते E               –          उत्तरायण.
BED                –          सूर्याचा उत्तर                  DFB                –          सूर्याचा दक्षिण
गोलार्धातील काळ.                                              गोलार्धातील काळ

उत्तरेची परम मर्यादा (२३.५ अंश) गाठून दक्षिणेकडे येणारा सूर्य साधारण तीन महिन्यांनी पुन्हा एकदा वैषुविकवृत्त ज्या बिंदूपाशी ओलांडतो त्या बिंदूला शरद संपात बिंदू म्हणतात. (Autumnal equinox) तेथून पुढे सूर्य वैषुविक वृत्ताच्या दक्षिणेस जातो. पुन्हा स्थूलमानाने तीन महिन्यांची दक्षिणेकडे जाण्याची कमाल मर्यादा (२३.५ अंश) गाठतो. या बिंदूला दक्षिण विष्टंभ बिंदू (winter solstice) म्हणतात. या क्षणापासून उत्तरायण सुरु होते आणि हळू हळू उत्तरेकडे सरकणारा सूर्य पुन्हा एकदा वसंत संपात बिंदूशी येतो. अशा त-हेने सूर्याची एक फेरी संपात बिंदू संदर्भाने पूर्ण होते. पृथ्वीचा अक्ष कलता नसता आणि तिच्या परिभ्रमण मार्गाशी तो नेहमी काटकोनात असता तर सूर्याचा दैनिक मार्ग नेहमी समानच राहिला असता. त्यामुळे ऋतु अनुभवाला आले नसते. परंतु अक्षाच्या कलेतपणाचा परिणाम म्हणून सूर्याचा दैनिक मार्ग उत्तर आणि दक्षिण असा सरकत जातो. यामुळे दिवस रात्रीचा लहान मोठेपणा, तापमानातील वार्षिक चढ उतार आपण अनुभव शकतो. थोडक्यात उत्तरायण-दक्षिणायन यामुळेच ऋतु होतात. सूर्य एकदा वसंत संपात बिंदूशी आला की पुन्हा वसंत संपात बिंदूशी येईपर्यंतच्या कालावधीला आर्तव वर्ष (ऋतुंचे वर्ष tropical year) म्हणतात.

कॅलेंडर आणि ऋतूंचे वर्ष –
जानेवारी ते डिसेंबर हे ग्रेगोरियन वर्ष. तसेच स्वतंत्र भारताचे राष्ट्रीय वर्ष ही दोनही वर्षे ऋतूंच्या वर्षाशी समायोजित (adjust) केली असल्यामुळे उत्तरायण, दक्षिणायन इ. दिवस कॅलेंडरप्रमाणे निश्चित तारखांना येतात. कोष्टक रुपात ते मांडू या.

सूर्याचे स्थान
ग्रेगोरियन
दिनांक
राष्ट्रीय
दिनांक
घटना
वसंत संपात
(Vernal equinox)
२२ मार्च
१ चैत्र
दिवस रात्र समान
उत्तर विष्टंभ
(Summer Solstice)
२२ जून
१ आषाढ
दक्षिणायन आरंभ
शरद संपात
(Autumnal equinose)
२३ सप्टेंबर
१ अश्विन
दिवस रात्र समान
दक्षिण विष्टंभ
(winter solistice)
२२ डिसेंबर
१ पौष
उत्तरायण आरंभ


