निरंतर बदलत राहणारे, ज्योतिषशास्त्र !
आधुनिक इतिहासकारांच्या
मते भारतीय संस्कृती ५ ते ७ हजार वर्षांपासून अस्तित्वात आहे. या काळात वेगवेगळ्या
टप्प्यांवर ज्येतिषशास्त्राशी संबंधित ग्रंथांची निर्मिती झाली आहे.
सूर्य सिद्धांतापासून थेट ग्रहलाघवापर्यंत हे ग्रंथलेखन होत आले आहे. आधुनिक
पाश्चात्त्य गणिताचा प्रभाव पडण्यापूर्वी हे ग्रंथ लिहिले गेले. हे ग्रंथ म्हणजे
भारतात ज्योतिषशास्त्राचा विचार कसा झाला याचे अधिकृत प्रलेखन (documentation)
आहेत. या प्रत्येक ग्रंथकाराचा विचार, त्या विषयातील त्याच्या गुरुपरंपरेतून आणि त्या
ग्रंथकाराला नव्या सुचलेल्या सैद्धांतिक कल्पनांतून तयार झाला. अनेक ग्रंथकारांनी
पूर्वसुरीच्या ग्रंथकारांची काही मते अमान्य केली, काही मते पुरस्कारली आहेत. हे ग्रंथकार (मय, भास्कराचार्य, वराहमिहीर आदि) ऋषितुल्य व्यक्तिमत्त्वे असल्यामुळे बऱ्याच वेळा, सध्याच्या काळात त्यांच्या मतांचा विचार करताना, काहीसे दडपणाखाली, त्यांनी जो विचार केला तो बरोबरच असणार, असे मनात येते. परंतु त्या त्या ग्रंथकारांनी त्यांच्या आधी होऊन गेलेल्या
ग्रंथकारांचा असा दडपाणाखाली येऊन विचार केलेला नाही, हे त्यांनी केलेल्या विविध मतांच्या खंडनांवरून लक्षात
येते. हीच परंपरा आपल्या इतर शास्त्रांमध्येपण दिसून येते (उदा. दर्शनशास्त्रे).
भारतीय ऋषींनी अनेक
विषयांचा सखोल अभ्यास केला हे ग्रंथांच्या विषय वैविध्यावरून लगेच लक्षात येते. हे
ज्ञान त्यांना कसे झाले हे मध्ये बराच काळ गेल्याने आणि पारतंत्र्यात खंडित
झालेल्या परंपरांमुळे सांगता येणे शक्य नाही. ज्योतिष, योग, आयुर्वेद इ.
अाश्चर्य वाटावे इतक्या प्रगत विज्ञानशाखा भारतात विकसित झाल्या. पण या प्रगतीचा
हळूहळू वाढत जाणारा आलेख आज मिळत नाही, कारण, त्या त्या काळातील सुसंगत
प्रलेखनं (consistent documentation) आज उपलब्ध होऊ शकत नाही. अशा परिस्थितीत, गणितासारख्या तर्काला बांधील असलेल्या विषयात, त्या काळी किती प्रगती झाली होती, हे तर्काला पटणाऱ्या पुराव्यांच्या अभावी,
ठामपणे प्रत्येक संदर्भात सांगता येणार नाही.
म्हणूनच हे ग्रंथकर्ते ऋषी आदरणीय असले तरी, त्यांचा प्रत्येक विचार देश-काल-परिस्थितीच्या कसोटीस
उतरेलच असे मानणे योग्य नाही.
यातील अनेक ऋषींची वचने
अभ्यासली तर, असे वाटते की, यांना विश्वरहस्य कळले होते. विश्वरहस्य,
तत्त्वज्ञान, हे विषय असे आहेत, की ज्याचा पुरावा देता येत नाही. पण, या तत्त्ववेत्त्यांनी जे अमोल ज्ञान वेदादि ग्रंथांमधून मांडले आहे, त्यांतील काही वचनांचा अभ्यास केल्यास अथवा
अनुभव घेतल्यास आपली खात्री होते की या महात्म्यांना अंतिम सत्याचा साक्षात्कार
झाला होता. अशा अंतिम ज्ञानाचा साक्षात्कार झालेल्या ऋषींकडून त्यांच्या देशकाल
परिस्थितीनुसार योग्य (नैसर्गिक) असेल एवढेच तंत्र आणि विज्ञान विकसित झाले.
ज्योतिषशास्त्र, आयुर्वेद ही
तंत्र आणि विज्ञानाच्या कक्षेतील (अपरा विद्या) शास्त्रे आहेत. त्यामुळे त्याचा
विकासही, त्या काळांतील भासलेली
आवश्यकता, किंवा काही वेळा कुतूहल
यांमुळे झाला. त्या प्रगतीला देश-काल संदर्भ होते आणि देश-काल मर्यादा पण होत्या.
अर्थात परा विद्या देश-कालातीत आहे, पण असे देश-कालातीत ज्ञान असणाऱ्या ऋषींनी विदित केलेली अपरा विद्या मात्र
देश-काल मर्यादेने बद्ध असते. म्हणून ज्योतिषशास्त्र हे निरंतर बदलत राहणारे
शास्त्र असेल. प्रत्येक कालात त्यात परिस्थितीजन्य बदल होतील.
अपरा विद्येतील शास्त्रे
ही वस्तुनिष्ठ असतात. आर्यभटाने लावलेला शोध, वराहमिहीर वापरणार नाही असे होत नाही. हा शोध तुझा, तो तू वापर, मी फक्त माझे शोधच उपयोगात आणणार. असा दृष्टिकोन ठेवणारा
समाज कालांतरात नष्ट होतो. भारतीयांनी शून्याचा शोध लावला, म्हणून पाश्चात्त्य जगत् त्यापासून दूर राहिले नाही.
त्यांनी त्या शून्याच्या शोधाचा उपयोग करून पुढे आधुनिक गणित उभे केले. तसेच केवळ
पाश्चात्त्यांनी विकसित केले म्हणून आधुनिक खगोलशास्त्र अमान्य केले, आणि ज्या गणितात त्रुटी दिसतात ते गणित,
केवळ आपल्या ऋषींनी सांगितले आहे म्हणून वापरत
राहिलो तर आपल्या समाजाची स्थिती वर सांगितल्याप्रमाणेच होईल.