Monday, 24 October 2016

दिवाळी

वर्षभरातील सर्व सणांमध्ये दीपावलि हा सण सर्वात मोठा आनंददायी असा आहे. इतर सर्व सण - उत्सवांपेक्षा दिवाळीच्या चार दिवसात होणारी उलाढाल सर्वांनाच आनंद देणारी असते. याचे कारण नरक चतुर्दशी ते कार्तिक शु. प्रतिपदा या तीन दिवसांत जनतेने मौज मजा करावी, गोडधोड खावे, आनंदी वातावरणात रहावे अशी बळीराजाची इच्छा आणि त्याला मिळालेला वर यामुळे दिवाळीला विशेष महत्त्व प्राप्त झालेले आहे.

वसुबारस – 26 ऑक्टोबर 2016, बुधवार


पूर्वीच्याकाळी धन हे गोधन स्वरूपात देखील असावायचे त्या धनाची म्हणजे गाईची पूजा आश्विन वद्य द्वादशीला करतात. संध्याकाळी गायी चरून आल्यानंतर गायवासरांची गंधादी उपचारांनी पूजा करून –
‘क्षीरोदार्णवसंभूते सुरासुरनमस्कृते । सर्वदेवमये मातर्गुहाणार्घ्यं नमोऽस्तु ते ।’ हा मंत्र म्हणून पुढील पायावर अर्घ्य द्यावे आणि ‘सर्वदेवमये देवि सर्वदेवैऽरलंकृते । मातर्ममाभिलषितं सफलं कुरु नंदिनि ।’ अशी प्रार्थना करावी.
महत्त्वाची एक गोष्ट आहे की, त्या दिवशीच्या जेवणात गायीचे दूध, दही, तूप, ताक, खीर, तसेच भजी इत्यादी वर्ज्य. या दिवशी सौभाग्यवती स्त्रिया एकभुक्त राहून हे व्रत करतात. सकाळी अथवा सायंकाळी सवत्स गायीची पूजा करतात. समुद्रमंथनातून पाच कामधेनू उत्पन्न झाल्या. त्यातल्या नंदा नावाच्या धेनूला उद्देशून हे व्रत आहे.

धनत्रयोदशी 28 ऑक्टोबर 2016, शुक्रवार



आश्विन वद्य त्रयोदशीला धनत्रयोदशी म्हणतात. या दिवशी वस्त्रालंकाराची खरेदी करणे शुभ मानतात. उपवास करून घरातले द्रव्य व अलंकार पेटीतून काढून साफसूफ करतात व पूजन करून पुनश्च योग्य ठिकाणी ठेवतात. कुबेर, विष्णू, लक्ष्मी, योगिनी, गणेश, नाग आणि द्रव्यनिधी यांची पूजा करून नैवेद्य दाखवितात, यथाशक्ती दान करतात. या दिवशी सायंकाळी दिवा तेलाने भरून प्रज्वलित करावा व नंतर त्याची पूजा करून घराच्या दाराजवळ, धान्याच्या राशीजवळ ठेवावा.
धनत्रयोदशीला संध्याकाळी मातीच्या किंवा कणकेच्या दिव्यात तेल, वात घालून प्रज्वलित करावा हा दिवा दक्षिणेकडे ज्योत करून ठेवावा. 
मृत्यूना पाशदंडाभ्यां कालेन श्यामया सह । त्रयोदश्यां दीपदानात् सूर्यजः प्रीयतां मम । असा मंत्र म्हणून ह्या दिव्यास नमस्कार करावा यास यमदीपदान म्हणतात.