राष्ट्रीय कॅलेंडरबद्दल थोडेसे
आपल्या भारताने २२ मार्च १९५७ पासून स्वतःचे राष्ट्रीय कॅलेंडर अस्तित्वात आणले आहे. अनेक भारतीयांना याची नीटशी कल्पना नाही. ज्यांना हे कॅलेंडर माहित आहे त्यांच्या दृष्टीने ब्रिटीश काळापासून चालत आलेले कॅलेंडर राष्ट्रीय भावनेपेक्षा सोयीचे वाटत असल्यामुळे बहुसंख्य लोक राष्ट्रीय कॅलेंडर वापरीत नाहीत. राष्ट्रीय कॅलेंडर अस्तित्वात येऊन ६ दशके व्हायला आली तरी ते कागदोपत्रीच राहिले आहे. परंतु राष्ट्रीय कॅलेंडर शास्त्रीय असून अत्यंत विचारपूर्वक केलेले आहे. राष्ट्रीय कॅलेंडर ऋतूंच्या वर्षाशी समायोजित केलेले असून त्यातील महिन्यांची नावे चांद्र महिन्यांच्या नावाप्रमाणे चैत्र, वैशाख...... ते फाल्गुन अशीच आहेत. (अपवाद-मार्गशीर्ष) (मार्गशीर्ष ऐवजी अग्रहायण) राष्ट्रीय वर्ष ऋतूंशी जोडलेले असल्यामुळे ते २२ मार्चला सुरु होते. तो दिवस १ चैत्र असतो. इतर महिने सुद्धा सूर्याच्या विशिष्ट स्थानाशी जोडले आहेत हे दिलेल्या कोष्टकावरून कळेलच.

सूर्य स्थानांचा वेगळा संदर्भ – नक्षत्रे
उत्तरायण, दक्षिणायन या घटनांचा संदर्भ आपण कॅलेंडर च्या तारखांच्या संदर्भात बघितला पण पूर्वी म्हणजे वेदकाळात या घटनांच्या संदर्भासाठी नक्षत्रांचा वापर करीत असत. साधारण १७०० वर्षांपूर्वी सूर्य रेवती नक्षत्र विभागात असतांना वसंत संपात बिंदूशी असे. किंबहुना वसंत संपात बिंदू रेवती नक्षत्रांत होता असे म्हणणे अधिक योग्य ठरेल. नक्षत्र किंवा राशीचक्राची सुरुवात वसंत संपात बिंदूपासून करण्याची पद्धत असल्यामुळे रेवती नंतर येणारे अश्विनी नक्षत्र हे पहिले नक्षत्र आणि अश्विनी नक्षत्रापासून सुरु होणारी मेष रास ही पहिली रास ठरली परंतु पृथ्वीच्या एका विशिष्ट गतीमुळे (परांचन गती) संपात बिंदू तसेच विष्टंभ बिंदू नक्षत्रात स्थिर रहात नाहीत. हे बिंदू उलट क्रमाने म्हणजे मागच्या नक्षत्रात सरकतात. यातील प्रत्येक बिंदू साधारण ७२ वर्षात एक अंश मागे सरकतो, परंतु आपली पंचांगे नाक्षत्र वर्ष मानतात. नाक्षत्र वर्ष म्हणजे समजा सूर्याने आज अश्विनी नक्षत्रात आणि मेष राशीत प्रवेश केला की पुन्हा नक्षत्रात येईपर्यंत जो कालावधी त्याला नाक्षत्र वर्ष (sidereal year) म्हणतात. (परंतु संपात बिंदू पश्चिमेकडे सरकत असल्यामुळे संपात बिंदू ते पुन्हा तोच संपात बिंदू या सूर्य आवर्तनाने होणारे ऋतूंचे वर्ष, [सांपातिक वर्ष (tropical year)] नाक्षत्र वर्षांपेक्षा लहान होते. सुमारे १७०० वर्षापूर्वी दक्षिण विष्टंभ बिंदू आणि मकर राशीचा आरंभ यांची सांगड होती. त्यामुळे मकर राशीत सूर्याने प्रवेश केला की उत्तरायणही सुरू होत असे. पण ऋतूंचे वर्ष म्हणजे उत्तरायण हा काळ नाक्षत्र वर्षापेक्षा थोडा कमी असल्यामुळे उत्तरायण अगोदर होते आणि सूर्याचा मकर राशीतील प्रवेश पुढे पुढे सरकत जातो. आज मितीस दक्षिण विष्टंभ बिंदू आणि मकर राशीची सुरुवात यांच्यामध्ये २४ अंशाचे अंतर पडले आहे. त्यामुळे उत्तरायण २२ डिसेंबरला (राष्ट्रीय सौर १ पौष) होते तर मकर संक्रमण १४ जानेवारीच्या सुमारास होते.
मकर संक्रांतीच्या दिवशीचे तीळ गूळाचे महत्व पाहिले तर हा सण सूर्याशी म्हणजे हिवाळ्याशी निगडीत आहे असे वाटते. सूर्य जास्तीत जास्त दक्षिणेला असतो तेव्हा म्हणजेच उत्तरायण सुरु होते तेव्हा आपल्याकडे थंडी असते. म्हणजे मकरसंक्रातीचा संबंध उत्तरायणाशी आहे. सूर्याच्या मकर राशीतील प्रवेशाशी नाही. उत्तरायण सुरु झाल्यानंतर सुमारे २३ ते २४ दिवसांनी सूर्य मकर राशीत प्रवेश करीत असल्यामुळे मकर राशीतील सूर्य प्रवेश म्हणजे उत्तरायण दिवस हे खरे की खोटे हे वाचकांनीच ठरवयाचे आहे.