याच दिवशी आयुर्वेदाचा प्रवर्तक धन्वन्तरी याची पूजा वैद्यकाची प्रगती होण्याकरिता वैद्य लोक करतात. हा देवांचा वैद्य मानला जातो. देव-दैत्यांनी क्षीरसागराचे मंथन केले. त्यातून चौदा रत्ने निघाली. त्यांत सुधर्मात्मा व आयुर्वेदमय दंड कमंडलुसहित असा धन्वन्तरी हातात अमृतकलश घेऊन बाहेर पडला. हा विष्णूचा अवतार असून सर्व वेदांत निष्णात व मंत्रतंत्रातही विशारद होता. याला आदिदेव, अमरवर, अमृतयोनी, सुधापाणी, अब्ज इत्यादी अन्य नावेही आहेत. याच्या अलौकिक प्रतिभेने नाना औषधींचे सार अमृतरूपाने देवांना प्राप्त झाले. ते जरामृत्युरहित बनले. त्यामुळे त्याला देवांचे वैद्यराजपद लाभले. भागवत पुराणात विष्णूच्या चोवीस अवतारांत धन्वन्तरीचा समावेश केला आहे. आरोग्य प्राप्तीसाठी ईशान्य दिशेकडे मुख करून सायंप्रार्थना करावी. धन्वन्तरीने चिकित्सेचे ज्ञान भास्करापासून प्राप्त केले आणि भास्कराच्या आयुर्वेदसंहितेच्या आधारे ‘चिकित्सा तत्त्वविज्ञान’ नामक ग्रंथ रचला. तेव्हापासून आयुर्वेदाचा प्रसार सुरू झाला. धन्वंतरी देवतेचे पूजन केवळ आयुर्वेदाचे डॉक्टर करतात असे नाही तर सर्वच शाखांचे डॉक्टर धन्वंतरी पूजन करतात.

नरक चतुर्दशी – 29 ऑक्टोबर 2016, शनिवार


नरकासुराने 16 हजार 108 स्त्रियांना आपल्या बंदीखान्यात डांबून ठेवले होते. हा नरकासुर प्रजेचाही खूप छळ करीत असे. भगवान श्रीकृष्णांनी या नरकासुराचा वध आश्विन कृष्ण चतुर्दशीला करून स्त्रियांची मुक्तता केली. नरकासुराने श्रीकृष्णाकडे वर मागितला की, आजच्या तिथीला जो मंगलस्नान करेल त्याला नरकाची पीडा होऊ नये. म्हणून नरक चतुर्दशीला पहाटे अभ्यंगस्नान करणे महत्त्वाचे मानले आहे.
शरद् ऋतूचा शेवट आणि हेमंत ऋतूचे आगमन अशा संधीकालावर दिवाळीचा सण साजरा करताना पुढे येणा-या थंडीच्या काळासाठी तेल लावून स्नान करण्याची सुरुवात नरक चतुर्दशीच्या अभ्यंगस्नानापासून होते. तिळाच्या तेलापासून केलेले उटणे अंगास लावावे व स्वच्छ स्नान करावे. या चतुर्दशीस ‘रूपचतुर्दशी’ असेही म्हणतात.
नरक चतुर्दशीचे दिवशी यमतर्पण करावयास सांगितले आहे. अपमृत्यु येऊ नये म्हणून यमाला 14 नावांनी तर्पण करून “यमोनिहंता पितृधर्मराजो वैवस्वतो दंडधरश्च कालः। भूताधिपो दत्त कृतानुसारी कृतांत एतद्दशभिर्जपंति।।” हा श्लोक 10 वेळा म्हणून प्रार्थना करण्यास सांगितले आहे. पूर्वीपेक्षा सध्याच्या काळात वेगाने चालविल्या जाणा-या वाहनांमुळे अपघाताचे भय वाढले आहे. अपघात, धावपळीचे जीवन, इ. अनेक कारणांमुळे अपमृत्यूचा संभव वाढत असल्याने नरकचतुर्दशीला यमतर्पण करून अपमृत्यु निवारणासाठी यमाची प्रार्थना सर्वांनी करणे आवश्यक आहे.

लक्ष्मीकुबेर पूजन – 30 ऑक्टोबर 2016, रविवार


शेतकऱ्यांसाठी ज्याप्रमाणे मार्गशीर्षातील वेळा अमावास्या शुभ आहे, त्याप्रमाणे व्यापारीवर्गासाठी आश्विनातील अमावास्या शुभ आहे. पुराणातील कथेप्रमाणे आश्विन अमावास्येस रात्री लक्ष्मी सर्वत्र संचार करीत असते. जेथे स्वच्छता, शोभा, आनंद आहे अशा ठिकाणी ती आकर्षित होते. म्हणून लक्ष्मीपूजनाचे दिवशी घर, दुकान झाडून, स्वच्छ करून, सुशोभित करून सूर्यास्तानंतर लक्ष्मी व कुबेर यांचे पूजन करून ऐश्वर्य, संपत्ति, समृद्धिसाठी प्रार्थना करावयाची असते.
नमस्ते सर्वदेवानां वरदासि हरिप्रिये या गतिस्त्वत्प्रपन्नानां सा मे भूया तव दर्शनात्
अशी लक्ष्मीची प्रार्थना करावी आणि
धनदाय नमस्तुभ्यं निधिपद्माधिपायच भवन्तु त्वत्प्रसादेन धनधान्यादिसम्पदः
अशी कुबेराची प्रार्थना करावी. यापूजेत श्रीसूक्त म्हणून अभिषेक केला जातो. समृद्धीचे प्रतीक म्हणून साळीच्या लाह्या आवश्यक असतात.
लक्ष्मीपूजन मुहूर्त - सायं. ०६।०५ ते रात्री ०९।१०, रात्री ०९।३० ते ११