उत्तरायणाचा दिवस आणि वेळ
उत्तरायण ही एक घटना आहे हे आपण सुरुवातीसच पाहिले. सूर्य दक्षिण विष्टंभा पाशी पोहोचला म्हणजे उत्तरायण सुरु होते. अर्थात उत्तरायण या घटनेची सुरुवात हा क्षण आहे. वेळ आहे.
काही वर्षातील सूर्य जास्तीत जास्त दक्षिणेकडे म्हणजे दक्षिण विष्टंभ बिंदूपाशी पोहोचण्याच्या तारखा व वेळा भारतीय प्रमाण वेळेनुसार पुढे दिल्या आहेत.

वर्ष व दिनांक
दक्षिण विष्टंभ बिंदूपाशी
पोहचण्याची वेळ
२१ डिसेंबर २०१६
२२ डिसेंबर २०१५
२२ डिसेंबर २०१४
२१ डिसेंबर २०१३
२१ डिसेंबर २०१२
दुपारी ४-१४
सकाळी १०-१८
पहाटे ४-३३
रात्री १०-४१
दुपारी ४-४२

उत्तरायणाची तारीख २१ किंवा २२ डिसेंबर आपण वर्षाचे दिवस ३६५ घेतो व लीप वर्ष ३६६ दिवसांचे असते. उत्तरायण ते उत्तरायण हा कालावधी सरासरी ३६५ दिवस ४८ मिनिटे आणि काही सेकंदांचा आहे त्यामुळे वेळाही भिन्न येतात.
स्थूल व्यवहारासाठी उत्तरायणाची तारीख पुरेशी असते म्हणूनच राष्ट्रीय सौर कॅलेंडरमध्ये २२ डिसेंबर (उत्तरायणाचा आरंभ) ही तारीख सौर १ पौष अशी असते. ग्रेगोरिन कॅलेंडर व राष्ट्रीय कॅलेंडर ही दोनही कॅलेंडर्स नाक्षत्र वर्षाशी समायोजित न करता ऋतूंच्या वर्षाशी समायोजित केल्यामुळे उत्तरायण विशिष्ट तारखेलाच होत राहील आणि ती तारीख २२ डिसेंबर किंवा सौर १ पौषच असेल.

-       हेमंत मोने
( खगोल अभ्यासक )

Monday, 24 October 2016

दिवाळी

वर्षभरातील सर्व सणांमध्ये दीपावलि हा सण सर्वात मोठा आनंददायी असा आहे. इतर सर्व सण - उत्सवांपेक्षा दिवाळीच्या चार दिवसात होणारी उलाढाल सर्वांनाच आनंद देणारी असते. याचे कारण नरक चतुर्दशी ते कार्तिक शु. प्रतिपदा या तीन दिवसांत जनतेने मौज मजा करावी, गोडधोड खावे, आनंदी वातावरणात रहावे अशी बळीराजाची इच्छा आणि त्याला मिळालेला वर यामुळे दिवाळीला विशेष महत्त्व प्राप्त झालेले आहे.

वसुबारस – 26 ऑक्टोबर 2016, बुधवार


पूर्वीच्याकाळी धन हे गोधन स्वरूपात देखील असावायचे त्या धनाची म्हणजे गाईची पूजा आश्विन वद्य द्वादशीला करतात. संध्याकाळी गायी चरून आल्यानंतर गायवासरांची गंधादी उपचारांनी पूजा करून –
‘क्षीरोदार्णवसंभूते सुरासुरनमस्कृते । सर्वदेवमये मातर्गुहाणार्घ्यं नमोऽस्तु ते ।’ हा मंत्र म्हणून पुढील पायावर अर्घ्य द्यावे आणि ‘सर्वदेवमये देवि सर्वदेवैऽरलंकृते । मातर्ममाभिलषितं सफलं कुरु नंदिनि ।’ अशी प्रार्थना करावी.
महत्त्वाची एक गोष्ट आहे की, त्या दिवशीच्या जेवणात गायीचे दूध, दही, तूप, ताक, खीर, तसेच भजी इत्यादी वर्ज्य. या दिवशी सौभाग्यवती स्त्रिया एकभुक्त राहून हे व्रत करतात. सकाळी अथवा सायंकाळी सवत्स गायीची पूजा करतात. समुद्रमंथनातून पाच कामधेनू उत्पन्न झाल्या. त्यातल्या नंदा नावाच्या धेनूला उद्देशून हे व्रत आहे.

धनत्रयोदशी 28 ऑक्टोबर 2016, शुक्रवार



आश्विन वद्य त्रयोदशीला धनत्रयोदशी म्हणतात. या दिवशी वस्त्रालंकाराची खरेदी करणे शुभ मानतात. उपवास करून घरातले द्रव्य व अलंकार पेटीतून काढून साफसूफ करतात व पूजन करून पुनश्च योग्य ठिकाणी ठेवतात. कुबेर, विष्णू, लक्ष्मी, योगिनी, गणेश, नाग आणि द्रव्यनिधी यांची पूजा करून नैवेद्य दाखवितात, यथाशक्ती दान करतात. या दिवशी सायंकाळी दिवा तेलाने भरून प्रज्वलित करावा व नंतर त्याची पूजा करून घराच्या दाराजवळ, धान्याच्या राशीजवळ ठेवावा.
धनत्रयोदशीला संध्याकाळी मातीच्या किंवा कणकेच्या दिव्यात तेल, वात घालून प्रज्वलित करावा हा दिवा दक्षिणेकडे ज्योत करून ठेवावा. 
मृत्यूना पाशदंडाभ्यां कालेन श्यामया सह । त्रयोदश्यां दीपदानात् सूर्यजः प्रीयतां मम । असा मंत्र म्हणून ह्या दिव्यास नमस्कार करावा यास यमदीपदान म्हणतात.


याच दिवशी आयुर्वेदाचा प्रवर्तक धन्वन्तरी याची पूजा वैद्यकाची प्रगती होण्याकरिता वैद्य लोक करतात. हा देवांचा वैद्य मानला जातो. देव-दैत्यांनी क्षीरसागराचे मंथन केले. त्यातून चौदा रत्ने निघाली. त्यांत सुधर्मात्मा व आयुर्वेदमय दंड कमंडलुसहित असा धन्वन्तरी हातात अमृतकलश घेऊन बाहेर पडला. हा विष्णूचा अवतार असून सर्व वेदांत निष्णात व मंत्रतंत्रातही विशारद होता. याला आदिदेव, अमरवर, अमृतयोनी, सुधापाणी, अब्ज इत्यादी अन्य नावेही आहेत. याच्या अलौकिक प्रतिभेने नाना औषधींचे सार अमृतरूपाने देवांना प्राप्त झाले. ते जरामृत्युरहित बनले. त्यामुळे त्याला देवांचे वैद्यराजपद लाभले. भागवत पुराणात विष्णूच्या चोवीस अवतारांत धन्वन्तरीचा समावेश केला आहे. आरोग्य प्राप्तीसाठी ईशान्य दिशेकडे मुख करून सायंप्रार्थना करावी. धन्वन्तरीने चिकित्सेचे ज्ञान भास्करापासून प्राप्त केले आणि भास्कराच्या आयुर्वेदसंहितेच्या आधारे ‘चिकित्सा तत्त्वविज्ञान’ नामक ग्रंथ रचला. तेव्हापासून आयुर्वेदाचा प्रसार सुरू झाला. धन्वंतरी देवतेचे पूजन केवळ आयुर्वेदाचे डॉक्टर करतात असे नाही तर सर्वच शाखांचे डॉक्टर धन्वंतरी पूजन करतात.