बलिप्रतिपदा (दिवाळी पाडवा) – 31 ऑक्टोबर 2016, सोमवार


कार्तिक शुक्ल प्रतिपदेला बलिप्रतिपदा असे म्हणतात साडेतीन मुहूर्तांपैकी हा एक शुभ मुहूर्त आहे. या दिवशी दानशूर अशा बळीराजाची पूजा करण्यास सांगितली आहे. ज्याप्रमाणे चैत्र शुक्ल प्रतिपदेस शालिवाहन शक नवे संवत्सर सुरु होते, त्याप्रमाणे कार्तिक शुक्ल प्रतिपदेस विक्रम संवत्सर सुरु होते. व्यापारी वर्षास सुरुवात होत असल्याने वहीपूजन, दुकानाची पूजा करून नवीन वर्षाचे स्वागत केले जाते. या दिवशी पत्नीने पतीस ओवाळावे म्हणजे दोघांचे ही आयुष्य वाढते.
वहीपूजन मुहूर्त - पहाटे ०१।३५ ते ४, पहाटे ५ ते सकाळी ०८।१५, सकाळी ०९।५० ते ११।२०

यमद्वितीया (भाऊबीज) - 1 नोवेंबर 2016, मंगळवार

नरक चतुर्दशी, अमावास्या व बलिप्रतिपदा हे दिवाळीचे मुख्य तीन दिवस आहेत. मात्र या तीन दिवसांना जोडून येणारी भाऊबीज सुद्धा दिवाळीच्या दिवसात गणली जाते. कार्तिक शुक्ल द्वितीयेच्या दिवशी यमराज आपल्या बहिणीच्या हातचे भोजन करून बहिणीचा सत्कार करीत असे, अशी पुराणात गोष्ट आहे. म्हणून या दिवशी बहिणीने भावाला जेवावयास बोलावून त्याला ओवाळावे असे सांगितले आहे.
दिवाळीच्या या चार दिवसात सर्वत्र आनंदोत्सव साजरा करावयाचा असल्याने दीपमाळ, आकाशदिवे, दिव्यांची रोषणाई करून दीपोत्सव केला जातो. म्हणून या चार दिवसांना दीपावली किंवा दिवाळी असे म्हटले जाते.
वर्षभरातील इतर सण - उत्सव यांचे प्रमाणे दिवाळीचे स्वरूप नसते. सर्व समाजाने दुःख, भेदभाव विसरून चार दिवस आनंदात रहावयाचे असते. काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत संपूर्ण भारतात दिवाळी साजरी करण्याची पद्धति जवळजवळ सारखीच आहे. मुख्यत: घर, दुकान स्वच्छ करून, दिव्यांची रोषणाई, फराळाचे पदार्थ, गोडधोड पक्वान्न करणे, अभ्यंगस्नान, दिवाळीच्या निमित्ताने आप्तेष्टांनी एकत्र येणे इ. गोष्टी केल्या जातात पतीने पत्नीसाठी, भावाने बहिणीसाठी, मालकांनी कर्मचाऱ्यांसाठी भेटवस्तू देणे आणि स्नेहभाव दृढ करणे यामुळे संपूर्ण समाजात - कुटुंबात एकोपा राखला जातो.

प्रत्येक धर्मीयांच्या सण - उत्सवामुळे संपूर्ण भारतात खरेदी - विक्री होऊन आर्थिक उलाढाल वाढते अर्थातच त्यामुळे आर्थिक स्वास्थ्य प्राप्त होऊन भारताची प्रगति होण्यात या सण - उत्सवांचे मोठे सहकार्य लाभते ही गोष्ट निश्चितच लक्षात ठेवली पाहिजे.

दीपावलीच्या दाते पंचांग परिवारातर्फे हार्दिक शुभेच्छा !