नरक चतुर्दशी – 29 ऑक्टोबर 2016, शनिवार


नरकासुराने 16 हजार 108 स्त्रियांना आपल्या बंदीखान्यात डांबून ठेवले होते. हा नरकासुर प्रजेचाही खूप छळ करीत असे. भगवान श्रीकृष्णांनी या नरकासुराचा वध आश्विन कृष्ण चतुर्दशीला करून स्त्रियांची मुक्तता केली. नरकासुराने श्रीकृष्णाकडे वर मागितला की, आजच्या तिथीला जो मंगलस्नान करेल त्याला नरकाची पीडा होऊ नये. म्हणून नरक चतुर्दशीला पहाटे अभ्यंगस्नान करणे महत्त्वाचे मानले आहे.
शरद् ऋतूचा शेवट आणि हेमंत ऋतूचे आगमन अशा संधीकालावर दिवाळीचा सण साजरा करताना पुढे येणा-या थंडीच्या काळासाठी तेल लावून स्नान करण्याची सुरुवात नरक चतुर्दशीच्या अभ्यंगस्नानापासून होते. तिळाच्या तेलापासून केलेले उटणे अंगास लावावे व स्वच्छ स्नान करावे. या चतुर्दशीस ‘रूपचतुर्दशी’ असेही म्हणतात.
नरक चतुर्दशीचे दिवशी यमतर्पण करावयास सांगितले आहे. अपमृत्यु येऊ नये म्हणून यमाला 14 नावांनी तर्पण करून “यमोनिहंता पितृधर्मराजो वैवस्वतो दंडधरश्च कालः। भूताधिपो दत्त कृतानुसारी कृतांत एतद्दशभिर्जपंति।।” हा श्लोक 10 वेळा म्हणून प्रार्थना करण्यास सांगितले आहे. पूर्वीपेक्षा सध्याच्या काळात वेगाने चालविल्या जाणा-या वाहनांमुळे अपघाताचे भय वाढले आहे. अपघात, धावपळीचे जीवन, इ. अनेक कारणांमुळे अपमृत्यूचा संभव वाढत असल्याने नरकचतुर्दशीला यमतर्पण करून अपमृत्यु निवारणासाठी यमाची प्रार्थना सर्वांनी करणे आवश्यक आहे.

लक्ष्मीकुबेर पूजन – 30 ऑक्टोबर 2016, रविवार


शेतकऱ्यांसाठी ज्याप्रमाणे मार्गशीर्षातील वेळा अमावास्या शुभ आहे, त्याप्रमाणे व्यापारीवर्गासाठी आश्विनातील अमावास्या शुभ आहे. पुराणातील कथेप्रमाणे आश्विन अमावास्येस रात्री लक्ष्मी सर्वत्र संचार करीत असते. जेथे स्वच्छता, शोभा, आनंद आहे अशा ठिकाणी ती आकर्षित होते. म्हणून लक्ष्मीपूजनाचे दिवशी घर, दुकान झाडून, स्वच्छ करून, सुशोभित करून सूर्यास्तानंतर लक्ष्मी व कुबेर यांचे पूजन करून ऐश्वर्य, संपत्ति, समृद्धिसाठी प्रार्थना करावयाची असते.
नमस्ते सर्वदेवानां वरदासि हरिप्रिये या गतिस्त्वत्प्रपन्नानां सा मे भूया तव दर्शनात्
अशी लक्ष्मीची प्रार्थना करावी आणि
धनदाय नमस्तुभ्यं निधिपद्माधिपायच भवन्तु त्वत्प्रसादेन धनधान्यादिसम्पदः
अशी कुबेराची प्रार्थना करावी. यापूजेत श्रीसूक्त म्हणून अभिषेक केला जातो. समृद्धीचे प्रतीक म्हणून साळीच्या लाह्या आवश्यक असतात.
लक्ष्मीपूजन मुहूर्त - सायं. ०६।०५ ते रात्री ०९।१०, रात्री ०९।३० ते ११

बलिप्रतिपदा (दिवाळी पाडवा) – 31 ऑक्टोबर 2016, सोमवार


कार्तिक शुक्ल प्रतिपदेला बलिप्रतिपदा असे म्हणतात साडेतीन मुहूर्तांपैकी हा एक शुभ मुहूर्त आहे. या दिवशी दानशूर अशा बळीराजाची पूजा करण्यास सांगितली आहे. ज्याप्रमाणे चैत्र शुक्ल प्रतिपदेस शालिवाहन शक नवे संवत्सर सुरु होते, त्याप्रमाणे कार्तिक शुक्ल प्रतिपदेस विक्रम संवत्सर सुरु होते. व्यापारी वर्षास सुरुवात होत असल्याने वहीपूजन, दुकानाची पूजा करून नवीन वर्षाचे स्वागत केले जाते. या दिवशी पत्नीने पतीस ओवाळावे म्हणजे दोघांचे ही आयुष्य वाढते.
वहीपूजन मुहूर्त - पहाटे ०१।३५ ते ४, पहाटे ५ ते सकाळी ०८।१५, सकाळी ०९।५० ते ११।२०

यमद्वितीया (भाऊबीज) - 1 नोवेंबर 2016, मंगळवार

नरक चतुर्दशी, अमावास्या व बलिप्रतिपदा हे दिवाळीचे मुख्य तीन दिवस आहेत. मात्र या तीन दिवसांना जोडून येणारी भाऊबीज सुद्धा दिवाळीच्या दिवसात गणली जाते. कार्तिक शुक्ल द्वितीयेच्या दिवशी यमराज आपल्या बहिणीच्या हातचे भोजन करून बहिणीचा सत्कार करीत असे, अशी पुराणात गोष्ट आहे. म्हणून या दिवशी बहिणीने भावाला जेवावयास बोलावून त्याला ओवाळावे असे सांगितले आहे.
दिवाळीच्या या चार दिवसात सर्वत्र आनंदोत्सव साजरा करावयाचा असल्याने दीपमाळ, आकाशदिवे, दिव्यांची रोषणाई करून दीपोत्सव केला जातो. म्हणून या चार दिवसांना दीपावली किंवा दिवाळी असे म्हटले जाते.
वर्षभरातील इतर सण - उत्सव यांचे प्रमाणे दिवाळीचे स्वरूप नसते. सर्व समाजाने दुःख, भेदभाव विसरून चार दिवस आनंदात रहावयाचे असते. काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत संपूर्ण भारतात दिवाळी साजरी करण्याची पद्धति जवळजवळ सारखीच आहे. मुख्यत: घर, दुकान स्वच्छ करून, दिव्यांची रोषणाई, फराळाचे पदार्थ, गोडधोड पक्वान्न करणे, अभ्यंगस्नान, दिवाळीच्या निमित्ताने आप्तेष्टांनी एकत्र येणे इ. गोष्टी केल्या जातात पतीने पत्नीसाठी, भावाने बहिणीसाठी, मालकांनी कर्मचाऱ्यांसाठी भेटवस्तू देणे आणि स्नेहभाव दृढ करणे यामुळे संपूर्ण समाजात - कुटुंबात एकोपा राखला जातो.

प्रत्येक धर्मीयांच्या सण - उत्सवामुळे संपूर्ण भारतात खरेदी - विक्री होऊन आर्थिक उलाढाल वाढते अर्थातच त्यामुळे आर्थिक स्वास्थ्य प्राप्त होऊन भारताची प्रगति होण्यात या सण - उत्सवांचे मोठे सहकार्य लाभते ही गोष्ट निश्चितच लक्षात ठेवली पाहिजे.

दीपावलीच्या दाते पंचांग परिवारातर्फे हार्दिक शुभेच्छा !